Ad Advertisement Ad Advertisement

Mumbai CSMT Bomb Threat – मुंबई CSMT स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी अफवा

तीन तास तपासणी, स्फोटक आढळले नाही

मुंबई : Mumbai CSMT Bomb Threat – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शनिवारी (१४ नोव्हेंबर) सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी सुमारे तीन तास केलेल्या कसून तपासणीनंतर ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान स्थानकात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साधारण ६.४० ते ६.५० च्या दरम्यान वाडी बंदर येथील लोहमार्ग पोलीस (GRP) नियंत्रण कक्षाला तसेच आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर धमकीचा फोन आला होता. यामध्ये CSMT रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.

धमकीची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (RPF), मुंबई पोलीस, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली. फलाट, पादचारी पूल, पार्सल विभाग तसेच स्थानकात उभ्या असलेल्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली.

सुमारे तीन तास चाललेल्या या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही. त्यामुळे बॉम्बची धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, हा धमकीचा फोन नेमका कोणी केला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Read About: Bomb Threat Email Maharashtra – महाराष्ट्रातील 8 हून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.