सिलावडा गावाजवळ भीषण अपघात; अतिवेगात ओव्हरटेकचा प्रयत्न करताना चालकाचे नियंत्रण सुटले, थरारक घटना डॅशकॅममध्ये कैद
मसुरी (उत्तराखंड) : Mussoorie Accident उत्तराखंडमधील चक्रता-मसुरी राष्ट्रीय महामार्गावर सिलावडा गावाजवळ डोंगराळ आणि नागमोडी रस्त्यावर अतिवेग, हुल्लडबाजी आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार थेट २०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण अपघात कारमधीलच डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात वाचला
डॅशकैम फुटेजमध्ये दिसत असल्यानुसार, कारमधील तरुण अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत होते. डोंगराळ रस्ता असतानाही त्यांनी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेता धोकादायक पद्धतीने ओव्हरेटॅक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्थानिक दुचाकीस्वाराला कारची धडक बसता बसता थोडक्यात वाचली. या जीवघेण्या प्रकारानंतरही कारमधील तरुण घाबरण्याऐवजी मोठ्याने हसत होते आणि त्या दुचाकीस्वाराची थट्टा करत होते.
मोठ्या आवाजातील गाणी आणि मृत्यूचे तांडव
कारमध्ये अतिशय मोठ्या आवाजात गाणे वाजत होते. मात्र, हाच आनंद काही सेकंदांतच काळाच्या तोंडात घेऊन गेला. एका तीव्र वळणावर चालकाचे वेगावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली आणि क्षणार्धात दरीत कोसळली. कार दरीत अनेक कोलांट्या खात सुमारे २०० मीटर खाली गेली.
बचावकार्य आणि पोलीस तपास
बचाव पथकाने दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून युद्धपातळीवर मदतकार्य राबवले. या अपघातात एका ३९ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जखमी तरुणांना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.