Ad Advertisement Ad Advertisement

Nana Patekar Acting Career : तया अंगी ‘नाना’ कळा

Nana Patekar Acting Career : समांतर चित्रपटाचा म्हणजे साधारण सातव्या-आठव्या दशकाचा चित्रपटाचा काळ ऐतिहासिक महत्त्वाचा होता, त्यानं फार मोठ परिवर्तन घडवलं. हिंदी चित्रपटानं या काळात कात टाकली. कपूर आणि खन्ना यांच्या चॉकलेटी हिरोंच्या बरोबरीनं ओमपुरी, नसरुद्दीन शहा यांच्यासारखे सर्वसामान्य चेहऱ्यांचे आणि तथाकथित नायकांच्या देखणेपणाचा आणि सर्वगुणसंपन्नतेचा लवलेश नसलेले नट पडदा गाजवू लागले. व्यावसायिक चित्रपटांची चलती कायम होती; पण त्याच्या बरोबरीनं वास्तवाला जवळचा असणारा आणि चौकटीबाहेरचा समांतर चित्रपट तितकीच दाद मिळवत होता. या चित्रपटात श्रीराम लागू, अमोल पालेकर, सदाशिव अमरापुरकर आणि नाना पाटेकर या चार मराठी नटवर्यांनी बाजी मारली, समांतर चित्रपटाबरोबर व्यावसायिक चित्रपटातही त्यांनी उत्तम बस्तान बसवत मराठीचा झेंडा अटकेपार नेला.

या रुपेरी चौफुल्यात नाना पाटेकर सर्वांत यशस्वी ठरला आणि ही देखील ऐतिहासिक किंबहुना क्रांतिकारक घटना होती. खुद्द नानाच्याच भाषेत सांगायचं तर, हमालासारखा चेहरा असलेला आणि ठणठणीत रांगडा नट हिंदी चित्रपट प्रेक्षक पहिल्यांदाच बघत होता. तसाही याच काळात अमिताभच्या रूपानं हिंदी चित्रपटाचा नायक आक्रमक आणि निर्भीड बनवू पाहत होता. शाहरूख खानच्या उदयानं खलनायकाला जवळचा असणारा आणि विकृत मनोवृत्तीचा हिरो नायकाच्या बदलत्या रूपात सामील झाला. त्याचा सर्वाधिक फायदा नानाला मिळाला, ‘क्रांतिवीर’ आणि ‘अग्नि साक्षी’ त्याची ज्वलंत उदाहरण.ं त्यातही ‘क्रांतिवीर’नं धमाल केली. त्याचा नायक रांगडा, तिरकस, फटकळ असला तरी त्या व्यक्तिरेखेला विनोदाची झकास फोडणी दिलेली होती. ‘लहान मेंदूवर मारू नकोस’ म्हणून बापाला बजावणारा आणि ‘कलमवाली बाई’ ऊर्फ पत्रकारितेत असणाऱ्या नायिकेची येता-जाता खिल्ली उडवणारा नायकाचा हा नवा अवतार काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या, मुंबईपासून ते मणिपूरपर्यंतच्या आणि अहमदापासून ते अंदमानपर्यंतच्या प्रेक्षकाला एकदम पसंत पडला.

‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’ आणि ‘कोहराम’ या व्यावसायिक वर्गातल्या तरीही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाच्या यशामध्ये नानांचा अक्षरश: मोठा हात होता. मेहुलकुमार हा तोवर कुणाच्याही खिजगणतीत नसलेला निर्माता, दिग्दर्शक या तीन चित्रपटांमधून प्रथम श्रेणीत पोहोचला. त्यानंतर मात्र त्याच नाव लुप्त झालं. या तिन्ही चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन नानाचंच असावं असा दाट संशय आहे. विशेषत: ‘तिरंगा’मध्ये राजकुमारच्या दबंग व्यक्तिमत्त्वासमोर तो दबला नाही, आणि ‘कोहराम’मध्ये कोनीटेलधारी फोटोग्राफरच्या भूमिकेत तो अशा दिलखुलासपणे वावरला की, त्याच्यासमोर उभ्या असलेल्या महानायकाच्या तिन्ही दांड्या गुल झाल्या! ‘कोहराम’मधल्या बंगाली ढंगात बोलणाऱ्या फोटोग्राफरच्या व्यक्तिरेखेला त्यानं थोडी मिश्कील आणि चांगलीच चहाटळ डूब दिली, तीदेखील फर्मास होती. त्या दृश्यात त्यानं तब्बू या अभिनेत्रीला स्नानसुंदरी बनवलं आणि तिच्यासह दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा आनंद लुटला.

यादरम्यान ‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’ या खटकेबाज संवादातून छप्परफाडू टाळी मिळवून नाना ‘यशवंत’ म्हणून मिरवू लागला. त्याचं मानधन कोटीच्या कोटी उड्डाण करू लागलं. आणि मग नेहमीचा ‘अँटीक्लायमॅक्स’ घडला! तिकीट खिडकीच्या सूर्यबिंबाला शिवून आलेला नाना झपाट्यानं पायऱ्या उतरत हिंदी चित्रपटाच्या पडद्याबाहेर झाला. नानाच्या मानधनापेक्षा त्याचा राजकुमारच्यावर ताण करणारा विक्षिप्तपणा आणि फटकळपणा निर्मात्यांना मानवेनासा झाला. त्याची आक्रमक रांगडी प्रतिमादेखील एकरंगी वाटू लागली. वास्तविक त्या प्रतिमेबाहेर जाऊन नानानं ‘खामोशी’ (विधू विनोद चोप्रा), ‘वजूद’ (एन चंद्रा) ‘थोडा सा रुमानी हो जाए’ या तीन चित्रपटांमध्ये रंगवलेल्या सकारात्मक आणि रोमँटिक भूमिकांची दखल घेतली गेली नाही. यापैकी शेवटचा चित्रपट अमोल पालेकर यानं दिग्दर्शित केला होता. आणि नायकाची भूमिका स्वत: न करता नानाला दिली, यात नानाच्या अभिनयाचा उच्च दर्जा लक्षात यावा. आक्रमक भूमिकांना संयत आणि सुबुद्ध भूमिकांपेक्षा नेहमीच जास्त दाद मिळते, हे या उपेक्षेमागचं दुर्दैवी वास्तव आहे, दुसरं काय!

टिकून राहण्याच्या गरजेपायी नानाला विशिष्ट प्रकारच्या काहीशा एकसुरी भूमिका कराव्या लागल्या. त्यांनी त्याला यश दिलं; पण तडजोडीही कराव्या लागल्या असतील हे समजण्यासारखं आहे. एरव्ही ‘प्रहार’सारखा एकच चित्रपट दिग्दर्शित करून नाना का थांबला असेल? अर्थात, हिंदी चित्रपटातली मागणी कमी झाली तरी नाना कधी दुर्लक्षित झाला नाही. त्याच्याकडे चेहरा नसला तरी बुद्धिमत्ता होती. साहित्याची उत्तम जाण होती आणि तसाच लेखनगुणही होता. वीसेक वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात त्यानं सुनील गावस्कर या क्रिकेटपटूवर उत्कृष्ट लेख लिहिला होता, गेल्या दशकात मराठीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा तो अभिन्न हिस्सा बनला आणि प्रकाशात राहिला. त्याचं वक्तृत्व होतंच तसं नामी. आणि काय बोलावं कसं बोलावं ही त्याची खुबी काही औरच होती. नाम फाउंडेशनच्या स्थापनेतून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यानं केलेलं सामाजिक काम अनेक वर्षं त्याचं नाव उजळत राहील, बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा नाना म्हणजे ‘वेष असावा पांढरा; परंतु अंगी ‘नाना’ कळा’ या उक्तीचं मूर्त रूप होता. ‘परिंदा’साठी त्याला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा देखील त्याच्यातल्या क्रांतिवीराला ठळकपणे लक्षात आणून देणारा होता. तत्पूर्वी खलनायकाची भूमिका करणाऱ्या नटाला कधीही अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नव्हता.

वरकरणी फक्त फटकळ वाटणारा नाना प्रत्यक्षात संवेदनशील होता. वेळप्रसंगी तो कुणाचीही भीडभाड न ठेवता कोणत्याही घटनेवर टीकेचा प्रहार करायचा. पेडर रोडच्या उड्डाणपुलाला विरोध करणाऱ्या लता दीदींना ‘आता या पुलामुळे होणाऱ्या गर्दीची भीती वाटत असेल तर वसई किंवा विरारला राहायला जा’ असा जाहीर सल्ला द्यायला तो कचरला नाही. पण याच लता दीदींच्या कंठातला अभिजात सूर म्हणजे हजारो लाखोंच्या जीवनात मांगल्य जागवणारा आहे, असं मार्मिक रसग्रहण त्यानेच ‘टॅक्सी नंबर ९-२-११’ मध्ये ऐकवल होतं.

मला स्वत:ला त्याच्या पाहुणचाराचा जितका गोड तितकाच विक्षिप्त अनुभव एकदा आला. तो नि:स्सीम गणेशभक्त होता. अंधेरी उपनगरातल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणारा सुपरस्टार नाना गणपतीच्या दहा दिवसांत माहिममधल्या आपल्या एक खोलीच्या घरात मुक्कामाला यायचा. आणि अक्षरश: ढीगभर फुलांच्या राशींनी गणेशपूजेत तल्लीन व्हायचा. ‘चित्रलेखा’ या साप्ताहिकासाठी त्याच्या गणेशपूजनाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. त्या निमित्तानं त्याच्याशी बातचीत करून जायला निघणार, तर नानानं फर्मावल, ‘असं कधी कुणी गणेशोत्सवात जेवल्याखेरीज जायचं असतं का?’ पहिल्याच भेटीत कुणाकडे जेवणं हे महाकठीण कर्म होतंच; पण त्याहीपेक्षा लेखाची डेडलाइन नानाचा फर्मानवजा आग्रह स्वीकारू द्यायला तयार नव्हते.

मी तसं सांगितल्यावर नानानं चक्क माझ्या कार्यालयाला फोन केला आणि येथे जेवण केल्याखेरीज अरुणा ऑफिसला येणार नाही, असा बॉम्बस्फोटवाचक फोन केला. नानाच्या मातोश्रींच्या हातची लुसलुशीत पुरणपोळी खाल्ल्यावर ती हुकूमशाहीदेखील गोड वाटली. पण गोष्ट जेवणावर थांबायची नव्हती, जेवण करून निरोप घेण्याचं धाडस मी करणार तेवढ्यात नानाची दुसरी आज्ञा झाली, ‘आमच्याकडे जेवणानंतर पाहुण्यांनी वामकुक्षी घ्यावीच लागते.’ माझ्या तोंडाला आ वासण्याचीही हिंमत नव्हती, कारण आकाशवाणी करतानाच एकीकडे नानाने भलीमोठी सतरंजी फरशीवर पसरवली. हे दृश्य भयचकित नजरेनं बघणाऱ्या मला पामराला, नानाच्या मातोश्रींनी हळूच म्हटलं, ‘अगं बाई ऐक त्याचं, नाहीतर तुझ्या ऑफिसला तो पुन्हा फोन करेल!’ यानंतर शरणागती खेरीज उपायच नव्हता. मग साधारण बारा गुणिले दहाच्या त्या खोलीत स्वयंपाकाच्या ओट्याला लागून, माझ्या शेजारी ती माऊली मग नाना आणि त्याच्या शेजारी आमच्या नियतकालिकाचा फोटोग्राफर असा सामूहिक वामकुक्षीचा समारंभ पार पडला. साधारण एक तासाच्या त्या कार्यक्रमात मला पापणीभरसुद्धा झोप लागली नाही ही गोष्ट वेगळी.

त्यानंतर नानाचा असा पाहुणचार घेण्याची संधी पुन्हा मिळाली नाही. नाना कामाच्या गर्दीत आणि कीर्तीच्या सान्निध्यात पुरता गुरफटून गेला. पहिल्यासारखा मोकळेपणाने बोलेनासा झाला. नाही म्हटलं तरी हिंदी चित्रपटातलं अफाट यश त्याच्या डोक्यात गेलं. पण येथेही कौतुक करावं अशी कलाटणी त्यानं दिली.एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ‘आपल्याला अनपेक्षित यशामुळे ‘ग’ची बाधा झाली होती. याची आता खंत वाटते.’ अशी जाहीर कबुली देण्याचा मोठेपणा दाखवला आणि सलाम मिळवला.

अरुणा अंतरकर

Read About :  Nana Patekar – नानात नाना पाटेकर नाना !

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.