Nana Patekar : नाना हा माझा मित्र होता हे म्हणायला माझ्या पेनचं निब धजावत नाहीये. नानाला जिवाभावाचे मित्र किती, ठाऊक नाही. मात्र, त्यानं मनातल्या मनात जगाची सरळसरळ विभागणी केली होती : त्याच्यावर मनोभावे प्रेम करणारे आणि, दोन, त्याच्यावर प्रेम करता आलं नाही म्हणून पश्चात्तापाच्या आगीत रात्रंदिवस पोळणारे. नानाच्या लेखी उरलेले तमाम लोक त्याच्या साम्राज्यातले उपरे होते. यात मी कुठंच बसत नव्हतो.
नाना कुठं कुठं भेटायचा. छान बोलायचा. नेहमीचं. नाना लिखाणातला नव्हता नि ना मी रंगभूमीचा. परंतु आमचं घराणं एक – ‘बाई’ : विजया मेहता. नानानं नेहमीच मला मायेनं वागवलं. तरीही मैत्रीचा मोठा पल्ला गाठणं मला शक्य झालं नाही. तसा मी प्रयत्नही कधी केला नाही.
मी नानाला जरा दुरूनच पाहत होतो. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’, ‘पाहिजे जातीचे’ वगैरे नाटकं पाहिली. ‘गमन’ सिनेमासुद्धा लागल्या लागल्या पाहिला. नाना रंगभूमीवर आला तेव्हा डॉ. लागू, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशीनाथ घाणेकर, सतीश दुभाषी, माधव वाटवे हे गुणी अभिनेते ‘दिमाखात तारे नटोनी थटोनी’ असे यशाच्या कमानीखाली उभे होते. नि ‘पिसाटापरी केस पिंजारुनी’ असा नाना रंगभूमीवर अवतरला. आणि मराठी रंगभूमीनं नानासाहेब फाटक ते नानासाहेब पाटेकर असं एक वर्तुळ पूर्ण केलं.
नाना मोठा होताच. आणखी मोठा मोठा झाला. आस्ते आस्ते त्याच्याभोवती काही मिथ्स तयार होत गेली. तर ते ठीक आहे. एकतर नाटक-सिनेमातले लोक स्वत:वर जाम खूश असतात. त्यात नाना लहरी. कधी काय बोलेल, खात्री नाही. वर डोंगराएवढी लोकप्रियता.
नानाचा आक्रमकपणा, आक्रस्ताळेपणा हे खरं तर त्याचं बचावतंत्र होतं. तो आतून बराच वल्नरेबल असणार. या दुष्ट, निर्घृण जगात टिकून राहायचं तर डरकाळ्या फोडाव्या लागतील हे सुभाषित मनाशी धरून लाखो माणसं जगत असतात. याअर्थी नाना हा श्रमहारा वर्गाचा proletariat चा माणूस ठरला. श्री. अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन म्हणून गाजले. नि ते ठीकच; परंतु हिंदी सिनेमातला खरा अँग्री यंग मॅन हा नाना. घट्टमुट्ट, रांगडा, जणू कोकणातला पीळदार जांभा दगड.
नानाचं आणखी एक मला भावतं म्हणजे त्यानं हिंदी संवादांना थेट मराठी वळण लावलं. समोर अनिल कपूर, राजकुमार वगैरे पंजाबी-हिंदी मंडळी असताना नाना आपलं मराठी बाजाचं हिंदी बिनदिक्कत बोलायचा. त्याचा टोनसुद्धा अस्सल मराठी असायचा. पल्लेदार, भरजरी हिंदीला किंवा नक्षीदार उर्दूला त्यानं चार हात दूरच ठेवलं. हे एका अर्थी हिंदी सिनेमाचं लोकशाहीकरणच होतं.
नानाची चेहरेपट्टी ओबडधोबड. शिवाय, त्याचं व्यक्तिमत्त्वही रांगडं. त्यानं बहुतेक तशाच भूमिका स्वीकारल्या. राजकुमार सलीमच्या (‘मोगल-ए-आझम’) वाटेला तो गेलाच नसता. त्यामुळे तो एकाच बाजाच्या भूमिका करतो अशी टीका झाली नि ती अगदीच निराधार नव्हती. परंतु १९८०च्या दशकात नाना, नसीरुद्दीन शहा यांनी एक नवा, संघर्षशील, महानगरीय नायक रुपेरी पडद्यावर पेश केला आणि गोऱ्यागोमट्या गुलहौशी पंजाबी नटांच्या राजमुकुटाला तडे गेले. एवढ्या एकाच कामगिरीसाठी नाना पुष्कळ वर्षं सिनेरसिकांच्या स्मरणात राहणारेय.
नानाचा ‘प्रहार’ पाहून माझी आई स्तब्ध झाली. अशोककुमार, मोतीलाल, बलराज साहनी हे तिचे आवडते नट. आई म्हणाली, ‘बलराज साहनीच्याच लायनीवर नाना चाललाय.’ नानाला हे सांगायचं सांगायचं म्हणता राहून गेलं. करता करता ‘तिरंगा’, ‘परिंदा’ वगैरे सिनेमे आले नि नाना सुपरस्टारांच्या प्रात:स्मरणीय यादीत झळकू लागला. तो stylised झाला. पण तोवर मी मुख्य प्रवाहातल्या हिंदी चित्रपटांचा नाद सोडला होता. जवळजवळ चार दशकं हिंदी सिनेमावर मोठा प्रभाव टाकणारा एकमेव मराठी अभिनेता ही नानाची कामगिरी सह्याद्रीवर खोदली जावी अशी. दुर्गा खोटे, शांता आपटे ते माधुरी दीक्षित अशी हिंदीत अमाप यश मिळवणाऱ्या मराठी अभिनेत्रींची यादी मोठी आहे; मात्र, मराठी नट हिंदीत हिरो म्हणून फारसे गाजले नाहीत. जवळजवळ नाहीच. नाना हा झगझगीत अपवाद.
नानानं हिंदीवाल्यांना शिस्तीत ठेवलं तर ते काही नवं नाही. सगळ्या जगाला शिस्त लावली पाहिजे असा चंगच त्यानं बांधला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मोडका पूल’ अशी पु. लं.ची हेटाळणी केली तेव्हा नानानं जाहीरपणे शिवसेनाप्रमुखांच्या विधानाला विरोध केला. ‘एक वेळ अशी येईल की, तुमच्या मागे मराठी माणूस उभा नसेल,’ असं तो बाळासाहेबांना उद्देशून म्हणाला. याला डेअरिंग लागतं.
‘पुरुष’च्या एका प्रयोगाची आठवण. नको त्या प्रसंगाला लाफ्टर येताहेत हे पाहून नाना संतापला आणि प्रयोग मध्येच थांबवून त्यानं प्रेक्षकांची तीव्र शब्दांत खरड काढली. अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे असं एक मूलभूत तत्त्व तो डोक्यात ठेवून असेल; पण प्रसंगी तो स्वत: अ-व्यावसायिक वागायचा. तशी काही उदाहरणं आहेत. दोनेक वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भेटलो. मी नानाला म्हटलं, ‘घरी जेवायला ये.’ तर हो म्हणाला नि वर म्हणाला, ‘तुम्ही सगळे – विजयाबाई, अनाहिता (विजयाबाईंची मुलगी), तू, नीना असे सगळे पुण्याला माझ्याकडे दोन दिवस राहायला या…’ बोलता बोलता त्यानं माझ्या कुर्त्याचं बटण नीट लावलं.
यंदाच्या ॲागस्टमध्ये सीकेपी समाजातर्फे विजया मेहतांची स्मरण-सभा पार्ल्यात झाली. वक्ता म्हणून नानाचं नाव होतं. तो पुण्याहून येईल की नाही या विचारानं सगळे काळजीत पडले होते. माझे मित्र आणि कार्यक्रमाचे संयोजक श्री. मंदार कर्णिक मला म्हणाले, ‘तुम्ही बोलून घ्या. ‘अंबरीशला फोन करायला सांगा’ असा नानाचा निरोप आहे.’ मी नानाला फोन लावला. नुस्ती बेल वाजत होती. उत्तर नाही. पुन्हा नंबर फिरवला. उत्तर नाही.
मी त्याला टेक्स्ट मेसेज केला: ‘आम्ही तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ तू आम्हांला तुझ्यावर प्रेम करू देतोस आणि म्हणून आमच्यावर उपकार करतोस असा होत नाही.’ वर त्याला तीन उर्दू शेर देवनागरीत पाठवले. उत्तर नाही. आता तर तो गेला. आज सकाळपासून गालिबचा शेर बेचैन करत होता :
मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्यूं रातभर नहीं आती
(मरणाचा एक दिवस तर निश्चित आहेच, तरीही रात्रभर अस्वस्थ का वाटतं? झोप का लागत नाही?)
अंबरीश मिश्र
Read About : Nana Patekar Death : हृदयविकाराने मृत्यू, तरी MLC का नोंदवली? जाणून घ्या कायदा काय सांगतो?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.