पहिल्या आवर्तनासाठी गरजेनुसार वाढीव पाणी उपलब्ध करून देणार-जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
छत्रपती संभाजीनगर : Nandur-Madhmeshwar-rabi-summer-water-rotation– नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आवर्तनात प्रत्यक्ष गरजेनुसार वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जानेवारीमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे माहिती जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीस खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे पाटील, प्रतापसिंह पाटील, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, विविध धरणांतील साठा, मंजूर आरक्षण आणि प्रस्तावित आवर्तनांचे सादरीकरण केले. त्यानुसार रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत एक टीएमसी, तर दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे. उन्हाळी हंगामासाठी २० एप्रिल ते १ मे २०२७ या कालावधीत एक आवर्तन प्रस्तावित करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आवर्तनासाठी प्रस्तावित १ टीएमसी पाणी अपुरे पडू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन हे आवर्तन सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली होती. प्रत्यक्ष आवश्यकता आणि उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन वाढीव पाणी देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. हे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी दिली-आ.बंब
मुकणे, भाम, वाकी आणि बाभळी या धरणांमधील पाण्याची उपलब्धता, प्रकल्पनिहाय आरक्षण आणि नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्राच्या पाण्याच्या हिश्श्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणात चुकीची आकडेवारी दिली. यावरून आमदार प्रशांत बंब चांगलेच संतापले. यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या धरणांमध्ये एकूण जवळपास १०.६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ४४ हजार हेक्टरवरील पिकांचे सिंचन होते. परंतु या पाण्यावर चुकीचे आरक्षण टाकण्यात आले, असे सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी आकडेवरी बदलली. चुकीचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री राधारकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याचे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.
उपोषणकर्ते आले रुग्णवाहिकेतून
नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून रब्बीसाठी केवळ १ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. या विरोधात वैजापूर, गंगापूर भागातील शेतकरी प्रकल्पाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. सात दिवसांच्या उपोषणामुळे एक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेत बसून उपोषणकर्ते बैठकीसाठी आले होते. या उपोषणाची दखल घेत एक टीएमसीवरून दीड टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पाण्याची उपलब्धता पाहून दोन टिएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी जावे यासाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात येणार असल्याचे उपोषणकर्ते तथा आधार जलदूत समितीचे प्रदेशाध्यक्ष पंडित शिंदे यांनी सांगितले.
Read About : Tibet Mega Dam – ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाधरणामुळे भारत-बांगलादेशला पुराचा धोका?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.