Narayan Surve : नारायण सुर्वे यांचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि मराठी कवितेच्या इतिहासात सुर्वे युगाचा प्रारंभ झाला. नारायण सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेच्या आशय आणि अभिव्यक्तीला नवी परिमाणे, नवे भान, नव्या जाणिवा दिल्या. मराठी कवितेला आणि एकूणच मराठी ‘सारस्वता’ला जे कधीच दिसले नाही, ते नारायण सुर्वे यांच्या कवितेने साऱ्या जगाला दाखवले.
धार्मिक, जातीय आणि सांस्कृतिक असा कोणताही जन्मजात वारसा नसणाऱ्या या कवीने माणसाच्या माणुसकीचा आणि सृजनशीलतेचा सदासर्वदा गौरव केला आहे. ‘माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही’ हे त्यांचे शब्द वैश्विक मानवतावादाचा स्वीकार आणि जयजयकार करणारे आहेत. सुर्वे यांची कविता ही वेदनेची, अश्रूची, कष्टाची, घामाची, शोषितांची, पीडितांची, कामगारांची आहेच; पण ती खऱ्या अर्थाने माणसांची कविता आहे, जीवनाची कविता आहे.
मी एक सत्य, पृथ्वी एक सत्य
सर्वांसाठी आपण हे ही एक सत्य
या ओळी अखिल मानवजातीच्या वैश्विक एकात्मतेचा आशावाद व्यक्त करणाऱ्या आहेत. या वैश्विक मानवतावादाच्या विरोधी छावणीत असणाऱ्या ‘सारस्वतां’ना वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून विद्रोहाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.
रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खड्गे मी देत आहे
एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
हा इशारा म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात सुर्वे युगाचे आगमन होय. महाराष्ट्राचे साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्यावरण बदलवण्याची वैचारिक ऊर्जा ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे’ या शब्दांमध्ये आहे. सुर्वे यांच्या कवितेने महाराष्ट्राचे साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्यावरण बदलले, समर्थ आणि सृजनात्म असणाऱ्या माणसाच्या मनातील विश्वात्मकतेलाही कविता साद घालते, विचारप्रवृत्त आणि कृतिप्रवण करते.
केशवसुतांनी कल्पिलेले ‘विश्वमानवत्व’ आणि मुक्तिबोधांना अपेक्षित असलेली ‘मानुषता’ सुर्वे यांनी आपल्या कवितेतून खऱ्या अर्थाने जिवंत केली. त्यांची कविता केवळ मार्क्सवादी विचारसरणीच्या चौकटीत अडकून राहिली नाही, तर तिने सर्व मानवांना कवेत घेणारे ‘वैश्विक मानुषतावादी’ रूप धारण केले, हेच त्यांच्या काव्यदृष्टीचे खरे बलस्थान आहे. अन्यायामुळे आणि भीतीमुळे भयभीत झालेल्या सामान्य माणसांच्या मनातील अस्वस्थतेला ही कविता वाचा फोडते.. सामान्यांच्या वेदनेशी इतके घट्ट नाते ठेवून त्यांना विचारांची लढाऊ ऊर्जा ही कविता देते.
डॉ. मनोज तायडे लिहितात, ‘केशवसुतांना जे ‘विश्वमानवत्व’ अपेक्षित होते, ते आधुनिक मराठी कवितेत नारायण सुर्वेंच्या कवितेला गाठता आले आणि मुक्तिबोधांना जी ‘मानुषता’ अभिप्रेत होती तिही सुर्वेंच्याच कवितेत अभिव्यक्त झाली. नारायण सुर्वेंची कविता मार्क्सवादाची सीमा ओलांडून ‘वैश्विक मानुषता’वादी झाली, यातच नारायण सुर्वेंच्या ‘कवितेचे आणि काव्यदृष्टी’चे खरे सामर्थ्य आहे.
कारण ती- ‘आजच्या सृजनातील गरजेच्या, प्रतीक्षेतील प्रत्येक क्षणाच्या, औषध मागणाऱ्या व्यथांच्या, गोळी लागेल म्हणून धपापून उडणाऱ्या, मनामनांतील कबुतरांच्या नावाने- लिहिलेली आहे, म्हणूनच तिला अद्यापपर्यंत उत्तराधिकारी कविता मिळाली नाही.’ (नारायण सुर्वे यांची कविता आणि काव्यदृष्टी, पृष्ठ २२२, २२३)
वैश्विक मानवतावादी विचारांचे प्रकाशमूल्य सुर्वे यांच्या कवितेचे प्राणतत्त्व होते. ‘भागो नहीं, बदलो’ हा लढावू बाणा स्वीकारणाऱ्या या कवितेने कुसुमाग्रजांचा ‘सामिलकी’चा विचार प्रत्यक्ष आचरणात आणला, ‘माणसांनाच माणसाचा आधार घेतल्याशिवाय भागत नाही’ ही विश्वबंधुत्वाची जाणीव सुर्वे यांच्या कवितेचे बळ आहे.
सुर्वे यांनी कष्टकरी, शोषित, पीडित, वेश्या, पोर्टर, कामगार, पोस्टर अडकवणारी मुले, याकुब नालबंदवाला, दाऊद शीगवाला, चंद्रा नायकीन, इसल्या, हणम्या, कंडक्टर, ड्रायव्हर, शाळा मास्तर, पोस्टमन या आणि कितीतरी माणसांना आपल्या कवितेत नायकत्व बहाल केले आहे. या माणसांना नायकत्व देतानाच सुर्वे यांनी भारतातील अलक्षित वास्तवाला पहिल्यांदा उजेडात आणले. ही माणसे, त्यांचे जग, त्यांचे जगणे आदी बाबींचा रसरशीत आणि जिवंत आशय घेऊन कवितेत आली; त्याच वेळी जगाच्या नकाशावर, देशाच्या इतिहासात, ‘सारस्वतां’च्या आणि शोषण करणाऱ्या परंपरेच्या छातीवर या माणसांतील सृजनात्मकतेची, सामर्थ्यांची मुद्रा उमटली. ‘रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे’ या शब्दातील ‘आणखी काही’ म्हणजे ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकार, समता, न्याय वैचारिक गुलामगिरीतून मुक्तता आदी अनेक बाबी सुर्वे यांच्या कवितेने या माणसांना मिळवून देण्याची भाषा केली. सुर्वे युग म्हणजे ‘आणखी काही हवे आहे’ या शब्दांच्या मागचा सारा आशय प्रत्यक्षातील माणसांना मिळवून देण्याचा जाहीरनामा होय.
माणसांच्या मनातील निरपेक्ष माणुसकी जागृत करण्याचा ध्यास म्हणजे सुर्वे यांची कविता होय. माणसांच्या मनातील निरपेक्ष माणुसकी जागृत करणारा विचार, वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून मनामनात चेतवण्याचे कवितेचे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यप्रवाहातील सुर्वे युग होय. माणसाच्या माणूसपणाला प्रतिष्ठा देणे, सृजनाचा स्वर देणे, बंधुतेचा हात देणे, समतेचा प्रकाश देणे, विचार आणि स्वातंत्र्याची कृतिप्रवणता देणे, नीतिमत्तेची दृष्टी देणे, विश्वात्मक मानवतावादाचे मन आणि मेंदू देणे म्हणजे सुर्वे युगाची कविता होय.
सुर्वे यांच्या कवितेतील स्त्री लढावू बाण्याची आहे. ही स्त्री सृजनात्मा आणि सामर्थ्यवान अशी आहे, प्रेयसी, पत्नी, आई, संपातील सहकारिणी, कामगार, वेश्या, चंद्रानायकीण, गर्भारशी अशी कितीतरी स्त्री रूपे या कवितेमध्ये भेटतात, ही सारी स्त्री रूपे अत्यंत समंजस, प्रगल्भ आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम अशी आहेत. युगभान, विश्वभान, आत्मभान, समाजभान गवसलेली सृजनशील अशी स्त्री सुर्वे यांच्या कवितेत आहे. नवसमाजरचनेचा ध्यास असणारी, ‘योद्धा स्त्री’ सुर्वे यांच्या कवितेत भेटते. स्त्रीचे स्त्रीत्व ही तिची मर्यादा नाही, तर स्त्रीचे स्त्रीत्व हेच तिचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याला सृजनाचा आणि मानवतावादी विचारांचा स्वर आहे.
विद्रोह, वैचारिकता आणि कलात्मकतेचा त्रिवेणी संगम म्हणजे सुर्वे युगाची कविता होय. या विद्रोहाला क्रांतीच्या परिवर्तनाच्या नितांत सुंदर संस्कृतीचा ध्यास आहे. विश्वात्मक मानवतावादी मूल्यांचा कणा या वैचारिकतेला लाभला आहे. हा विद्रोह आशय, अभिव्यक्तीतील विद्रोह तर आहेच, पण या विद्रोहाचा पाया समर्थ आणि सृजनशील माणुसकीच्या विचारांचा आहे. विद्रोह, वैचारिकता आणि नवी जीवनमूल्याधिष्ठित कलात्मकता यांच्या आधारे सुर्वे यांची कविता ‘नवी राजमुद्रा’ घडवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत राहिली, शब्दांच्या हाती फुले आणि खड्गे देत राहिली. माणसातील ‘सृजनात्मा’चा गौरव करत राहिली. मराठी कवितेत हे सारे नवे होते, विश्वात्मक मानवतावादाचे सुर्वे युग या कवितेने मराठी साहित्य विश्वात आणले, त्या सुर्वे युगाच्या कवितेने परिघाबाहेरच्या माणसांना जगण्याचे, माणुसकीचे, लढण्याचे, विद्रोहाचे, वैचारिकतेचे जीवनमूल्यांनी परिपूर्ण कलात्मकतेचे सामर्थ्य दिले आहे. सुर्वे यांच्या विचारशील विद्रोहाची कविता भारतीय कवितेचे ऐश्वर्य होय.
अजय देशपांडे
संपर्क : ९८५०५९३०३०
Read About : Why do flowers have fragrance : फुलांना सुगंध का असतो?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.