Why do flowers have fragrance : सुगंध हा माणसाचा वीक पॉईंट आहे. कोणत्याही सुगंधानं तो उल्हासित होतो. त्याच्या मनोवृत्ती बहरून येतात, त्यामुळेच निसर्गानं त्याची तजवीज केलेल्या सुगंधी फुलांकडे तो आकर्षित होतो. पहाटेच्या गारव्यातला मोगऱ्याचा दरवळ, गुलाबाचा मंद गंध, जाई, जुई, चमेली चाफा यांचं त्याला वेडच आहे. रात्रीच्या निवांत क्षणी दूरवरून येणारा आणि अंगणभर पसरणारा रातराणीचा मोहक सुगंध त्याला प्रफुल्लित करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलणाऱ्या सोनटक्क्याच्या मदभरी सुगंधानं तर किती तरी प्रेमी जीवांना अधिकच जवळ आणलं आहे आणि हा सुगंध त्या त्या क्षणांपुरताच न राहता पाहिजे त्या वेळी मिळावा म्हणून त्यानं या सुगंधांना बंदिस्त करून त्यांचं अत्तरात रुपांतर करण्याचं तंत्रज्ञानही विकसित केलं आहे.
फुलांना सुगंध मिळतो तो आपल्याला रिझवण्यासाठीच असा समज आपण करून घेतला आहे. ती अर्थात माणसाच्या आत्मकेंद्री प्रवृत्तीची खूण आहे. तो आपला गैरसमज आहे, कारण निसर्ग कोणत्याही निर्जीव, सजीव घटकांना त्यांचे गुणधर्म त्यांच्याच भल्यासाठी, वाढीविकासासाठी बहाल करतो. फुलांचा सुगंधही याला अपवाद नाही, म्हणूनच मग फुलांना सुगंध का असतो असा सवाल खडा होतो. प्रत्येक सजीवाच्या वंशवृद्धीसाठी त्याला पुढच्या पिढीला जन्म देण्याची स्थिती प्राप्त व्हावी लागते. प्राणीमात्रांमध्ये यासाठी त्यांना ऋतूप्रारंभ व्हावा लागतो. वनस्पतींनाही याची आवश्यकता असते, त्यामुळे फुलांमध्ये असलेल्या परागांचं परागीकरण होणं आवश्यक असतं. बाकीबाब बोरकरांनी पावसाचं वर्णन करताना एक अफलातून कल्पना वापरली आहे. ‘सरीवर सरी’ या आपल्या काव्यात ते म्हणतात, ‘वेली ऋतूमती झाल्या गं, सरीवर सरी आल्या गं.’
पण, या परागीकरणासाठी फुलांना कोणत्या तरी मध्यस्थावर अवलंबून राहावं लागत. काहींच्या बाबतीत यासाठी वाऱ्याची मदत मिळते, पण प्रत्येकालाच ती सोय उपलब्ध नसते. त्यामुळे एका फुलावरचे पराग दुसरीकडे वाहून नेण्याची कामगिरी, पाहुण्यांना म्हणजेच पक्षी, कीटक मधमाश्या फुलपाखरं, पतंग, माश्या, भुंगे, अगदी काही ठिकाणी वटवाघुळांनाही करावी लागते. पण, त्यासाठी हे मध्यस्थ आधी त्या फुलांकडे आकर्षित तर व्हायला हवेत! त्यासाठीच फुलांचा सुगंध म्हणजे निसर्गाने तयार केलेली एक प्रकारची ‘जाहिरात’ आहे. जसं एखादं दुकान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठा फलक लावतं, तसंच फूल आपल्या परागीकरणासाठी योग्य कीटकांना बोलावण्यासाठी हवेत सुगंध पसरवत असतं. फुलांचं अंतिम उद्दिष्ट असतं बीज तयार करणं. त्यासाठी एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या किंजदलावर पोहोचणं आवश्यक असतं. या प्रक्रियेला परागीकरण म्हणतात. बहुसंख्य फुलझाडांना कीटक किंवा इतर प्राण्यांची मदत घ्यावी लागते. या मदतनीसांना आकर्षित करण्यासाठी फुलं रंग, आकार, मध आणि सुगंध अशा अनेक साधनांचा वापर करतात. वैज्ञानिकांच्या मते रंग आणि सुगंध ही फुलांची सर्वात प्रभावी संवादाची साधनं आहेत.
असं परागीकरण झाल्याशिवाय फुलांचं फळात रुपांतर होत नाही. त्या फळांमधल्या बिया इतस्तत: पसरल्या की नवीन वनस्पतीची रुजवात होते. पण, प्रत्येक वनस्पतीला फळं येत नाहीत. अशा फळविरहित वनस्पतींना परागीकरणाची गरज का भासावी असा प्रश्न सहाजिकच मनात आला तर नवल नाही. पण, फळ नसलं तरी नवीन बीज तयार होण्याची आवश्यकता असतेच. त्याकरिताच मग परागीकरणाचा अवलंब करावा लागतो. फुलांचा सुगंध म्हणजे एखादं एकच रसायन नसतं. तो अनेक सुगंधी रेणूंच्या मिश्रणातून तयार होतो. या रेणूंना ‘अस्थिर सेंद्रिय संयुगे’ किंवा व्होलटाइल ऑरगॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. ‘अस्थिर’ म्हणजेच ते सहज हवेत उडून जातात, म्हणूनच फूल दूरवर असूनही त्याचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचतो. ही संयुगे फुलांच्या पाकळ्यांमधील पेशींमध्ये तयार होतात. पानांमध्ये प्रकाशसंश्लेषणातून तयार झालेली साखर फुलांपर्यंत पोहोचते. या साखरेपासून वनस्पतीतील विविध विकारांच्या, एन्झाइम्सच्या मदतीने अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात. त्यातून तीन प्रमुख प्रकारची सुगंधी संयुगे तयार होतात.
पहिला गट म्हणजे टर्पेनॉइड्स. यामुळे लिंबासारखा, पाइनसारखा किंवा ताजा सुगंध तयार होतो. दुसरा गट म्हणजे फिनाइल प्रोपेनॉइड्स. गुलाब, लवंग किंवा व्हॅनिलासारख्या गोडसर सुगंधामागे ही संयुगे असतात. तिसरा गट म्हणजे फॅटी ॲसिडपासून तयार होणारी संयुगे. ही हिरव्या पानांचा किंवा फळांचा ताजा गंध निर्माण करतात. प्रत्येक फुलात या संयुगांचं प्रमाण वेगळं असतं, म्हणूनच गुलाब, जाई, मोगरा, कमळ किंवा सोनचाफा यांचा सुगंध एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. विशेष म्हणजे एका फुलातून कधी कधी शंभरहून अधिक वेगवेगळे सुगंधी रेणू बाहेर पडत असतात. त्यांचं प्रमाण अगदी थोडं बदललं तरी सुगंधाची छटा बदलते, त्यामुळे प्रत्येक फुलाला स्वत:ची वेगळी ‘सुगंध-स्वाक्षरी’ मिळते. म्हणजेच प्रत्येक फूल आपल्या ‘लक्ष्य ग्राहकांनुसार’ सुगंधाची रचना करतं असं म्हणायला हरकत नाही.
आपल्याला वाटतं की सुगंध म्हणजे फक्त सुगंध, पण कीटकांच्या जगात तसं नसतं. प्रत्येक कीटकाची घ्राणशक्ती वेगळी असते. मधमाशांना काही विशिष्ट सुगंध आवडतात, तर फुलपाखरं दुसऱ्या प्रकारच्या सुगंधाकडे आकर्षित होतात. काही पक्षी रंगावर अधिक भर देतात आणि त्यांना सुगंधाची फारशी गरज नसते, त्यामुळे ज्या फुलांचं परागीकरण पक्षी करतात, त्यांना अनेकदा फारसा सुगंध नसतो. रातराणी, निशिगंध, ब्रम्हकमळ यांसारखी अनेक फुलं रात्री अधिक सुवासिक का वाटतात? कारण त्यांचं परागीकरण करणारे प्रमुख पाहुणे म्हणजे रात्री फिरणारे पतंग किंवा काही ठिकाणी वटवाघुळे असतात. अंधारात रंग फारसे दिसत नाहीत, त्यामुळे या प्राण्यांना फुलं शोधण्यासाठी सुगंधाचीच मदत घ्यावी लागते, म्हणूनच रात्री उमलणारी फुलं बहुधा पांढरी किंवा फिकट रंगाची असतात आणि त्यांचा सुगंध अतिशय तीव्र असतो. सूर्य मावळल्यानंतरच त्यांच्या सुगंधी संयुगांचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात सुरू होतं.
याउलट दिवसा फुलणारी फुलं मधमाश्या आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. या कीटकांना रंग उत्तम दिसतात, म्हणून अशी फुलं लाल, पिवळी, निळी किंवा जांभळी अशी रंगीत असतात. त्यांचा सुगंध तुलनेने सौम्य असतो आणि तो सकाळपासून दुपारपर्यंत जास्त प्रमाणात बाहेर पडतो; म्हणजेच फुलं आपल्या ‘कामाच्या वेळेनुसार’ सुगंधाचं उत्पादन नियंत्रित करतात. सुगंध म्हणजे नेहमीच मधुर गंध नसतो. काहींचा गंध तर कुजलेल्या मांसासारखा किंवा मृत प्राण्यासारखा येतो. टायटन ॲरम, स्टेपेलिया यांसारख्या वनस्पती यासाठी प्रसिद्ध आहेत. या वनस्पतींना मधमाश्यांची गरज नसून माश्या आणि काही विशिष्ट भुंगे हवेत. हे कीटक नेहमी कुजलेल्या मांसाकडे किंवा सडलेल्या वस्तूंकडे आकर्षित होतात, त्यामुळे या फुलांनी उत्क्रांतीच्या प्रवासात कुजलेल्या मांसाचा गंध निर्माण करणारी रसायनं तयार करण्याची क्षमता विकसित केली आहे.
वनस्पतींचे सुगंध नेहमीच पाहुण्यांना बोलावण्यासाठी वापरले जातात असं नाही. काही वेळा ते शत्रूंना दूर ठेवण्यासाठीही उपयोगी पडतात. सिट्रोनेला ही अशीच एक वनस्पती. तिच्या पानांमधून बाहेर पडणाऱ्या सिट्रोनेलॉल, सिट्रोनेलाल, जेरॅनिऑल यांसारख्या सुगंधी संयुगांचा गंध माणसाला ताजा आणि आनंददायी वाटतो, पण डासांना तो अजिबात आवडत नाही, त्यामुळे ते त्या परिसरापासून दूर राहतात, म्हणूनच सिट्रोनेला तेलाचा वापर मेणबत्त्या, स्प्रे, क्रीम आणि इतर मच्छर-प्रतिबंधक उत्पादनांमध्ये केला जातो. वनस्पतीच्या दृष्टीने ही रसायनं स्वत:चं संरक्षण करण्याचं साधनं आहेत; माणसाने त्याचा आपल्या सोयीसाठी उपयोग करून घेतला आहे.
बाळ फोंडके
balphondke@gmail.com
Read About : Philtrum Explained : ओठांवर खळी का आहे?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.