Ad Advertisement Ad Advertisement

Uranus Neptune Magnetic Field – युरेनस आणि नेपच्यूनच्या विचित्र चुंबकीय क्षेत्राचे गूढ उलगडणार; काही दशकांतच बदलू शकतात ध्रुव

पृथ्वीच्या तुलनेत युरेनस आणि नेपच्यूनचे चुंबकीय क्षेत्र प्रचंड तिरपे

ऑस्टिन (अमेरिका) : Uranus Neptune Magnetic Field १९८० च्या दशकात नासाच्या ‘व्हॉयेजर २’ यानाने युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचे निरीक्षण केल्यापासून, या दोन्ही ग्रहांच्या अत्यंत तिरप्या आणि विचित्र चुंबकीय क्षेत्राचे कोडे शास्त्रज्ञांना पडले होते. आता ‘युनिर्व्हसिटी ऑफ टेक्सास ॲट ऑस्टिन’च्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने संगणकीय सिम्युलेशनच्या मदतीने यामागचे रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे.

‘कम्युनिकेशन्स फिजिक्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, या हिममहाकाय ग्रहांच्या अंतर्भागातील अत्यंत टोकाच्या परिस्थितीमुळे तिथल्या पदार्थांची विद्युत वाहकता बदलते, ज्यामुळे हे विचित्र चुंबकीय क्षेत्र तयार होते. विशेष म्हणजे, या ग्रहांचे चुंबकीय ध्रुव पृथ्वीच्या तुलनेत अत्यंत वेगाने म्हणजेच अवघ्या काही दशकांतच कित्येक अंशांनी सरकू शकतात, असा धक्कादायक अंदाज या मॉडेलमधून वर्तवण्यात आला आहे.

अत्यंत तिरपे चुंबकीय क्षेत्र

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिच्या परिवलन अक्षाशी जवळपास समांतर असून ते केवळ ११ अंशांनी झुकलेले आहे. याउलट, युरेनसचे चुंबकीय क्षेत्र तब्बल ५९ अंशांनी, तर नेपच्यूनचे ४७ अंशांनी झुकलेले आहे.

अंतर्भागातील विद्युत वाहकतेचा परिणाम

युरेनस आणि नेपच्यून पृथ्वीपेक्षा चौपट मोठे असून त्यांच्या गाभ्यात पाणी, अमोनिया, मिथेन आणि खडकाळ पदार्थ आहेत. तिथल्या प्रचंड दाब आणि तापमानामुळे पाण्याचे रेणू तुटून त्यांचे ‘आयन्स’मध्ये (विद्युत प्रभारित कण) रूपांतर होते. जस जसे खोलवर जावे तसतशी या पदार्थांची विद्युत वाहकता वाढत जाते, ज्याचा थेट परिणाम ग्रहांचे चुंबकीय क्षेत्र तयार करणाऱ्या ‘डायनॅमो’ प्रक्रियेवर होतो.

काही दशकांतच ध्रुवांमध्ये मोठा बदल

पृथ्वीचा चुंबकीय अक्ष ५० वर्षांत जेमतेम एखाद्या अंशाने सरकतो. मात्र, युरेनस आणि नेपच्यूनचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत अस्थिर असून ते काही दशकांतच डझनभर अंशांनी बदलू शकते. त्यामुळे १९८० मध्ये व्हॉयेजर २ ने पाहिलेले चुंबकीय क्षेत्र आज पूर्णपणे बदललेले असण्याची शक्यता आहे.

जेम्स वेब दुर्बिणीतून मिळणार पुरावे

या सिम्युलेशनची पुष्टी करण्यासाठी शास्त्रज्ञ सध्या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ने टिपलेल्या या दोन्ही ग्रहांच्या ध्रुवीय प्रकाशाचा अभ्यास करत आहेत. सूर्यापासून येणारे प्रभारित कण ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्राशी संपर्कात आल्यावर हे प्रकाश तयार होतात. या प्रकाशांच्या रचनेत झालेले बदल तपासून चुंबकीय ध्रुव किती सरकले आहेत याचा अचूक अंदाज लावता येणार आहे.

Read About : China Moon Landing 2030 : 2027 पासून चाचण्या, 2030 मध्ये दोन अंतराळवीर चंद्रावर उतरणार
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.