सुनेत्रा-पार्थ पवार यांच्यासमोर नेतृत्व जपण्याचे, तर शरद पवारांपुढे पुरोगामी प्रतिमा टिकवण्याचे आव्हान
मुंबई : NCP Merger राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली असली, तरी या एकत्रीकरणातून दोन्ही बाजूंच्या पवार कुटुंबाला नेमका किती राजकीय लाभ होणार, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. वरकरणी राष्ट्रवादीची ताकद एकत्र आणून पक्षाला नव्याने उभारी दण्याचा हा प्रयत्न वाटत असला, तरी नेतृत्वाची सूत्रे कोणाकडे राहणार, पक्षाची राजकीय दिशा काय असेल आणि सत्तेतील सहभागाचे भवितव्य काय, हे प्रश्न कळीचे ठरणार आहेत. त्यामुळे संभाव्य विलीनीकरण हे दोन्ही पवारांसाठी राजकीय फायद्यापेक्षा नव्या अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली असून, त्यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आहे. तर, पार्थ पवार यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेतृत्वाची फेररचना अपरिहार्य ठरेल. शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव, सुप्रिया सुळे यांचे संसदीय नेतृत्व, जयंत पाटील यांची संघटनात्मक ताकद, तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे दिल्लीतील राजकीय वजन यामुळे एकत्रित पक्षात नेतृत्वाची अनेक केंद्रे निर्माण होऊ शकतात. अशा वेळी सुनेत्रा पवार यांना पक्षावरील पकड कायम ठेवणे आणि पार्थ पवार यांना ज्येष्ठ नेत्यांच्या प्रभावाशी स्पर्धा करत स्वतंत्र नेतृत्व निर्माण करणे आव्हानात्मक ठरू शकते.
शरद पवारांसमोर वैचारिक भूमिकेचा पेच
शरद पवार यांच्यासाठी विलीनीकरणाचा प्रश्न केवळ एकत्रीकरणापुरता मर्यादित नाही. २०२३ मधील फुटीनंतर त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेत महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात आपले स्थान कायम ठेवले. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी विचार आणि विरोधकांची एकजूट या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपप्रणित महायुतीचा घटक असून सत्तेत सहभागी आहे. विलीनीकरणानंतर पक्ष महायुतीत राहिल्यास शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते; तर भाजपपासून फारकत घेतल्यास सत्तेतील सहभाग आणि सत्ताधारी गटातील नेत्यांचे हितसंबंध धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे संख्याबळ वाढवण्याबरोबरच आपली स्वतंत्र राजकीय ओळख आणि पुरोगामी प्रतिमा जपण्याचे आव्हान शरद पवारांसमोर असेल.
सुनेत्रा-पार्थ यांच्यासाठी ‘घाट्याचा सौदा’?
सध्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस राज्य आणि केंद्रातील सत्तेत सहभागी असून, पक्षातील सर्वोच्च पदे त्यांच्याकडे आहेत. पार्थ पवार यांचाही पक्षात प्रभाव वाढत आहे. विलीनीकरण झाल्यास पक्षातील सत्ताकेंद्रांचे विकेंद्रीकरण होऊन शरद पवार, सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेत्यांचा निर्णयप्रक्रियेवर प्रभाव वाढू शकतो. संघटनात्मक निर्णयांमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे वर्चस्व वाढल्यास सुनेत्रा आणि पार्थ पवार यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागू शकते. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली तरी दोघांचे स्वतंत्र राजकीय वजन कमी होण्याचा धोका असल्याने हे विलीनीकरण त्यांच्या दृष्टीने ‘घाट्याचा सौदा’ ठरण्याची शक्यता आहे.
तिसरा गट निर्माण होण्याची भीती?
विलीनीकरणानंतर एकत्रित राष्ट्रवादीने महायुतीत राहण्याचा निर्णय घेतल्यास, भाजपविरोधी भूमिका घेणारे आमदार रोहित पवार व शरद पवार गटातील काही नेते नाराज होऊ शकतात. अशा स्थितीत एकत्रीकरणाऐवजी पक्षात पुन्हा फूट पडून तिसरा गट निर्माण होण्याची किंवा काही नेते काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
विलीनीकरणाच्या तर्कवितर्कांना आणखी हवा
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला असतानाच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील अथवा त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या शक्यतेवरून गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. या भेटीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली का, याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विलीनीकरणाच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे जाणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांचे खंडन केले आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असतानाच, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीने नव्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
सुनेत्रा पवारांशी विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही : मुख्यमंत्री
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी शनिवारी झालेल्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसून, त्या केवळ शासकीय कामासाठी भेटायला आल्या होत्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाबाबत अद्याप कोणीही आपल्याशी बोललेले नाही; या चर्चा केवळ माध्यमांत सुरू असून त्यातून पतंगबाजी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तेत एकत्र आहोत. त्यामुळे विलीनीकरणाची काही चर्चा सुरू असती, तर संबंधितांनी आम्हाला नक्कीच कल्पना दिली असती. प्रत्यक्षात कोणीही काही सांगितलेले नसल्याने या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही. दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व राज्यांत लोकसभेच्या जागांमध्ये समान ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आणल्यास पूर्ण पाठिंबा देऊ, असे सुळे यांनी स्वत: स्पष्ट केल्याने आता ही पतंगबाजी थांबायला हवी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Read About : NCP Merger Talks – अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय संपला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.