Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Ring Road – पुण्याच्या धर्तीवर शहरासाठी रिंगरोड उभारणार – 2026

शेंद्रा-बिडकीन-साजापूरदरम्यान सहापदरी रस्त्याचा प्रस्ताव; भूसंपादनासाठी सर्वेक्षण, शहरातील रस्ते रुंदीकरण मोहीमही पुन्हा सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Ring Road छत्रपती संभाजीनगर ते बिडकीनदरम्यान सहापदरी रस्ता उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या रस्त्याचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. तसेच पुण्याच्या धर्तीवर शहरासाठी रिंगरोड उभारण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

औद्योगिक क्षेत्रातील दळणवळण अधिक सुलभ

औद्योगिक क्षेत्रातील दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगावदरम्यान सहापदरी रस्ता तयार केला जाणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील औद्योगिक संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल,असे सावे यांनी सांगितले. शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम कोणत्याही राजकीय कारणामुळे थांबविण्यात आलेली नाही. दिवाळी सणामुळे ही मोहीम काही काळ थांबली होती. आता दिवाळी संपल्यानंतर महापालिका आयुक्तांशी याबाबत चर्चा करण्यात आली असून, रस्ते रुंदीकरणाचे काम लवकरच पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या भविष्यातील विकासासाठी रिंगरोड आवश्यक आहे. शेंद्रा ते बिडकीन आणि पुढे ढोरेगावमार्गे जोडणी करून संपूर्ण वर्तुळाकार मार्ग तयार करण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय पर्यायी मार्गांचाही विचार केला जात आहे. आगामी औद्योगिक गुंतवणूक आणि शहराचा विस्तार लक्षात घेता रिंगरोडची आवश्यकता असल्याचे सावे यांनी नमूद केले.

चितेगाव, ढोरकीनला बायपास

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निविदा मागविल्या आहेत. संबंधित प्रकल्पाचा डीपीआर १२० दिवसांत सादर होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे संबंधित मार्गावरील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावरील चितेगाव, बिडकीन आणि ढोरकीन या गावांच्या बाहेरून चारपदरी बायपास रस्ते उभारण्याची तयारीही सुरू आहे.

Read About : Bengaluru Metro – मेट्रो प्रकल्पांचा 80 टक्क्यांहून अधिक आर्थिक भार राज्यावर; केंद्राच्या निधी धोरणात बदलाची मागणी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.