आधुनिक मानवांसोबत पृथ्वीवर अस्तित्वात होत्या इतर मानवी प्रजाती; शारीरिक रचना, जनुकीय वैशिष्ट्ये, शिकार करण्याची पद्धत आणि जीवनशैलीत होते महत्त्वाचे फरक
वॉशिंग्टन : Neanderthal and Denisovan Humans हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर आधुनिक मानवांसोबतच इतरही अनेक मानवी प्रजाती वास्तव्यास होत्या. यामध्ये निअँडरथल या दोन अत्यंत जवळच्या मानवी प्रजातींचा समावेश होता. आधुनिक मानवांची उत्क्रांती आफ्रिकेत झाली, तर निअँडरथल हे युरोप आणि आशिया खंडात उत्क्रांत झाले. एकाच काळात राहूनही या तिन्ही प्रजातींमध्ये काही सूक्ष्म शारीरिक आणि जीवनशैलीविषयक फरक होते, ज्यामुळे केवळ आधुनिक मानवच आजपर्यंत टिकून राहिला.
उत्क्रांती आणि शारीरिक रचना
जनुकीय अभ्यासानुसार, सुमारे ७ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव निअँडरथलपासून वेगळे झाले, तर सुमारे ४ ते ५ लाख वर्षांपूर्वी निअँडरथल आणि डेनिसोव्हन या दोन प्रजाती वेगळ्या झाल्या. आधुनिक मानव उंच आणि सडपातळ होते, तर युरोप व पश्चिम आशियातील कडाक्याच्या थंडीशी जुळवून घेण्यासाठी निअँडरथल बुटके आणि धिप्पाड होते. निअँडरथल मानवांची कवटी लांबट असून मागील बाजूस एक विशिष्ट उंचवटा असायचा. तसेच त्यांचे नाक आणि चेहरा मोठा व पुढे आलेला होता. याउलट, डेनिसोव्हन आणि आधुनिक मानवांचे चेहरे तुलनेने सपाट होते. निअँडरथल मानवांच्या खांद्याच्या हाडांवर विशिष्ट खोबण असायची आणि त्यांची ओटीपोटाची हाडे आधुनिक मानवांपेक्षा रुंद होती.
जीवनशैली आणि शिकार करण्याची पद्धत
पोर्तुगालपासून मध्य आशियापर्यंत निअँडरथल मानवांचे अनेक अवशेष सापडले आहेत, तर डेनिसोव्हन मानवांचे फार कमी जीवाश्म उपलब्ध आहेत. असे असले तरी या तिन्ही प्रजातींची जीवनशैली बऱ्याच अंशी सारखीच होती. तिन्ही गट मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार करत असत. पूर्व आशियात राहणाऱ्या डेनिसोव्हन मानवांच्या आहारात वनस्पतीजन्य अन्नाचे प्रमाण अधिक असल्याचे पुरावे मिळाले आहेत. शिकारीसाठी निअँडरथल आणि आधुनिक मानव दगडापासून धारदार शस्त्रे बनवण्याच्या एका खास तंत्राचा वापर करत होते, जे सुमारे ३ लाख वर्षांपूर्वी विकसित झाले होते.
Read About : Robotic Cardiac Surgery in India : रोबोटिक हृदयशस्त्रक्रियेत 2031 पर्यंत भारत अमेरिकेलाही पछाडणार?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.