जपान, ब्राझील आणि फिलीपिन्ससह १० देशांत विक्रीसाठी मंजुरी मिळाल्याचा दावा
नॉरविच (ब्रिटन) : Non-Browning Bananas केळी सोलून किंवा कापून ठेवल्यानंतर काही वेळातच ती मऊ आणि काळी-तपकिरी पडतात. मात्र, आता शास्त्रज्ञांनी जगात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या कॅव्हेंडिश जातीच्या केळ्यांमध्ये जनुकीय बदल करून काळी न पडणारी केळी विकसित केली आहेत. ही केळी सोलल्यानंतर किंवा कापल्यानंतरही दीर्घकाळ ताजी आणि पिवळीधमक राहतील. ब्रिटनच्या नॉरविच येथील ट्रॉपिक बायोसायन्सेस या कंपनीने क्रिस्पर-कॅस ९ या प्रसिद्ध जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून ही केळी विकसित केली आहेत.
असे केले संशोधन
- एंझाइमचा मारा रोखला : केळी हवेच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात पॉलिफेनॉल ऑक्सिडेस नावाचे एंझाइम तयार होते, जी केळी काळी पाडण्यास कारणीभूत ठरते. शास्त्रज्ञांनी केळीच्या डीएनए मधील या एंझाइमशी संबंधित तीन जनुकांमध्ये अतिशय सूक्ष्म बदल करून त्यांना स्विच ऑफ म्हणजेच निष्क्रिय केले आहे.
- नैसर्गिक प्रक्रियेसारखेच बदल : ब्रिटनच्या पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने या केळीला प्रिसिजन ब्रेड (अचूक पैदास) म्हणून मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की, हे बदल पारंपरिक संकरित पद्धतीनेही घडू शकले असते. यामध्ये कोणत्याही दुसऱ्या प्रजातीचा बाहेरील डीएनए वापरलेला नाही, त्यामुळे हे कठोर जीएम नियमांतर्गत येत नाही.
- चव आणि आकारात फरक नाही : या केळीची चव, गोडवा, सुगंध आणि पोत हा हुबेहूब आपण बाजारातून आणतो त्याच सामान्य केळीसारखाच आहे.
अन्नाची नासाडी रोखण्यासाठी मोठे पाऊल
ब्रिटनमध्ये केवळ केळी काळी पडल्यामुळे रोज सुमारे १४ लाख खाण्यायोग्य केळी कचऱ्यात फेकली जातात. संपूर्ण जगात उत्पादित होणाऱ्या केळ्यांपैकी जवळपास निम्मे पीक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाया जाते. केळी लवकर खराब न झाल्यास पुरवठा साखळीतील अन्नाची नासाडी आणि कार्बन उत्सर्जन २५ टक्के पेक्षा जास्त कमी होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
सुपरमार्केटमध्ये कधी येणार?
या केळींना यापूर्वीच जपान, ब्राझील आणि फिलीपिन्ससह १० देशांमध्ये विक्रीसाठी मंजुरी मिळाली आहे. आता ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सी कडून अंतिम अन्न सुरक्षा मंजुरी मिळताच ही केळी इंग्लंडमधील सुपरमार्केटच्या शेल्फवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Read About: AI and Jobs : एआय आणि नोकरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.