वाहतूक कोंडी, नागरिकांची रंग गोळा करण्यासाठी गर्दी
गाझियाबाद : Paint Truck Accident उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील तिगडी गोलचक्करजवळ पेंटने (रंग) भरलेला एक ट्रक अचानक उलटल्याची घटना समोर आली आहे. ट्रक उलटल्यामुळे हजारो लीटर पेंट रस्त्यावर सांडला आणि महामार्गाचा एक मोठा भाग रंगाने पूर्णपणे व्यापला गेला. या घटनेनंतर रस्त्यावर सांडलेला महागडा पेंट गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
रस्त्यावर रंगाची नदी; लोकांनी पळवल्या बादल्या
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती आणि व्यावसायिक रंगांचे डबे घेऊन जात होता. तिगडी गोलचक्करजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. अपघात होताच ट्रकमधील शेकडो डबे फुटले आणि लाल, पिवळा, पांढरा अशा विविध रंगांचे मिश्रण रस्त्यावर वाहू लागले. हा प्रकार पाहताच आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी आणि पादचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी अनेक लोक घरातून प्लास्टिकच्या बादल्या, डबे आणि तांबे घेऊन आले आणि रस्त्यावर सांडलेला पेंट भरून पळवून नेऊ लागले. सोशल मीडियावर या अजब चोरीचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांची धाव
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल पेंट आणि केमिकल सांडल्यामुळे संपूर्ण रस्ता अतिशय निसरडा झाला होता, ज्यामुळे अनेक दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाले. अपघातामुळे आणि लोकांच्या गर्दीमुळे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आधी पेंट गोळा करणाऱ्या लोकांना तिथून हाकलून लावले आणि त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने उलटलेला ट्रक बाजूला केला. रस्त्यावरील निसरडा रंग साफ करण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून, पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.