दहशतवाद आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये तणाव; इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचा विरोध
इस्लामाबाद – Pakistan Emergency पाकिस्तानमध्ये वाढता दहशतवाद आणि राजकीय अस्थिरतेमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने खैबर पख्तूनख्वा प्रांतात आणीबाणी आणि गव्हर्नर राजवट लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून, प्रांतातील सुरक्षा व्यवस्था हाताळण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे.
खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी का लागू केली?
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या प्रांतात गेल्या दोन वर्षांत सुमारे ६,२०० दहशतवादी घटना घडल्या असून, यात १,२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रांतीय सरकार दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे आता प्रांतीय सरकारचे सर्व अधिकार गव्हर्नर (राज्यपाल) यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. प्रशासकीय कारभारासाठी ११ सदस्यांची सल्लागार परिषद आणि १२ जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन केले जाईल. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला आहे.
कराचीमध्ये कडक निर्बंध
खैबर पख्तूनख्वामधील घडामोडींनंतर कराचीमध्ये ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यादरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास, रॅली काढण्यास किंवा धरणे-आंदोलन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आणि कायद्याचे राज्य असावे या मागणीसाठी पीटीआय पक्ष कराचीमध्ये मोठ्या आंदोलनाच्या तयारीत होता, ज्याला रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
Read About : Ancient Ethiopian Architecture : 2800 वर्षांपूर्वी 19 मजली इमारती उभारणे शक्य होते?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.