दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील सामान ठेवण्याच्या कप्प्यात आग; केबिन क्रूने अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवली, सर्व प्रवासी सुरक्षित
नवी दिल्ली : Delhi Chennai IndiGo Flight Fire दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात रविवारी (दि. ११) सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. एका प्रवाशाच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून, प्राथमिक माहितीनुसार पॉवर बँकमधील बिघाडामुळे, धूर निघू लागला आणि विमानातील सामान ठेवण्याच्या वरच्या कप्प्यात आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान हैदराबादकडे वळवण्यात आले. विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. या घटनेचा मोबाईल फोनवर चित्रित केलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यात काही प्रवासी आपल्या बॅगच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, केबिन क्रूने अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा उड्डाण
दिल्ली-चेन्नई मार्गावर उडणारे ‘६ ई ६११५’ हे एअरबस ‘ए ३२१-२५१ एन’ विमानात ही घटना घडली. विमानाचे नियोजित उड्डाण दुपारी १:१० वाजता होणार होते; प्रत्यक्षात ते दुपारी १:३० वाजता झाले. चेन्नईत दुपारी ४ वाजता पोहोचण्याचे नियोजन होते. मात्र, विमानात धूर आढळल्यानंतर वैमानिकांनी निर्धारित सुरक्षा प्रक्रियेनुसार हैदराबादकडे विमान वळवण्याचा निर्णय घेतला.
प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था
इंडिगोने निवेदनात म्हटले की, ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या ‘६ ई ६११५’ या विमानात प्रवाशाच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर निघाला. केबिन क्रूने तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर वैमानिकांनी सुरक्षा नियमांनुसार विमान हैदराबाद येथे सुरक्षित उतरवले.
प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू ठेवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. या अनपेक्षित घटनेमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांना अल्पोपहार देणे आणि वेळोवेळी माहिती देणे यांसारख्या उपाययोजना केल्याचे सांगितले. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही इंडिगोने स्पष्ट केले.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.