Ad Advertisement Ad Advertisement

Phoenix Classes Director Mohan Korde Dies by Suicide – ‘मी मेल्यावर तरी दोषींवर कारवाई करा’; क्लासेस संचालकाची आत्महत्या

तीन गाळ्यांच्या मालकीचा वाद : २० वर्षांचा संघर्ष, पण पदरी निराशा आल्याने उचलले टोकाचे पाऊल, चौघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : Phoenix Classes Director Mohan Korde Dies by Suicide तीन गाळ्यांच्या मालकी हक्काचा तब्बल २० वर्षे सुरू असलेला वाद, त्यातून झालेली कथित बदनामी, आर्थिक कोंडी आणि त्यातच घर वाचवण्यासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून पाच कोरे धनादेश घेत केलेली फसवणूक… या सगळ्या घटनांमुळे खचलेल्या ‘फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग अँड लँग्वेज गाईड कोर्स क्लासेस’चे संचालक मोहन शिवराम कोरडे (६०) यांनी विष प्राशन करून जीवन संपविले. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी ‘मी मेल्यावर तरी दोषींवर कारवाई करा’, अशी काळजाला भिडणारी मागणी केली आहे. आयनॉक्स तापडिया, एन १, सिडकोतील क्लासेसच्या कार्यालयात ही घटना घडली. बुधवारी (दि. ७) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी मोहन कोरडे यांची पत्नी सुनिता मोहन कोरडे (५०) यांच्या फिर्यादीवरून विजय रामचंद्र सांगवीकर (रा. श्रेयनगर), सुधा प्रभाकर साने (रा. भडकलगेट), उद्धव राऊत आणि संतोष जाधव या चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. दरम्यान, कोरडे यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन संशयित आरोपी उद्धव राऊत आणि संतोष जाधव यांनी त्यांना कोंडीत पकडले. ५० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. यासाठी कोरडे यांच्याकडून दोन बाँड आणि पाच कोरे धनादेश घेण्यात आले. मात्र, कर्जाची रक्कम न देता हे धनादेश अन्य व्यक्तींना दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या कोरडे यांच्यावर आणखी संकट कोसळले.

मूळ प्रकरण काय?

सुनीता कोरडे यांच्या फिर्यादीनुसार, मोहन कोरडे यांनी २००३ मध्ये विजय सांगवीकर आणि सुधा साने यांच्याकडून सिडको एन-१ येथील तापडिया सिने मार्केटमधील गाळा क्र ७, ८ व ९ हे तीन गाळे किरायाने घेतले होते. २००६ मध्ये कोरडे यांनी हे तिन्ही गाळे खरेदी केले. पूर्ण साडेसात लाख रुपये घेऊनही आरोपींनी हे गाळे कोरडे यांच्या नावावर करून दिले नाहीत. उलट खोटे बाँड बनवून फसवणूक केली. या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा देखील दाखल केलेला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी त्यांच्यावर दाबाव टाकत होते, असा आरोप आहे.

५० तक्रारी, पण दखल नाही

मृत्युपूर्वी मोहन कोरडे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात २००६ पासून २०२५ पर्यंत विविध पोलीस ठाण्यांत त्यांनी सुमारे ५० तक्रारी करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे न्याय मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, मी मेल्यानंतर तरी या प्रकरणाची क्राईम ब्रांच किंवा एसआयटी मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करा, माझ्या घराच्या लिलाव प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन न्याय मिळेपर्यंत कुटुंबाला संरक्षण द्या आदी मागण्या केल्या आहेत.

असा आहे २० वर्षांचा संघर्षमय घटनाक्रम
  • २००३ ते २००६ : गाळे भाड्याने घेतले आणि नंतर साडेसात लाख रुपये देऊन खरेदी केले. २०१२ : न्यायालयाच्या आदेशाने साने, सांगवीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल, तत्कालिन उपनिरीक्षक के एस खोड यांच्याकडे तपास. मात्र, १३ वर्षे यात काहीही तपास झाला नाही.
  • २०२५ : – कोरडे उच्च न्यायालयात गेले. कोर्टाने फेरतपासाचे आदेश दिले. आधी हा तपास सहायक निरीक्षक कैलास लहाने यांच्याकडे नंतर सिडकोचे सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आला.
  • जुलै २०२६ मध्ये सहायक निरीक्षक भरत पाचोळे यांच्याकडे प्रकरण वर्ग केले.
  • जुलै २०२६ : पाचोळे यांनी आरोपींना चौकशीसाठी बोलावले असता, अटकेच्या भीतीने आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे जामीन फेटाळला.
  • २१ जुलै २०२६ : उच्च न्यायालयाकडून आरोपींना अटी-शर्तींसह अंतरिम जामीन मंजूर.
  • ६ ऑक्टोबर २०२६ : १६.५० लाखांच्या थकबाकीपोटी बँकेकडून घर जप्तीची नोटीस. दुपारी २.५१ वाजता फिनिक्स क्लासच्या कार्यालयातच विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर डायल ११२ वर फोन करून पोलिसांना कळवले.
  • ७ ऑक्टोबर २०२६ : चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) उपचारादरम्यान पहाटे ४.३० वाजता मृत्यू.

Read About : AI Crime Planning – हत्येचा कट रचण्यासाठी आयटी इंजिनिअरने एआयला विचारले प्रश्न; फॉरेन्सिक तपासात धक्कादायक खुलासे
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.