Plastic to Fuel : प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल-डिझेल? शास्त्रज्ञांनी शोधली कमी खर्चाची पद्धत
कमी ऊर्जा आणि खर्चात प्लास्टिकचे इंधनात रूपांतर
वॉशिंग्टन : Plastic to Fuel – जागतिक स्तरावर डोकेदुखी ठरलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि इंधन क्षेत्राला नवीन दिशा देण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी’ मधील संशोधकांनी टाकाऊ प्लास्टिक पिशव्यांपासून थेट ‘पेट्रोल आणि डिझेल’ तयार करण्याची एक नवी, सोपी आणि स्वस्त पद्धत शोधून काढली आहे.
आपण रोजच्या व्यवहारात वापरत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या आणि पॅकिंग साहित्यामध्ये ‘पॉलिथिलीन’ या घटकाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे प्लास्टिक सहजासहजी विघटित होत नसल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. शास्त्रज्ञांनी याच टाकाऊ पॉलिथिलीनच्या रासायनिक साहित्याला तोडून त्याचे थेट वाहनांमध्ये वापरण्यायोग्य द्रव इंधनात रूपांतर करण्यात यश मिळवले आहे.
यापूर्वी प्लास्टिकपासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत प्लॅटिनम किंवा पॅलेडियमसारख्या अत्यंत महागड्या धातूंचा वापर करावा लागत असे. त्यामुळे हे तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र, ‘ओक रिज’च्या शास्त्रज्ञांनी या प्रयोगात अॅल्युमिनियम-आधारित स्वस्त कॅटॅलिस्टचा (उत्प्रेरक) वापर केला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी ऊर्जेत आणि कमी खर्चात प्लास्टिकचे इंधनात रूपांतर करणे शक्य झाले आहे.
पर्यावरण संवर्धनाला मिळणार गती
या शोधामुळे भविष्यात प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे अत्यंत सोपे होणार असून कचऱ्याला थेट आर्थिक मूल्य प्राप्त होईल. तसेच, निसर्गातील कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि इंधन निर्मितीच्या दृष्टीने हे संशोधन ‘कचऱ्यातून समृद्धी’ देणारे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
Read About: UPI Payment New Rules : यूपीआयने पेट्रोल-डिझेल भरता? 15 ऑक्टोबरनंतर बदलू शकते पेमेंटची पद्धत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.