Putin and Russia : निवडणुकीच्या आधी ट्रम्प यांचे प्रतिनिधी पुतीन आणि झेलेन्स्कीना भेटले. युद्ध थांबवण्यासाठी शिष्टाई केली. कधी दोघांनाही लोणी लावलं, कधी दोघांना दमदाटी केली. टॅरिफ लावून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. रशिया दाद देत नाही. टॅरिफचं शस्त्र बोथट झालंय.
रशियाच्या लोकसभेची (ड्यूमा) निवडणूक पार पडली. आधीची निवडणूक २०२२ साली झाली होती. तेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं नव्हतं. लोकसभेचे ४५० सदस्य असतात. पडलेल्या मतांच्या ५७.८ टक्के मतं मिळवून पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीनं ३५५ जागा मिळवल्या आहेत. १३ टक्के जागा मतं घेऊन कम्युनिस्ट पार्टीचे ४० सदस्य निवडून आले. सर्व पक्षांत मिळून ४९ सदस्य लष्करातले आहेत, ते युक्रेन युद्धात लढले आहेत.
१९९९ साली ऑगस्टमध्ये राष्ट्रपती येल्तसिन यांनी पुतीनना पंतप्रधानपदी नेमलं. रशियात राष्ट्रपतीची निवड मतदार करतात आणि पंतप्रधान राष्ट्रपती नेमतो. या नेमणुकीला नंतर ड्यूमा मंजूरी देत असते. १९९९ च्या डिसेंबरमध्ये येल्तसिननी राजीनामा दिला, पुतीन हंगामी राष्ट्रपती झाले, नंतर २००० च्या निवडणुकीत निवडून आले. २००० ते २००८ अशा दोन खेपा ते राष्ट्रपती होते. राज्यघटनेनुसार दोनच कार्यकाळ मिळत असल्यानं त्यांना राष्ट्रपतिपदापासून दूर व्हावं लागलं. मेदवेदेव या आपल्या माणसाला त्यांनी राष्ट्रपतिपदी निवडून आणलं आणि मेदवेदेवनी पुतीन यांना पंतप्रदानपदी नेमलं. अर्थातच पुतीनच सर्वेसर्वा होते.
२००८ ते २०१२ पुतीन पंतप्रधान होते. २०१२ साली त्यांनी निवडणूक लढवली, पुन्हा राष्ट्रपती झाले. चार वर्षांच्या दोन खेपा मिळून ते २०२० पर्यंत राष्ट्रपतिपदी राहिले. आता पुन्हा राष्ट्रपतिपदी राहता येत नव्हतं. पुतीननी दोन घटना दुरुस्त्या केल्या. एक- राष्ट्रपतिपदाची मुदत सहा वर्ष केली. दुसरी म्हणजे पुतीन यांची कामगिरी लक्षात घेऊन रशियन लोकसभेनं दोन खेपांची अट पुतीनच्या बाबतीत रद्द केली. म्हणजे पुतीन सहा वर्षांच्या दोन कारकिर्दी मिळवू शकतात. याचा अर्थ २०३२ पर्यंत ते राष्ट्रपतिपदी राहू शकतात. फक्त निवडणूक जिंकली की झालं. गेल्या आणि या वेळच्या निवडणुकीच्या आधी अनेक उमेदवारांची पात्रता न्यायालयानं रद्द केली. कधी उमेदवाराच्या अर्जात तांत्रिक चूक असे तर कधी उमेदवार देशहिताला बाधक आहे असं न्यायालय ठरवत असे. कधी उमेदवार नाहीसाच होत असे, कधी परदेशात निघून जात असे. नेवाल्नी सर्व त्रास सहन करत लढत राहिले. नेवाल्नीला दीर्घ काळ तुरुंगात रहावं लागलं आणि शेवटी त्याच्यावर विषप्रयोग झाला. पुतीन यांच्या होला हो म्हणणारे विरोधी उमेदवार आणि पुतीन यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे राहू शकतात.
यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना रजा देऊन मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं. पुतीन यांच्या उमेदवारांना मतं द्यायचा आदेश होता. पुतीनच्या उमेदवाराच्या नावापुढं शिक्का मारला याचा फोटो काढायचा आणि तो मतदान केंद्राबाहेर आल्यावर वरिष्ठांना दाखवायचा. मतं ठरलेल्या ‘योग्य’ जागीच पडतात. मतदान केंद्राच्या पातळीवर मत चोरी होते, पुतीन यांच्या उमेदवारांच्या पत्रिकेवर शिक्का उमटवला जातो. मतदान केंद्रावर विरोधी पक्षाच्या निरीक्षकांना मनाई असते. मतदारांच्या यादीतून माणसं गळतात, अस्तित्वात नसलेल्या माणसांची नवी नावं घुसवली जातात. निवडणूक तर सहा वर्षांनी एकदा होणार. पण, निवडणुकीपर्यंत माणूस पोचूच नये याची व्यवस्था पुतीननी केलीय. विष प्रयोग करून विरोध करणाऱ्यांना मारून टाकायचं. पुतीन यांनी विषप्रयोग करणारी एक टीम तयार केली.
लष्करातून माणसं निवडली जातात. या टीममधल्या लोकांची ओळख पूर्ण पुसली जाते. टीम जगात कुठंही जाऊन माणूस मारते. विषारी रसायनं. रुमालावर विष लावणं, डीओडरंटच्या बाटलीतून विष माणसाच्या अंगावर फवारणं. एका माणसाच्या अंडरवेअरला विष फासलं होतं, ती अंडरवेअर वापरल्यावर काही काळानं माणूस खलास. हे सारं माध्यमांतून प्रसिद्ध होत असतं, अनेक पुस्तकात ही माहिती प्रसिद्ध झालीय. पुतीननी या प्रसिद्धीकडं दुर्लक्ष केलंय, वरील सर्व माहिती खोटी आहे असं जाहीर केलं आहे. स्लोवानियाचे पंतप्रधान म्हणाले, ‘ही कसली निवडणूक, हे तर नाटक आहे, पुतीन नाट्य.’ मतदानाच्या आदल्या दिवशी, त्या आधी दोन दिवस मॉस्कोवर, मॉस्कोच्या परिसरातल्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर, युक्रेनचे ड्रोनबॉम्ब कोसळले. माणसं मेली. शुद्धीकरण कारखान्यावर बॉम्ब पडतो तेव्हा काही दिवस तेलाचा तुटवडा होतो, शहरात तेलपंपावर रांगा लागतात, दहा लिटर मागितलं तर पाच लिटर देतात.
२०२३ साली रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दररोज सुमारे १४०० सैनिक मरतात/नाहीसे होतात/जखमी होतात. उत्तर कोरियातून भाडोत्री सैनिक आणावे लागत आहेत. सैनिकांना जास्त वेतन देऊ करतात, हज्जारो कैद्यांना तुरुंगातून मुक्त केलंय, अट एकच, त्यांनी आघाडीवर जाऊन लढायचं. त्यातही गंमत आहे. बाहेरून आणलेले सैनिक आघाडीवर जातात, मरतात. भूमी सुरक्षित झाली की तिथं रशियाचे सैनिक सरकतात. एवढं करूनही सैनिक कमी पडत आहेत. पुतीन यांना विरोध कोण करणार? पुतीन यांना मतं पडतात. आपल्याला जनतेची मान्यता आहे असं पुतीन म्हणू शकतात, कारण त्यांना ५८ टक्के मतं मिळतात.
निवडणुकीच्या आधी ट्रम्प यांचे प्रतिनिधी पुतीन आणि झेलेन्स्कीना भेटले. युद्ध थांबवण्यासाठी शिष्टाई केली. कधी दोघांनाही लोणी लावलं कधी दोघांना दमदाटी केली. टॅरिफ लावून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. रशिया दाद देत नाही. टॅरिफचं शस्त्र बोथट झालंय.
युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत. (ट्रम्पचं शांततेचं नोबेल हुकतंय) युद्ध चालवण्यासाठी पुतीन यांनी सत्तेत राहणं आवश्यक आहे. २०३० सालाच्या सुमाराला अंदाज घेतील. आवश्यकता असेल तर घटनादुरुस्ती करून पाच पन्नास वर्षांची सोय करतील.
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
Read About : Trump Tariffs, Dollar Dominance and the Global Shift Toward Gold : डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.