‘रोडीज रिबर्थ’मधून नव्या पर्वाची सुरुवात; सहा गँग लीडर्स दोन गटांत विभागले, रणविजय सिंगाच्या हाती सूत्रे
मुंबई : Raghu Ram Roadies Comeback – ‘रोडीज’ म्हटले की आठवतो तो रघु रामचा आक्रमक अंदाज, स्पर्धकांची कसून परीक्षा आणि त्याच्या स्पष्टवक्तेपणाची चर्चा! आता तब्बल १२ वर्षांनंतर रघु राम पुन्हा एकदा या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये परतणार आहे. ‘रोडीज रिबर्थ’ या नव्या पर्वातून त्याची पुनरागमनाची घोषणा झाली असून, यावेळी शोच्या स्वरूपातही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. “आता पुन्हा एकदा सगळे बदलण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत रघुने नव्या पर्वाबाबत उत्सुकता वाढवली आहे.
रघु रामने २०१४ मध्ये आपला भाऊ राजीव राम याच्यासोबत ‘रोडीज’ सोडला होता. निर्मात्यांच्या हस्तक्षेपामुळे शोमध्ये काम करणे कठीण होत असल्याचे कारण त्यावेळी त्याने दिले होते. शोच्या सुरुवातीच्या अनेक वर्षांत रघु हा त्याचा महत्त्वाचा चेहरा होता. त्याच्या परतीमुळे जुन्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण होण्याची शक्यता आहे.
नव्या पर्वाच्या नावाबाबत बोलताना रघुने स्पर्धकांना मिळणाऱ्या अनुभवाचे वेगळेच चित्र उभे केले. ‘रिबर्थ’ हे नाव ऐकून स्पर्धकांना पुन्हा खेळात परतण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद होईल; मात्र लवकरच त्यांना या नावाचा खरा अर्थ समजेल, असे त्याने सांगितले. “रिबर्थ म्हणजे विसरलेल्या भीतीचे पुन्हा परतणे. ज्या भीतीवर आपण मात केली असे समजतो, तिचाच पुन्हा सामना करावा लागणार आहे,” असे रघु म्हणाला.
शोच्या स्वरूपात पुन्हा मोठा बदल
‘रोडीज’ने दोन दशकांचा प्रवास पूर्ण करून आता तिसऱ्या दशकात प्रवेश केला आहे. या प्रवासात शोच्या स्वरूपात अनेक बदल झाले. सुरुवातीच्या दहा वर्षांत एक वेगळे स्वरूप होते. त्यानंतर गँग लीडर्सची संकल्पना आणण्यात आली आणि शोची लोकप्रियता आणखी वाढली. आता नव्या दशकात प्रवेश करताना पुन्हा एकदा वेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचे रघुने स्पष्ट केले.
त्यामुळेच नव्या पर्वाला ‘रिबर्थ’ असे नाव देण्यात आल्याचेही त्याने सांगितले. या नव्या पर्वात एकूण सहा गँग लीडर्स सहभागी होणार आहेत. रणविजय सिंग शोचे सूत्रसंचालन आणि नेतृत्व करताना दिसणार आहे. सहा गँग लीडर्सची विभागणी ‘ओजीज’ आणि ‘न्यूजीज’ अशा दोन गटांत करण्यात आली आहे.
‘ओजीज’ विरुद्ध ‘न्यूजीज’ अशी रंगणार लढत
‘ओजीज’ गटात निखिल चिनापा, नेहा धुपिया आणि प्रिन्स नरुला यांचा समावेश आहे. तर अभिषेक मल्हान, बानी जे आणि बसीर अली हे ‘न्यूजीज’ गटाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जुन्या अनुभवी चेहऱ्यांसमोर नव्या पिढीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे अशी या पर्वाची रचना असणार आहे. यापूर्वी ‘एमटीव्ही रोडीज एक्सएक्स : डबल क्रॉस’ या पर्वाचा विजेता कुशल तन्वर, म्हणजेच गुल्लू ठरला होता. एल्विश यादवच्या टीमकडून खेळणाऱ्या गुल्लूने अंतिम फेरीत प्रिन्स नरुलाच्या गँगमधील हरताज सिंग गिल याला मागे टाकले होते.
अंतिम टास्क गुल्लूने एक मिनिट १६ सेकंदांत, तर हरताजने एक मिनिट ४८ सेकंदांत पूर्ण केला होता. रघु रामच्या पुनरागमनामुळे ‘रोडीज रिबर्थ’मध्ये जुन्या काळातील आक्रमकता आणि नव्या स्वरूपातील स्पर्धा यांचा संगम पाहायला मिळणार आहे. नव्या पर्वात स्पर्धकांना नेमकी कोणती आव्हाने दिली जाणार आणि रघुचा जुना अंदाज पुन्हा किती प्रभावी ठरणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Read About : Amanda Seyfried – एलिझाबेथ होम्सच्या भूमिकेवर बिली इव्हान्सची सूचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तिला चित्रपटात घेतल्याचा आनंद’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.