महाराष्ट्रात गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याचा परिणाम; राज्यात १८.५१ लाख टन साखर उत्पादन, १५४ कारखान्यांचे गाळप सुरू
नवी दिल्ली : Sugar Production देशातील साखर उद्योगासाठी यंदाचा गाळप हंगाम चांगल्या सुरुवातीसह पुढे सरकत आहे. चालू २०२६-२७ हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत देशात २३.५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११.४९ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा साखर उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात मोठी भर पडल्याचे भारतीय साखर आणि जैवऊर्जा उत्पादक संघटनेने (इस्मा) स्पष्ट केले आहे.
इस्माच्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरपर्यंत देशातील ३१३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ३११ कारखाने कार्यरत होते. कारखान्यांची संख्या जवळपास समान असली, तरी महाराष्ट्रातील गाळप लवकर सुरू झाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत १८.५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५.२५ लाख टन होते. यंदा राज्यातील १५४ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मागील हंगामात याच कालावधीत १३२ कारखाने सुरू होते. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्पादनात झालेली वाढ देशाच्या एकूण आकडेवारीवर प्रभाव टाकणारी ठरली आहे.
दुसरीकडे, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील उत्पादनात सुरुवातीच्या टप्प्यात मागील वर्षाच्या तुलनेत घट दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात ८० कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, २.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात ८८ कारखान्यांतून ४.२५ लाख टन उत्पादन झाले होते. कर्नाटकात ५६ कारखाने सुरू असून, १.४० लाख टन उत्पादन नोंदवले गेले आहे. गेल्या वर्षी ६८ कारखान्यांतून १.४६ लाख टन साखर तयार झाली होती. इस्माचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गाळप लवकर सुरू झाल्याने देशाच्या साखर उत्पादनात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील कारखान्यांचे गाळपही हळूहळू वेग घेत असून, येत्या काही दिवसांत आणखी कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.
इतर राज्यांमध्ये गुजरातमध्ये ०.६२ लाख टन, तर तामिळनाडूमध्ये ०.७४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तराखंडमध्ये ०.१० लाख टन उत्पादन झाले असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये मिळून ०.१२ लाख टन उत्पादन नोंदवण्यात आले आहे. देशांतर्गत साखरेच्या उपलब्धतेबाबत इस्माने समाधान व्यक्त केले आहे. नव्या उत्पादनाला वेग येत असल्याने देशांतर्गत गरज भागवण्यासाठी पुरेसा साखर साठा उपलब्ध राहील आणि बाजारातील पुरवठाही सुरळीत ठेवता येईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राची साखर उत्पादनात मोठी झेप
- यंदाचे उत्पादन : १८.५१ लाख टन
- मागील वर्षीचे उत्पादन : ५.२५ लाख टन
- यंदा गाळप सुरू केलेले कारखाने : १५४
- मागील वर्षी याच काळात सुरू कारखाने : १३२

Read About : India’s Biggest Petroleum Company – इंडियन ऑइल की रिलायन्स? जाणून घ्या भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांचे साम्राज्य
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.