School Memories : ‘माझ्या शाळेने परीक्षेच्या अभ्यासाची विद्या मला फारशी शिकवली नाही किंवा ज्ञानाचेही फारसे संस्कार माझ्यावर केले नाहीत. पण, माझ्या जीवनात खेळकरपणाचा मजबूत पाया घालून ठेवला…एरवी आयुष्यात विनोदी लेखक मी कधीच होऊ शकलो नसतो,’ असे आचार्य अत्रे त्यांच्या पुण्यातल्या शाळेविषयी गमतीनं म्हणत. तसाही शालेय काळ थोरांपासून सामान्यांपर्यंत कुणाच्याही घडण्या-बिघडण्याचा…अविस्मरणीय.
खरं तर शाळा म्हणजे नुसती इमारत नव्हे. कोविड काळात शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांविना भकास वाटायच्या. पूर्व-प्राथमिक शाळेची ओळखच ‘ऑन-लाईन’ होण्याच्या त्या काळातल्या नातवाला -चिन्मयला- पुण्यातल्या प्राथमिक शाळेत सोडायला-आणायला कधी जाणं होतं तेव्हा वेळ छान जातो. शाळेत येताच पाठीवरचं दप्तर, डबा-वॉटरबॅग सावरत येणारी चिमुरडी मुलं-मुली, मित्र-मैत्रिणी दिसल्यावर आई-बाबा, आजी-आजोबांचा हात सोडून वा स्कूल-व्हॅनमधनं उतरताच गेटमधून आत धावत सुटतात आणि शाळा सुटल्यावर दरवाजातून, घरच्या ओढीनं आई-बाबा, आजी-आजोबा, स्कूल-व्हॅनकडे पुन्हा धावत येतात. असा दोन टोकांचा आनंद जोडणारी असते… शाळा!
‘वार्षिक परीक्षा संपली की शाळेतली धमालही संपणार…’ शाळेतून येताना चिन्मयने सहज म्हटलं, ‘आजोबा, माझी शाळा तुम्ही नेहमीच पाहता. तुमची, आजीची, आईची मुंबईची शाळा एकच होती ना? मला पहायची आहे. मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला जायचं… ओके? डन!’ त्यानेच ठरवलं! संध्याकाळी साडेपाचच्या आसपास आम्ही ‘सहपरिवार’ शाळेबाहेर पोहोचल्यावर मेन-गेटवर सिक्युरिटीनं अडवलं. ‘अंदर नही जा सकते… स्कूल बंद है!’ ‘अंदर नहीं जाना…इस बेटेको सिर्फ बाहरसे, ग्राउंडसे हमारा स्कूल दिखाना है!’ ‘यहां सब जगह केमेरे लगे हुवे हैं…हमे डांट पडेगी!’ शाळेच्या मैदानातून एक वयस्क गृहस्थ गेटपाशीच येत होते.
‘क्यों यादवजी, क्या हुवा?’ ‘सर, इनका स्कूल इन्हें बच्चेको दिखाना है…’ ‘तो आने दो उनको, मैं दिखाता हूं!’ आमच्याकडे पहात ते हसत म्हणाले, ‘चला, मी दाखवतो ‘आपली’ शाळा…’ ‘अरे वा! पण सर, तुम्ही तर घरी निघाला होता ना?’ ‘जाऊ की, काय घाई आहे…आणि ‘सर’ नव्हे, मी इथला विद्यार्थीच आहे. तुमची एसएससीची बॅच कुठली?’ ‘सहासष्टची. त्या वर्षी शाळेतून कुणीच बोर्डात ‘पहिल्या तीसात’ नव्हतं… तुमची?’ ‘अठ्ठावन्नची…आपलं अकरावी-एसएससी होतं.’ ‘म्हणजे तेव्हा चुकामूक झाली…तुमची शाळा सुटली, मी शाळेत आलो.’
‘पण आज भेटलो…असेही योग असतात! गेल्या सहा दशकांत शाळा बदलत गेली. या मधल्या मैदानात सगळ्या मुलांचं ‘मास-ड्रील’ व्हायचं, दर शनिवारी… उत्तरेकडची आपली बॉईज हायस्कूलची दुमजली मूळ कौलारू इमारत, पन्नास वर्षांपूर्वीच टप्प्याटप्प्यात पडली, तिच्याजागी ही पाच मजली इमारत झाली. त्या कोपऱ्यात जुन्या इमारतीचे दुमजली अवशेष शिल्लक आहेत…’ ‘तिथं वरच्या मजल्यावरच ऑफिस असायचं. व्हरांड्यात मोठी पितळ्याची घंटा होती. समोरच्या इमारतीच्या कोपऱ्यावर मोठं घड्याळ होतं, ते पाहून शिपाई घंटा वाजवायचा…’ ‘बरोब्बर… विद्यार्थ्यांपासून मुख्याध्यापकांपर्यंत या घंटेचा मान! पश्चिमेकडची इमारत इंग्लिश-मीडियमसाठी झाली. दक्षिणेकडचं गर्ल्स हायस्कूल माझ्या डोळ्यासमोर इतिहासजमा झाले. तिथे पाच मजली इमारत उभी राहिली, दोन वर्षांपूर्वी मधलं मैदान कमी करत ती आडवीदेखील वाढली. तिथं ‘सीबीएससी’ बोर्ड आलं… प्रत्येक वर्ग एअर-कंडिशंड! आपल्या वेळी वर्गात पंखा असणं हीच चैन! पूर्वेकडची ही हॉलची इमारत तेवढी अजून तशीच आहे. फार फरक नाही झाला, वरचा हॉल मात्र ‘एसी’ झालाय!’ ‘आपल्यावेळी हॉलमध्ये लाकडी खुर्च्या होत्या. ‘जागृती’, ‘मासूम’, ‘आनंदमठ’सारखे चित्रपट शाळेनं दाखवले. पंख्यांचा आवाज यायचा, त्यातच फिल्म मध्येच सुटायची-तुटायची तरी ते एन्जॉय केले!’
‘मग चला, वरच जाऊ. नवा हॉल तर पाहा!’ लिफ्टने वर गेलो. पूर्वी इथं लिफ्टही नव्हती. हॉल कुठल्याही ‘थिएटर’च्या तोडीचा. सगळेच काळानुरूप झालेले बदल. इमारतींपासून, शैक्षणिक-माध्यमांपर्यंत! मराठी माध्यम आता जुन्या इमारतीच्या अवशेषांएवढंच उरलंय.
‘मध्यंतरी इथं तळमजल्यावर छोटं कॅन्टीन होतं…
मुलीच्या पॅरेंट्स-मिटिंगला यायचो तेव्हा इथल्या बटाटा वड्याचं आकर्षण असायचं! त्या आधी आमच्यावेळी इंग्लिश-मीडियम इमारतीच्या जागी एक पत्र्याची शेड… कॅन्टीनची टपरी होती, तिथं बटाटावडा छान मिळायचा, नव्या दहा पैशांना दोन वडे!’ ‘आमच्यावेळी जुन्या चार पैशांच्या आण्याला दोन वडे मिळायचे! नंतर सहा पैसे आण्याचा नवा पैसा आला…’ ‘नंतर ‘सोलह आने सच’ वाक्प्रचारातच राहिलं… खरं ना?’ ‘एकदम! सगळंच बदलत गेलं. मूल्यदेखील बदलत गेली! चालायचंच… चेंज इज द ओन्ली कॉन्सटंट! चला, नव्या कॅन्टीनमध्ये जाऊ. साठ वर्षांपूर्वीच्या वड्याची आठवण आल्यावर वडा, चहा हवाच! तू खातोस ना रे वडा?’ ‘हो, मला वडा आवडतो…चहा पण! तुमची शाळा मला आवडली’ म्हणत चिन्मयनं नमस्कार केला. बोलताना जुन्या शिक्षकांच्या आठवणी निघाल्या… बहुतेक काळाच्या पडद्याआड गेलेले!
‘तुम्ही अजूनही शाळेशी संबंध ठेऊन आहात…
‘ ‘माझी शाळा तशी सुटली नाही कधीच! माझ्यासाठी शाळा म्हणजे टाईम-मशीनच आहे!’ म्हणत त्यांनी व्हिझिटिंग कार्ड दिलं. व्यवसायानं इंजिनियर असलेले, शाळेच्या एज्युकेशन सोसायटीचे ‘व्हाईस-प्रेसिडेंट’… आम्हाला शाळा दाखवत होते!
‘सर, तुमच्यामुळे चिन्मयला आपली शाळा दाखवता आली.’ ‘मघाशी म्हटलं ना, योग असतात… आज मीही खूश आहे! अशी अचानक पार्टी मी कधीच दिली नव्हती… माझ्याच वाढदिवशी!’ हा त्या दिवशीचा क्लायमॅक्स! वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर म्हणाले, ‘पुढच्या वेळी फोन करून घरीच या, पलीकडच्या गल्लीतच राहतो. दोघंच असतो. तिलाही आवडेल.’ ‘सर, तुमची शाळा सुटली… तरी पाटी कायम अभंग राहिली!’ ‘हा या मातीचा गुण! माझ्यासाठी, शाळा एके शाळा, शाळा दुणे… शाळाच!’ परतताना आठवलं, २०१२ साली शतकमहोत्सवानिमित्त झालेल्या समारंभात भाग घेतल्यानंतरच्या शाळेच्या विशेषांकात मी लिहिलं होतं…’या शाळेचा विद्यार्थी शाळेनंतर कुठेही फेकला गेला तरी स्प्रिंगच्या बाहुलीसारखा स्वत:च्या पायावर निश्चित उभा रहाणार अशी त्या वेळेस पालकांना खात्री असायची! हा गुण शाळेच्या मातीच्या ओलाव्याचा. या ओलाव्यामुळेच आपण घेऊन आलेली पाटी, शाळा केव्हाच सुटली तरी कधी कोरडी राहिली नाही, की फुटलीदेखील नाही… ती नेहमीच अभंग राहिली!’
सुट्टी संपली. जून महिना सरत आला तरी दडी मारलेल्या पावसाने आल्याआल्या मुंबई-पुण्यात हाहा:कार उडवून दिला. दोन दिवस चिन्मयची शाळादेखील ‘ऑनलाईन’ (Online) झाली. शाळा पुन्हा Offline (ऑफ लाईन!) चालू झाल्यावर चिन्मयचा चेहेरा खुलला…’हेऽऽऽ! शाळा एके शाळा, शाळा दुणे शाळाच!’
प्रभाकर बोकिल
pbbokil@rediffmail.com
Read About : From Radio Waves to Gamma Rays : रेडिओ तरंगांपासून गॅमा किरणांपर्यंत : अदृश्य प्रकाशविश्व
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.