आष्टी तालुक्यातील लोखंडवाडीतील घटना : मृतदेहाला 1 किमीपर्यंत नेले ओढत
Tiger Attack in Beed आष्टी (जि.बीड) : धाराशिव, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यात मुक्त संचार करणाऱ्या ‘ॲव्हेंजर’ नामक वाघाने आष्टी तालुक्यात लोखंडवाडी येथे एका शेतकऱ्यावर हल्ला चढवला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून ही घटना शनिवारी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली असून देविदास उर्फ पिट्या माणिकराव टकले (४०) असे मयताचे नाव आहे.
वाघाच्या हल्ल्याच्या या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मयत शेतकरी देविदास टकले हे गावातील सोनी पठार या माळावर जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघाने हल्ला केल्यानंतर जवळपास एक किमीपर्यंत मृतदेह ओढत नेला होता. दरम्यान त्यांचा मुलगा नितीन हा वडिलांनी कापलेले गवत घेऊन जाण्यासाठी शेतात आला मात्र त्यास वडील दिसले नाहीत. दरम्यान रक्ताने माखलेले गवतत दिसून येताच त्याने आरडाओरड सुरू केली. त्याच्या आवाजाचे बाजूचे लोक धावत आले आणि जमिनीवरील रक्ताच्या डागांच्या दिशेने शोध सुरू केला.
जवळपास एक किमी अंतरावर देविदास टकले यांचा मृतदेह त्यांना दिसला. त्यावेळी तिथेच वाघ बसलेला असल्याचेही त्यांना दिसले. लोकांनी आरडाओरड केल्यावर वाघाने तिथून धूम ठोकल्याचे वन विभागाने सांगितले. माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांसह वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून टकले यांचा मृतदेह धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
‘तो’ पुन्हा आला…
यापूर्वी चार वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यात सुरुडी, किन्ही, मंगरूळ, पारगाव या गावांमध्ये बिबट्याने असाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्याला लक्ष्य केल्यामुळे तो पुन्हा आला अशीच चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा
घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा. परिसरात तत्काळ पिंजरा लावावा आणि मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तथापि, वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून शेतात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तळ ठोकून असून ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
लोखंडवाडी परिसरात शनिवारी झालेल्या हल्ल्यात पाऊलखुणा, हल्ल्याची पद्धत आणि सर्व वैज्ञानिक निष्कर्षांवरून हा हल्ला बिबट्याने नव्हे तर वाघानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मानवावर थेट हल्ला झाल्याने या वाघाला पिंजरा लावून सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे तत्काळ प्रस्ताव पाठवला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले. तर देवळाली परिसरात डिसेंबर २०२५ मध्ये ट्रॅप कॅमेरात वाघ दिसला होता. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा याच ठिकाणी वाघाने हल्ला केला असून शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करून मृत देविदास टकले यांना ५० लाखांची मदत शासनाने देऊन त्यांच्या मुलास शासकीय नोकरीत घ्यावे अशी मागणी देवळालीचे ग्रामस्थ अतुल जवणे यांनी सांगितले.
- वाघांचा प्रदेश म्हणून एकेकाळी मराठवाडा प्रांताची ओळख होती. जी नंतर कमी-कमी होत पुसल्या गेली. आता वाघांनी डरकाळ्या फोडत आपल्या अधिवास क्षेत्रात पुनरागमन सुरू केले आहे. आजरोजी ६ वाघ मराठवाड्यात आहेत. असे असताही त्यांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी कॉरिडॉर प्रोजेक्ट (व्याघ्र संचार प्रकल्प) राबविण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविलेली आहे. शासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज वन्यजीव अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.
- वाघांच्या प्राचीन संचार मार्गिका आजवर मोठ्या प्रमाणात नागरीकरण, शेती, विकासप्रकल्प आदी कारणांमुळे संकटात सापडलेल्या आहेत. काही मार्गिका बंदच झालेल्या आहेत. त्या पुन्हा कशा मोकळ्या करता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. पण डोक्याला ताप नको म्हणून अधिकाऱ्यांनी याबाबत उदासिन धोरण अवलंबिले आहे. चालढकल भूमिका अंगिकारत लोकांना त्रास होईल, विकासकामांत अडथळा येईल, वाद होतील अशी कारणे पुढे केली जात आहेत. परिणामी अभयारण्यांच्या परिघाबाहेर मुक्त संचार करत, सुरक्षित अधिवास क्षेत्र निर्माण करू पाहणाऱ्या मराठवाड्यातील वाघांची शिकार होण्याची शक्यताही अभ्यासकांतून ठळपणे वर्तविली जात आहे.
- विदर्भातून वर्ष २०१९ पासून नियमित मराठवाड्यात वाघ येत आहेत. येथील वनांत ते मुक्त संचार करत शिकारीचा मनुराद आनंद लुटत आहेत. गौताळा अभयारण्यात (जि. छत्रपती संभाजीनगर) पाच वर्षांपासून १ वाघ मुक्कामी आहे. नांदेडमधील वनक्षेत्रात ४ वाघ आहेत. वाघांचे प्रवेशद्वार म्हणून या जिल्ह्याने ओळख निर्माण केली आहे. धाराशिव जिल्ह्यात (येडशी रामलिंग घाट अभयारण्य परिसर) ५०० किमीचा प्रवास करून आलेला वाघ दोन वर्षांपासून बीड, अहिल्यानगर, सोलापूर असा हिंडत आहे.
अशा आहेत वाघांचा नोंदी
महाराष्ट्र शासनाच्या गॅझिटीयरमधील नोंदीनुसार १८७९ पर्यंत मराठवाड्यात वाघांची संख्या मोठी होती. नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्राण्याचा समृद्ध असा अधिवास होता. १९७२ च्या शिकारीनंतर मराठवाड्यात पहिला वाघ (हिंगोली जिल्ह्यात) ३ नोव्हेंबर २०१९ रोजी सी १ टी १ (वॉकर) आला. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून १६०० किमीचा प्रवास त्याने केला होता.
यानंतर २१ फेब्रुवारी २०२१ रोजी गौताळा अभयारण्यात ४९ वर्षांनंतर (टी ३ सी १) वाघ आला. तर, ऑक्टोबर २०२४ मध्ये नांदेड जिल्ह्यात किनवट परिसरात वाघ (नाव- जॉन) आढळला होता. तो जवळपास अडीच वर्षे नांदेड जिल्ह्यात होता. आजही येथे वाघांचा वावर आहे. तथापि, आता धाराशिव जिल्ह्यात १९ डिसेंबर २०२४ पासून ॲव्हेंजर (टिपेश्वर अभयारण्यातील फोरमार्क वाघिणीचा बछडा) नावाचा वाघ ये-जा करून आहे. ज्याने शनिवारी (दि.७) एका शेतकऱ्याचा बळी घेतला.
वाघांच्या संचार मार्गिका अशा
मराठवाड्यात पैनगंगा अभयारण्य (यवतमाळ), टिपेश्वर अभयारण्यातून (यवतमाळ) वाघ येऊ शकतात. टिपेश्वर अभयारण्यातून यवतमाळ, कारंजा, अकोला, बुलढाणामार्गे जाईचा देव, अजिंठामार्गे गौताळा किंवा सोयगावमार्गे गौताळ्यात वाघ येऊ शकतात. किंवा टिपेश्वर, पैनगंगा, नांदेड, लातूर, येडशीमार्गे धाराशिव येथे वाघ येऊ शकतो.
ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ पुसद, हिंगोली, माहूरगड, किनवट, आदिलाबाद (तेलंगणा) किंवा टिपेश्वरमध्ये जाऊ शकतात. पैनगंगा अभयारण्य नांदेड वनक्षेत्राला लागून आहे. येथील वाघ सहज मराठवाड्यात येऊ शकतात. गौताळा औट्रम घाट अभयारण्याचा भ्रमणमार्ग सोयगाव, सिल्लोड तालुक्यातून उत्तरेला यावल अभयारण्याकडे व पूर्वेला बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याकडे जातो.
तो पुढे मेळघाटकडे किंवा काटेपूर्णाकडे विस्तारला जाऊ शकतो. दरम्यान वाघांच्या मार्गीका सुरक्षित न केल्यास, कॉरिडॉर प्रोजेक्ट न सुरू केल्यास भविष्यात यातून मानन-वन्यजीव संघर्षाचा जटील प्रश्न उद्भवू शकतो, वाघांची शिकार होऊ शकते अशी भीती देखील अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.
भविष्यात विदर्भातून वाघ मराठवाड्यात येण्याचे प्रमाण वाढणारे आहेच. त्यांचा संचार कोणीही रोखून धरू किंवा नियंत्रित करू शकत नाही. यामुळे संचार प्रकल्प हाती घेऊन मानव-वन्यजीव संघर्ष कमी करता येऊ शकतो. यावर लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणांनी सकारात्मक पुढाकार घेत पाऊल टाकणे आवश्यक आहे. मराठवाड्यात १९ व्या शतकापर्यंत मोठ्या संख्येने वाघ होते. शिकार, वृक्षतोड, विकासकामे आदी कारणांमुळे ते या भागातून लुप्त झाले. आजरोजी आपल्याकडे दिसणारे वाघ हे स्थलांतरित पाहुणे आहेत. विदर्भातील पैनगंगा अभयारण्य (यवतमाळ), टिपेश्वर अभयारण्य (यवतमाळ) तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातून (बुलडाणा) हे वाघ मराठवाड्यात येत आहेत. वाढलेली वाघांची संख्या, परिसरातील तोचतोपणा, स्वत:ची नसलेली टेरिटरी (हद्द) आणि साथीदाराचा शोध आदी कारणांमुळे या अभयारण्यांतून वाघ नांदेडमार्गे मराठवाड्यात येत आहेत.
देशभरात ३२०० वाघ
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार देशातील २२ राज्यांत २०१२-२०२४ (सप्टेंबर) दरम्यान विविध कारणांमुळे (नैसर्गिकसह) १८३६ वाघ मृत पावले आहेत. सर्वाधिक मृत्यू हे मध्य प्रदेशात (३५५) झाले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र (२६१), कर्नाटक (१७९), उत्तराखंड (१३२), तमिळनाडू (८९), आसाम (८५), केरळ (७६) आणि उत्तर प्रदेश (६७) या राज्यांचा क्रमांक लागतो. वर्ष २०२३ मध्ये सर्वाधिक वाघ मृत पावले. तर, आजरोजी देशात जवळपास ३२०० वाघ आहेत. महाराष्ट्रात सध्या ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये व २३ संवर्धन राखीव अशी एकूण ७९ संरक्षित क्षेत्रे असून त्यांचे क्षेत्रफळ सुमारे १०८६७.९२१ चौ.किमी. आहे. राज्यात सर्वाधिक वाघ विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, जखमी झाल्यास किंवा पशुधनहानी, पीक नुकसान झाल्यास भरपाई देण्याची तरतूद राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.
टायगर कॉरिडॉर समजून घेताना
दोन वनक्षेत्र, अभयारण्य किंवा अभयारण्यांच्या बफर झोनमध्ये वाघांना सुरक्षितपणे संचार करता यावा यासाठी सुरक्षित क्षेत्राचा शोध घेऊन तो भाग संचार (कॉरिडॉर) मार्गासाठी आरक्षित केला जातो. हा भाग वन विभागाच्या अखत्यारीत असू शकतो किंवा इतर शासकीय यंत्रणांच्या अधिकार क्षेत्रातीलही असू शकतो. पुढे हा परिसर वाघांसाठी संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर होतो. कॉरिडॉर
विकसित झाल्याने वाघांना सुरक्षित संचार मार्ग मिळतो. परिणामी मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होते.
व्याघ्र संचार प्रकल्प मराठवाड्यात अशक्य
मराठवाड्यात नांदेडमार्गे वाघांची ये-जा नियमित सुरू आहे. विभागाचे अंतिम टोक सोयगावपर्यंत वाघ येऊन गेले आहेत. यामुळे वाघांसाठी संचार अथवा मार्गिका प्रकल्प राबविण्याची आवश्यकता अभ्यासकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्य वनसंरक्षक गुजर यांनी पुढाकार देखील घेतला होता. मात्र जमिनीचे अधिग्रहण करण्यासह संचार प्रकल्प मंजूर केल्यास त्या क्षेत्रात विकासकामांना अडथळा निर्माण होईल. शिवाय शेतकरी यासाठी जमीन देणार नाहीत. यामुळे मराठवाड्यात व्याघ्र संचार प्रकल्प राबविणे अशक्य असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
वाघाबद्दल जाणून घेताना
- रूबादार शरीर, धारदार नखे, तीक्ष्ण दात, अचाट शक्ती, आकर्षक रंग आणि घाम फोडणारी डरकाळी ही वाघाची वैशिष्टे. वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून बिबट्यापेक्षा मोठा असतो. त्याला झाडावर चढता येत नाही. दिवसाला तो २५-४० किमीचा प्रवास करू शकतो. एका जागेवर फार दिवस राहत नाही.
- प्रत्येक वाघाच्या अंगावर असलेले पट्टे वेगवेगळे असतात. या पट्ट्यांवरूनच वाघाची ओळख पटविली जाते. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थानकडे वाघांचा डेटा संकलित आहे. वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्यात आलेले छायाचित्र त्यांच्याकडे पाठविल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती वन प्रशासनास मिळते.
- वाघांची माहिती नियमित मिळत राहावी, शिकारीपासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावली जाते. त्याद्वारे वाघाचे लाइव्ह लोकेशन मिळत राहते. वाघांच्या संर्वधन आणि विकासासाठी वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) स्थापन करण्यात आलेले आहे. मादी तीन ते चार वर्षांनी प्रजनन करते. दोन ते चार पिले जन्माला घालते.
- वाघाचे आर्युमान १२ ते १८ वर्ष असते. वजन शंभर ते १८० किलोपर्यंत असते. हा सहसा एकटा राहतो आणि रात्री भ्रमंती करतो. भारतात आढळणाऱ्या वाघांना रॉयल बंगाल वाघ अथवा भारतीय वाघ या नावाने ओळखले जाते. जगभरात सर्वाधिक वाघ हे भारतातच आढळतात.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्य परिसरात स्थिरावलेला वाघ, ‘टी-२२ तथा फोर मार्क’ या वाघिणीचा बछडा आहे. त्याचे नाव ‘ॲव्हेंजर’ आहे. त्याचा जन्म टिपेश्वरमध्ये २०२२ चा. त्याच्या वडिलांचे नाव ‘स्टार’ आहे. टिपेश्वर (यवतमाळ), किनवट (नांदेड), लातूरमार्गे तो धाराशिव जिल्ह्यात आलेला आहे. जन्मानंतर तो बेपत्ता होता. यानंतर तो धाराशिव जिल्ह्यात प्रकटला आहे. त्यानेच बीडमधील शेतकऱ्याचा बळी घेतला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.