Ad Advertisement Ad Advertisement

Tribal Development in Gadchiroli – नक्षलवादातून आदिवासींची विकासाकडे वाटचाल

नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळा

गडचिरोली : Tribal Development in Gadchiroli नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून, आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांच्या हस्ते देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा राज्यातील तीन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली. या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. माया इवनाते, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, अशोक नेते, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने केली. गडचिरोलीतील मोठ्या जनसमुदायाचे आणि आदिवासी संस्कृतीचे कौतुक करत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यासह क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती, टंट्या भिल्ल आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांच्या योगदानाचे स्मरण केले. या सोहळ्यात विविध राज्यांतील एकलव्य आदर्श निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, आदिवासी संशोधन संस्था आणि बहुउद्देशीय केंद्रांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील २२ आश्रमशाळा व वसतिगृहांशी संबंधित सुविधांचाही समावेश आहे.

गरीबी निर्मूलनाच्या क्षेत्रात प्रगती

नक्षलवादी हिंसाचारामुळे अनेक दशके आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे निर्माण झाले. मात्र सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे परिस्थितीत मोठा बदल होत आहे. पूर्वी हिंसाचाराच्या छायेत असलेल्या भागांमध्ये आता शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गरीबी निर्मूलनाच्या क्षेत्रात देशाने महत्त्वपूर्ण प्रगती केली असून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या समाजघटकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

लाभार्थ्यांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळचे कृष्णा टेकाम, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील वजीर भागणाभाई कोतवालिया व तेलंगणातील लंबाडी आदिवासी समाजातील सबावत अन्वेष यांच्याशी संवाद साधला. या तीनही लाभार्थ्यांचे अनुभव हे शासकीय योजनांमुळे आदिवासी समाजाच्या जीवनात घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

गडचिरोली आता माओवादमुक्त !

गडचिरोली : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माओवादाच्या समस्येमुळे अनेक वर्षे जिल्ह्याच्या विकासात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न, शासनाची विकासाभिमुख धोरणे आणि नागरिकांच्या सहभागामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. गडचिरोली जिल्हा आता माओवादमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्तीच्या आधारे गडचिरोलीला देशाची पुढील ‘स्टील सिटी’म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प आहे. पोलाद उद्योग, औद्योगिक गुंतवणूक आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Read About : Rahul Gandhi Phone Tapping Allegations – मोदींकडून माझे फोन टॅपिंग – राहुल गांधी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.