Ad Advertisement Ad Advertisement

Two Private Employees Arrested – बनावट दस्त प्रकरणात दोन खाजगी कर्मचारी अटक


टोळीला सहज उपलब्ध करून दिले नोंदणी विभागाचे दप्तर

छत्रपती संभाजीनगर : Two Private Employees Arrested – तब्बल चार बनावट खरेदी खत तयार करून आणि त्याची नोंदणी विभागाच्या दस्तरात नोंद करून पोखरीसह इतर ठिकाणची कोट्यवधी रुपयांची तब्बल ३१ एकर जमीन हडपण्याच्या प्रकरणातील टोळीपैकी ५ जणांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती. या टोळीला नोंदणी विभागाचे दप्तर सहज उपलब्ध करून देणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अब्दुल रशिद उर्फ डॉक्टर अब्दुल रज्जाक (वय ५८, रा. रोशन गेट, आजम कॉलनी), रवींद्र बाबुराव पवार (वय ३८, रा. रेणूकानगर, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या ७ वर पोहोचली आहे.


गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी माहिती दिली की, पोखरी येथील क्रमांक ६६ मधील ५.९९ हेक्टर जमिनीसह इतर तीन ठिकाणच्या तब्बल ३१ एकर जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करण्यात आले. त्यानंतर या बनावट खरेदीखताची नोंद नोंदणी विभागाच्या अभिलेखा मधील वर्ष १९७९ मधील खंड बुकमध्ये तसेच डे बुकमध्ये घेण्यात आली. या बनावट खरेदी खताच्या आधारे मोहन राठोड यांनी आपल्या नावाची नोंद मूळ जमीन मालक बळवंता कुलकर्णी यांच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत तक्रार झाल्यानंतर सखोल चौकशीअंती हे चारही खरेदीखत बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. गुन्हे शाखेने तपास करीत बनावट खरेदीखत तयार करणाऱ्या टोळीतील मोहन दगडू राठोड, नितीन मोहन राठोड, सागर राम आगळे, प्रतीक सुरेश कोहळे, प्रशांत प्रकाश तांबे या पाच जणांना अटक केली होती. पाच जणांची कसून चौकशी केली असता नोंदणी विभागाच्या दप्तरात नोंद करण्यासाठी दुय्यम नोंदणी कार्यालयातील रेकॉर्ड रूममधील १९७९ चे खंड बुक, डे बुक देणारे खाजगी स्वरूपात काम करणारे अब्दुल रशिद, रवींद्र पवार यांनी मदत केल्याचे समोर आले. या माहितीवरून गुन्हे शाखेने अब्दुल रशिद, रवींद्र पवार या दोघांना शुक्रवारी अटक केली. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गभीरराव, पोलीस उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, पोलीस हवालदार संतोष पारधे, नितीष घोडके, दीपक शिंदे, कैलास काकड, पोलीस अंमलदार मनोज विखणकर, विजय निकम आणि संतोष चौरे यांनी कारवाई केली आहे.

रजिस्ट्ीच्या सर्वच कार्यालयांत ‘घरके भेदी’

जिल्ह्यात नोंदणी विभागाची तब्बल १३ दुय्यम निबंधक कार्यालये असून यापैकी पाच कार्यालय शहरात आहेत. या सर्वच कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक खाजगी कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यांचा नोंदणी विभागाशी कसलाही संबंध नाही. असे असतानाही राजरोसपणे ते कार्यालयात बसून शासकीय कर्मचाऱ्यांसारखे काम करीत असून शासकीय अभिलेखे हाताळताना दिसून येतात. अनेकवेळा याबाबत वृत्त प्रकाशित करूनही त्यांना हटविण्याची हिंमत आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. नागरिकांकडून होणाऱ्या ‘वसुली’तून या खाजगी कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला दिला जातो. अनेक कार्यालयात हेच खाजगी कर्मचारी ‘कलेक्शन’ची कामे करतात. अशाच खाजगी कर्मचाऱ्यांनी बनावट दस्तांची नोंद घेण्यासाठी अभिलेखे बाहेर दिल्याचे समोर आले आहे. यावरून तरी नोंदणी विभागाचे अधिकारी धडा घेऊन या खाजगी कर्मचाऱ्यांना हटविणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read About : Mandar Kivale Attack Case : मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला; शुभमच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.