Ad Advertisement Ad Advertisement

Vaijapur farmers canal water protest कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ वर एल्गार

जांबरगावात दोन तास रास्ता रोको; पोलिसांशी झटापट, आंदोलक जखमी

Vaijapur farmers canal water protest वैजापूर : नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापुरात आंदोलनाचा भडका उडाला. बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ लाभधारक शेतकरी आणि महिलांनी शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी जांबरगाव येथे समृद्धी महामार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या लाठीचा मार लागल्याने काही आंदोलक जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित शिंदे यांनी पाटबंधारे विभागासमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी कालव्यातून तीन आवर्तने सोडावीत, तसेच पाणीवाटपाचे नियोजन जाहीर करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक वैजापुरात घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

रास्ता रोकोदरम्यान पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत जळगाव येथील अनिल काळे यांना लाठीचा मार लागून ते जखमी झाले. काही महिलांनाही मार लागल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक आणि छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर आंदोलकांनी पाटबंधारे कार्यालयासमोरील उपोषणस्थळी धाव घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, कृष्णा पाटील डोणगावकर आणि ॲड. रमेश सावंत यांनी आंदोलक व प्रशासनात समन्वय साधला.

लेखी आश्वासनावर उपोषणाचा निर्णय

मागण्या मान्य करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा, पाणी सोडण्याचे नियोजन आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शिंदे यांनी घेतली. रविवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दोन नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. धरणातील जलसाठ्याचा आढावा घेऊन खरीप व रब्बी आवर्तनांबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीनंतर पाणी सोडण्याचे नियोजन जाहीर करण्यात येणार आहे.

Read About: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.