सिडकोतील घटना : दुचाकीवरून आला अन् थेट हात धरला; धुलाईनंतर पोलिसांच्या हवाली
छत्रपती संभाजीनगर : Woman Harassment रात्रीच्या वेळी पायी घरी जाणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला रस्त्यात गाठून, ‘ए चलती क्या? एक हजार रुपये देतो’ अशी अश्लील शेरेबाजी करत टवाळखोराने छेड काढली. तो तेवढ्यावरच थांबला नाही, पुढे होत त्याने तिचा हात पकडला. नेमक्या त्याचवेळी तरुणीचा भाऊ आला आणि त्याने टवाळखोराची प्रचंड धुलाई केली. बेदम चोपल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रकरणी ६ ऑक्टोबरला टवाळखोराविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश सोपान शिंदे (३२, रा. बुलढाणा, ह.मु. एन-६, बजरंग चौक), असे आरोपीचे नाव आहे. तो पूर्वी एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र, सध्या बेरोजगार आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
सिडको पोलिसांच्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी आणि तिची चुलत बहीण सोमवारी (दि. ५) रात्री कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काम आटोपून त्या सिडको बस स्टँडवर उतरल्या. तेथून सर्व्हिस रोडने पायी चालत त्या पिरॅमिड चौकापर्यंत आल्या आणि घरी जाण्यासाठी भावाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याच वेळी एक तरुण लाल रंगाच्या दुचाकीवरून त्यांच्यासमोर आला. त्याने गाडी थांबवली आणि दोघी बहिणींकडे पाहून अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. ‘ए चलती क्या? १ हजार रुपये देतो,’ अशी विचारणा केली. एवढेच नाही, तर वाईट हेतूने तरुणीचा हात धरून तिला स्वत:कडे ओढले. अचानक घडलेल्या या प्रकाराने तरुणी घाबरली.
जमावाने धुतल्यावर जोडले हात
पीडितेचा भाऊ दुचाकीवरून घटनास्थळी आला तेव्हा बहिणीसोबत भररस्त्यात सुरू असलेला प्रकार पाहून त्याचा पारा चढला. त्याने दुचाकीवरील या तरुणाला कॉलर पकडून खाली खेचले आणि रस्त्यातच यथेच्छ धुलाई केली. हा राडा पाहून आजूबाजूच्या नागरिकांनीही गर्दी केली. त्यानंतर जमावाने चोप देत या विकृताला सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिक तपास हवालदार भाऊसाहेब जगताप करीत आहेत.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.