Ad Advertisement Ad Advertisement

Woman Pushed Off Mumbai Local Train – छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला ढकलले ट्रेनखाली

डावा हात गमावला, डोक्याला १६ टाके आरोपीला ५ दिवसांनी अटक

ठाणे/वसई/मुंबई : Woman Pushed Off Mumbai Local Train मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना नायगाव रेल्वे स्थानकावर घडली. छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय विवाहितेला आरोपीने चालत्या लोकलमधून ढकलल्याने तिचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. या धक्कादायक घटनेबाबत महिला प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुंबई लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडिता नायगाव पूर्व येथे राहणारी २० वर्षीय विवाहिता आहे. ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास ती गोरेगाव येथे आईला भेटून बोरिवलीहून विरार लोकलने नायगावला परतत होती. गर्दीमुळे ती चुकून दिव्यांगांसाठी राखीव डब्यात चढली. त्याच डब्यात आरोपी जितेंद्र गिरजप्पा हिरमुखे (५३, रा. वाकीपाडा, नायगाव पूर्व) प्रवास करत होता. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने वारंवार अश्लील स्पर्श केला. संतापलेल्या तरुणीने त्याला चप्पल फेकून मारली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली, आरोपीनेही तिला चप्पल मारली आणि शिवीगाळ केली.
लोकल नायगाव स्थानकात पोहोचताच आरोपीने तिला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. ती दोन डब्यांच्या मधल्या गॅपमधून थेट रुळावर पडली. नेमकी त्याच वेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली सापडला. डोक्याला गंभीर मार लागून १६ टाके पडले. पीडितेला प्रथम जनसेवा हॉस्पिटल वसई आणि नंतर मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जिथे डॉक्टरांना तिचा हात कोपराखालून कापावा लागला.

सुरुवातीला हा अपघात वाटल्याने ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलिसांनी फक्त कलम ७४ (विनयभंग), ११७(२) (गंभीर दुखापत) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पीडित कुटुंबाने खुनाच्या प्रयत्नाचे कलम न लावल्याने मनसेकडे धाव घेतली. मनसे विधानसभा प्रमुख सचिन पोपळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) वाढवले.
आरोपीने चेहरा रुमालाने झाकला होता, पण पोलिसांनी अनेक ठिकाणचे सीसी कॅमेरे तपासून ९ नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. तो कर्करोगग्रस्त असून गोरेगाव येथील ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने संध्याकाळच्या गर्दीतही महिलेच्या मदतीला कोणी आले नाही, हा संतापजनक मुद्दा समोर आला आहे. तसेच मुंबई लोकल गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. याबाबत तातडीने रेल्वे पोलिसांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात दिवसाही सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कुटुंबाने पोलिसांच्या तपासावर उपस्थित केले प्रश्न

आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम १०९ का लावण्यात आले नाही, असा प्रश्न कुटुंबाने उपस्थित केला आहे. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षकांची भेट घेतली. तपासाच्या आधारे आवश्यक कलमे जोडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. सध्या आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम ७४, ११७ आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य

तरुणीने सांगितले की, ती कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे. या दुर्घटनेनंतर तिच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे संकट उभे राहिले आहे. तिने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Read About : Bengaluru Seven Murders- कौटुंबिक वादातून कॅब चालकाने पत्नीसह 7 जणांना संपवले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.