Women Investors in India : दिवाळी नुकतीच संपली आहे. यंदा दुष्काळामुळे दिवाळीला किंचित काजळी लागली असली, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे त्यांना थोडाफार आधार मिळाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार भरभक्कमपणे उभं असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. अर्थात, हे शब्द लवकरात लवकर खरे होवोत ही अपेक्षा.
आनंदाचा शिधा’ बंद करण्यात आला आहे आणि दिवाळीसारख्या सणाला केरोसीन मिळत नसल्याच्या तक्रारीही आहेत. स्वस्त दरात दिल्या जाणाऱ्या १४ जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा खंडित झाला आहे. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या स्त्रियांना केवळ ८१ रुपये मजुरी मिळते, यामध्ये वाढ करण्याची मागणी आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळलं जात आहे. तसंच सरकारच्या अन्य योजनांपासूनही महिलांना वंचित ठेवलं जात असल्याच्या तक्रारी आहेत. देशातील गरिबीत घट झाली असली तरी आज प्रचंड महागाईमुळे हैराण झालेला एक मोठा वर्ग आहे.
तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीत फटका बसल्याकारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात आनंद व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतील या निकालांनंतर तरी व्यापार व आयातशुल्क धोरणांबाबत अमेरिका यापुढे जबाबदार भूमिका घेईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. शिवाय खनिज तेलाचे दर घसरल्यामुळे तसं सकारात्मकतेचं वातावरण आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात उत्साहवर्धक खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे दिवाळी तोंडावर आली असताना शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजीची लाट निर्माण झाली होती.
या तुफान तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात लाखो कोटी रुपयांची वाढ झाली. ज्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न आहे, अशांनी शेअर बाजाराकडे वळण हे हिताचं ठरतं. कारण बँकामध्ये अथवा पोस्टात जी ठेव ठेवली जाते, त्यावरचं व्याज अत्यल्प असतं. ज्यांचा स्वत:चा शेअर बाजाराचा अभ्यास नसतो, त्यांना म्युच्युअल फंडांच्या एसआयपी किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमार्फत गुंतवणुकीचा मार्ग निवडता येऊ शकतो. कुठल्याही एका प्रकारात सर्व गुंतवणूक करणं हे योग्य नसतं. स्त्रियांनाही आता या गोष्टीचं भान येऊ लागलं आहे. घरोघरच्या गृहलक्ष्मीची पावलं गुंतवणुकीची वाट चालत आहेत. मुळातच भारतीय अर्थव्यवस्थेत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. आज खासगी बँका, फायनान्स कंपन्या, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज फर्म्स, कंपन्यांचं अध्यक्षपद वा व्यवस्थापकीय संचालकपद अशा सर्व ठिकाणी महिला पाहायला मिळतात. जिओसारख्या कंपनीत मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हीदेखील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर काम करत आहे.
भारताच्या अर्थमंत्रिपदी निर्मला सीतारमण आहेत. त्यांची पार्श्वभूमीही वित्तीय क्षेत्राचीच आहे. आर्थिक मर्यादेत घर चालवण्याची दृष्टी स्त्रियांकडे असतेच. पूर्वीच्या काळात स्त्रियांना अर्थकारणातलं काय कळतं असा सवाल हेटाळणीच्या सुरात केला जाई. पण, आजकाल महिला आर्थिक विषयात तरबेज होऊ लागल्या असून, देशातील शेअरबाजारातील एकूण गुंतवणूकदारांमधलं महिलांचं प्रमाण आता २५ टक्क्यांवर गेलं आहे. एनएसई किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या चालू वर्षाच्या अहवालानुसार, २०२३ पासून भारतातील महिला गुंतवणूकदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातही विशेष म्हणजे ईशान्य भारतातील मिझोरम, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमधील एकूण गुंतवणूकदारांमध्ये महिलांचं प्रमाण २९ टक्के आहे. खरं तर देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहाबाहेरची ही राज्यं आहेत. पण, तिथल्या महिला सुशिक्षित आणि मुख्य म्हणजे अर्थसाक्षर आहेत. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, आपल्याकडे एकूण गुंतवणूकदारांपैकी २९ टक्के या महिला आहेत.
तमिळनाडू, कर्नाटक व केरळ या दक्षिणी राज्यांमध्ये स्त्री गुंतवणूकदारांचं प्रमाण २७ टक्के आहे. उत्तर प्रदेशात महिला गुंतवणूकदारांचं प्रमाण १९ टक्केच आहे. बिहारमध्ये तर ते केवळ साडेसोळा टक्के आहे. उत्तर भारतातल्या या बड्या राज्यांमध्ये अजूनही सरंजामशाही व पुरुष वर्चस्वाची मानसिकता अधिक आहे. गुंतवणुकीची सुलभ प्रक्रिया, आर्थिक साक्षरतेत झालेली वाढ, आधुनिक तंत्रज्ञान, महिलांचं वाढलेलं उत्पन्न आणि बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचता येणं, या बाबींमुळे गुंतवणुकीकडे महिलांचा कल वाढला असल्याचं निरीक्षण एनएसईने नोंदवलं आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक चार नवीन गुंतवणूकदारांमध्ये जवळजवळ एक महिला आहे.
भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी तीन कोटी नवीन डिमॅट खाती उघडण्यात येत आहेत. अलीकडील काळात भारतीय कुटुंबांच्या बचत पद्धतींतही लक्षणीय बदल झाला आहे. पूर्वी स्वयंपाकपाणी झालं की महिला बँकेत ठेवींचे पैसे भरायला जात. पण, आजकाल म्युच्युअल फंड आणि जीवनविम्याकडे पैशांचा ओघ वाढू लागला आहे. २०२१ मध्ये घरगुती बचतीचा ४७ टक्के हिस्सा बँक ठेवींमध्ये असायचा, तो आता ४०-४२ टक्क्यांवर घसरला आहे; तर जीवनविमा फंडातील देशांतर्गत गुंतवणूक दोन टक्क्यांनी वाढली आहे. महिला गुंतवणूकदार दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर आणि म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. आज भारतातील प्रसिद्ध बिझनेस चॅनेल ‘सीनएबीसी टीव्ही १८’च्या व्यवसस्थापकीय संपादकपदी शिरीन भान या आहेत, तर ‘ब्लूमबर्गक्विंट’ (आता बीक्यू प्राईम) या चॅनेलमध्ये व्यवस्थापकीय संपादक म्हणून मेनका दोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशा इतर अनेक महिला आर्थिक पत्रकारांची नावं सांगता येतील. अर्थव्यवस्थेच्या पाळण्याची दोरी आज महिलाच सांभाळत आहेत.
आगामी काळात एआय, डेटा सेंटर, फारमॅस्युटिकल्स, ह्यूमन रिसोर्सेस, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी अशी क्षेत्रं विस्तारणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात महिला आपली छाप उमटवतील यात शंका नाही.
नंदिनी आत्मसिद्ध
nandini.atma@gmail.com
Read About : Dhanteras Significance and Rituals : धनत्रयोदशी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.