स्वदेशी सेन्सर्स, रडार, एआय आणि ड्रोनविरोधी प्रणालींच्या माध्यमातून घुसखोरीवर नजर
नवी दिल्ली : Anti-Drone Technology भारताच्या सीमासुरक्षेला अधिक स्वायत्त आणि अत्याधुनिक बनवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे. सेन्सर्स, दळणवळण व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोनविरोधी प्रणालींच्या माध्यमातून देशाच्या आव्हानात्मक सीमांवर देखरेख आणि त्वरित प्रतिसाद क्षमता मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
डीआरडीओच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण यंत्रणेचे महासंचालक बी. के. दास यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. घुसखोरांचा शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे, धोक्याची माहिती पोहोचवणे आणि गरज पडल्यास शत्रूची यंत्रणा निष्प्रभ करणे, अशा संपूर्ण सुरक्षा साखळीसाठी तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हायटेक सेन्सर्स आणि रडारची साथ
फायबर-ऑप्टिक्सवर आधारित घुसखोर शोध प्रणाली, उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, इन्फ्रारेड ट्रॅकिंग, हायपरस्पेक्ट्रल व मल्टीस्पेक्ट्रल प्रणाली, रडार इमेजिंग आणि सिंथेटिक ॲपर्चर रडार यांसारख्या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. या सर्व यंत्रणांना सक्षम दळणवळण प्रणालीची जोड देण्यासाठी पुढील पिढीतील कम्युनिकेशन तंत्रज्ञानही विकसित केले जात आहे.
ड्रोनविरोधी प्रणाली अधिक सक्षम
डीआरडीओने ड्रोनविरोधी प्रणालीची पहिली पिढी विकसित करून उद्योगांकडे उत्पादनासाठी हस्तांतरित केली असून, तिची तैनातीही महत्त्वाच्या भागांत करण्यात आली आहे. रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनचा शोध घेऊन त्याचा धोका निश्चित केला जातो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ड्रोनची यंत्रणा विस्कळीत करण्यासोबतच गरजेनुसार लेझर आधारित ‘हार्ड किल’ तंत्रज्ञानाचाही वापर करता येणार आहे.
एआयमुळे निर्णयक्षमता वाढणार
धोका ओळखणे, लक्ष्याचे विश्लेषण करणे आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी एआय व मशीन लर्निंग आधारित अल्गोरिदम विकसित केले जात आहेत. भविष्यात सेन्सर्स, रडार चिप्स, कॅमेरे, अल्गोरिदम आणि कम्युनिकेशन प्रणालींसह महत्त्वाची तंत्रज्ञाने पूर्णपणे स्वदेशी करण्याचे डीआरडीओचे उद्दिष्ट आहे. यामुळे भविष्यातील संघर्षांमध्ये भारताला निर्णायक तांत्रिक आघाडी मिळू शकते.

You need an account to post comments.