Ad Advertisement Ad Advertisement

Manoj Jarange Patil Hospitalised : २० व्या दिवशी मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर ( Manoj Jarange Patil Hospitalised) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते ( Manoj Jarange) मनोज जरांगे पाटील यांनी २० व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. उपोषणामुळे त्यांना तीव्र डिहायड्रेशन झाले असून, हायपोग्लायसेमिया, हायपोटेन्शन, किटोसिस तसेच इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Manoj Jarange) मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली. त्यानुसार ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, बुधवारी (दि.१६) रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तेथे मुक्काम केला. गुरुवारी पहाटे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देत उपोषण सोडल्याचे जाहीर केले. उपोषणामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील गॅलेक्सी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जरांगे यांच्या उपोषणाचा गुरुवारी २०वा दिवस होता. दीर्घकाळ उपोषण केल्याने त्यांच्या शरीरातील पाणी, रक्तातील साखर आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीवर परिणाम झाला आहे. सध्या डिहायड्रेशन, किटोसिस, हायपोग्लायसेमिया आणि इलेक्ट्रोलाइट्स पूर्ववत करण्यावर उपचार पथकाचे प्राधान्य आहे. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार सुरू आहेत. बुधवारी पाटोदा येथून पाठविण्यात आलेल्या रक्त तपासणी अहवालांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.

आता रुग्णालयात आल्यावर पुन्हा त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यातील अहवालांच्या आधारे पुढील उपचार निश्चित केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयाभोवती कडक पोलीस बंदोबस्त मनोज जरांगे यांना ज्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या रुग्णालयाभोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतरांना भेटण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. शुक्रवारी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलतील, असेही सांगण्यात आले आहे.

Read About : 70 TMC river linking project छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...