हार्वर्डच्या संशोधकांचे मशीन लर्निंग मॉडेल, मानसिक स्थितीतील बदलांच्या आधारे धोक्याची लवकर ओळख करण्याचा प्रयत्न
बॉस्टन : Suicide Prevention मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने आत्महत्येचा प्रयत्न होण्याच्या एक आठवडा आधीच ७५ टक्के आणि आत्महत्येशी संबंधित इतर घटनांपैकी ८७ टक्के घटना अचूकपणे वर्तवण्यात आल्या आहेत.
‘बॉस्टन ग्लोब’च्या वृत्तानुसार, या अभ्यासमुळे आत्महत्येचा धोका नेमका कोणाला आणि कधी आहे, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता मिळू शकेल. या संशोधनासाठी हार्वर्डच्या पथकाने बॉस्टनच्या दोन रुग्णालयांमध्ये आत्महत्येचे विचार मनात आल्यामुळे उपचारासाठी आलेल्या ६१९ प्रौढ आणि किशोरवयीन नागरिकांचा अभ्यास केला. पुढील सात दिवसांत आत्महत्येच्या प्रयत्नांचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्या फोन कॉलवर लक्ष ठेवण्यात आले. अभ्यासातील सहभागींनी तीन महिने दिवसातून सहा वेळा फोनवर २० प्रश्नांच्या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यांना नैराश्य, अस्वस्थता आणि आत्महत्येची भावना याविषयी १ ते १० च्या क्रमाने गुण देण्यास सांगण्यात आले. यातून गोळा केलेल्या तब्बल ८०,००० सर्वेक्षणांच्या माहितीचा अभ्यास मशीन लर्निंग मॉडेलच्या माध्यमातून करण्यात आला.
अस्वस्थता हे आत्महत्येचे प्रमुख कारण
या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाची बाब पुढे आली ती म्हणजे, नैराश्य नव्हे तर अस्वस्थता हे आत्महत्येचे मुख्य कारण किंवा ट्रिगर ठरते. प्रौढांमध्ये अस्वस्थतेच्या पातळीत प्रत्येक एका अंकाच्या वाढीमुळे पुढील आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता ११ टक्क्यांनी वाढते. अस्वस्थता म्हणजे कमालीची चिडचिड आणि अस्वस्थता होय. याउलट, ज्या व्यक्तींनी आत्महत्येच्या इच्छेवर नियंत्रण ठेवण्यास आपण सक्षम असल्याचे सांगितले, त्यांच्यामध्ये हा धोका कमी असल्याचे दिसून आले.
भविष्यातील उपाययोजना
या संशोधनाचे मुख्य लेखक आणि हार्वर्डचे मानसशास्त्र प्राध्यापक मॅथ्यू नॉॅक यांच्या मते, आता उच्च धोका असलेल्या व्यक्तींची अचूक ओळख पटल्यानंतर, संकटसमयी तातडीने मदत करण्यासाठी ‘जस्ट-इन-टाइम इंटरव्हेंशन्स’ विकसित केले जात आहेत. तसेच, एखाद्या व्यक्तीशी आत्महत्येविषयी उघडपणे बोलल्याने त्यांचा धोका वाढत नाही, त्यामुळे गरज असताना संवाद साधावा आणि योग्य वेळी वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही यात करण्यात आले आहे.
Read About : Surendra Koli Death : 2006 निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोलीचा हरिद्वारमध्ये अंत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.