१२५ किमीचा प्रवास करत गाठले बीड : महिनाभर उपचारानंतर पुनर्वसन
Indian Wolf Satellite Collar छत्रपती संभाजीनगर : येथे खोल विहिरीत गंभीर जखमी आणि अशक्त अवस्थेत आढळलेल्या भारतीय लांडग्याला तब्बल महिनाभराच्या उपचार, वैद्यकीय देखरेख आणि पुनर्वसनानंतर सॅटॅलाइट कॉलरींग करून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कॉलरींगचा हा मराठवाड्यातील पहिला तर राज्यातील दुसरा यशस्वी प्रयोग ठरला असून १२५ किमीचा प्रवास करत हा लांडगा आता बीड जिल्ह्याच्या हद्दीत पोचला असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
वन विभाग, मॅन विथ इंडिज फाउंडेशन आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून मराठवाड्यातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वर्षभर या कॉलरद्वारे मिळणाऱ्या माहितीचे निरीक्षण करून अध्ययन केले जाणार आहे. संभाजीगनरमधील सातारा तांडा ११ जुलै २०२६ रोजी हा लांडगा जखमी अवस्थेत आढळला होता. नाशिक येथील वन्यजीव उपचार केंद्रात त्यावर महिनाभर उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्याने येथून त्याला पुन्हा संभाजीनगर येथे आणून २७ ऑगस्ट रोजी कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कॉलरची बॅटरी वर्षभर चालते. ॲपद्वारे कॉलर डिॲक्टीव्हेट करताच ती गळून पडते. यामुळे पुन्हा वन्यजीवास पकडण्याची गरज भासत नाही.
वन्यजीव संकटात सापडल्यावर तातडीने बचाव, योग्य उपचार आणि सुरक्षित पुनर्वसन यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. या लांडग्याचे यशस्वी पुनर्वसन आणि निसर्गात मुक्तपणे विहार आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कॉलरद्वारे त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाईल, अभ्यास केला जाईल असे उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले. लांडगा हा गवताळ आणि कोरड्या परिसंस्थेतील महत्त्वाचा शिकारी असून परिसंस्थेचे संतुलन राखण्यात त्याची मोठी भूमिका आहे. सॅटेलाईट कॉलरद्वारे लांडग्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून सध्या हा प्राणी १२५ किमीचा प्रवास करत बीड जिल्ह्यात पोचला आहे. असे मानद वन्यजीव रक्षक आशिष जोशी यांनी स्पष्ट केले.
सॅटॅलाइट कॉलर म्हणजे काय?
हे वन्यप्राण्याच्या गळ्यात सुरक्षितपणे बसवले जाणारे उपकरण आहे. प्राण्याच्या हालचाली, तो कोणत्या अधिवासाचा वापर करतो? किती क्षेत्र वापरतो, कोणत्या मार्गाने स्थलांतर करतो, धोक्याचे ठिकाण आदी माहिती याद्वारे मिळवता येते. कॉलरचे पाच प्रकार पडतात. हे उपकरण महाग असते. मोजक्याच प्राण्यांना ते लावले जाते. राज्यातील निरीक्षण केंद्र पुण्यात स्थित आहे.
या माहितीचे होणार संकलन
लांडग्याचे महत्त्वाचे अधिवास ठिकाणे, धोक्याची ठिकाणे, भ्रमण मार्ग आदी माहितीचे या मोहीमेतून संकलन केले जाणार आहे. अत्यंत महाग असल्याने वाघांनाच शक्यतो ही कॉलर लावली जाते. लांडग्याचा पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविण्यात आला आहे.
रेडिओ कॉलरचे प्रमुख प्रकार
- VHF Radio Collar
VHF म्हणजे Very High Frequency. या प्रणालीमध्ये कॉलरमधून रेडिओ सिग्नल प्रसारित होतो आणि विशेष receiver व antenna च्या साहाय्याने प्राण्याचे स्थान शोधले जाते. प्रत्यक्ष field tracking साठी ही पारंपरिक आणि उपयुक्त पद्धत आहे. - GPS Collar
GPS आधारित कॉलर उपग्रहांच्या मदतीने प्राण्याचे स्थान निश्चित करून ठरावीक अंतराने location data नोंदवू शकतो. त्यामुळे प्राण्याचा home range, movement pattern आणि habitat use यांचा अधिक अचूक अभ्यास करता येतो. - GPS-GSM/Cellular Collar
या प्रकारात GPS location data cellular network च्या माध्यमातून संशोधकांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागात नियमित monitoring साठी ही पद्धत उपयुक्त ठरते. - Satellite Collar
दुर्गम आणि cellular network उपलब्ध नसलेल्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात फिरणाऱ्या प्राण्यांसाठी satellite communication आधारित collars उपयुक्त ठरतात. मात्र त्यांची किंमत आणि तांत्रिक देखभाल तुलनेने अधिक असते. - GPS–Accelerometer आधारित आधुनिक कॉलर
काही आधुनिक उपकरणांमध्ये GPS सोबत accelerometer असतो. त्यामुळे प्राण्याच्या हालचालींच्या नमुन्यांवरून तो चालत आहे, धावत आहे, विश्रांती घेत आहे किंवा त्याच्या activity pattern मध्ये बदल झाला आहे का, याचा अभ्यास करता येऊ शकतो.
Read About : Antarctica Ice Sheet : अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या थरात ६९५ अब्ज टनांची वाढ, उष्ण महासागरांचा अनोखा परिणाम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.