Ad Advertisement Ad Advertisement

Antarctica Ice Sheet : अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या थरात ६९५ अब्ज टनांची वाढ, उष्ण महासागरांचा अनोखा परिणाम

२०२१ ते २०२३ दरम्यान पूर्व अंटार्क्टिकात विक्रमी बर्फवाढ, उष्णकटिबंधीय महासागरातील तापमानवाढ आणि रॉस्बी वेव्हचा प्रभाव

नवी दिल्ली : Antarctica Ice Sheet हवामान बदलामुळे जगभरातील हिमनद्या आणि बर्फाचे थर वितळत असताना अंटार्क्टिकामध्ये मात्र एक अनोखी घटना घडल्याचे संशोधनातून समोर आले आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत पूर्व अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या थरात तब्बल ६९५ अब्ज टन बर्फाची वाढ झाली. पश्चिम प्रशांत महासागर आणि पूर्व हिंदी महासागरातील असामान्य तापमानवाढीमुळे ही बर्फवाढ झाल्याचे ‘नेचर’मध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

चिनी विज्ञान अकादमीच्या ‘इन्स्टट्यिूट ऑफ ओशनॉलॉजी’च्या संशोधकांनी या अनपेक्षित घटनेचा अभ्यास केला. ग्रेस उपग्रहांच्या निरीक्षणांसह बर्फाच्या नमुन्यांमधील हिमवर्षावाची नोंद, जलवाष्पाचा मागोवा आणि वातावरणीय प्रवाहाचे संगणकीय मॉडेल यांचा वापर करण्यात आला.

संशोधनानुसार, पश्चिम प्रशांत महासागर (पॅसिफिक) आणि पूर्व हिंदी महासागराच्या संगमाजवळील उष्णकटिबंधीय समुद्राचा भाग या काळात नेहमीपेक्षा अधिक उष्ण झाला. या उष्णतेमुळे वातावरणात ‘रॉस्बी वेव्ह’ निर्माण झाली आणि तिचा परिणाम पूर्व अंटार्क्टिकापर्यंत पोहोचला. ‘रॉस्बी वेव्ह’ म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीचे वातावरण आणि महासागर यांसारख्या फिरणाऱ्या द्रवांमध्ये (फ्युईड) निर्माण होणारे प्रचंड, नैसर्गिक आणि लहरींसारखे वळण.

अधिक आर्द्रता, मुसळधार हिमवृष्टी

वातावरणीय प्रवाहातील बदलांमुळे हिंदी महासागराच्या मध्य-अक्षांश भागातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता अंटार्क्टिकाकडे वाहून गेली. परिणामी मोठ्या प्रमाणात ओलसर हवा अंटार्क्टिकात पोहोचली. क्वीन मेरी लँड ते विल्क्स लँड या भागात जोरदार हिमवृष्टी झाली आणि त्यामुळे बर्फाच्या थरात मोठी भर पडली.

दीर्घकालीन चित्र मात्र चिंताजनक

संशोधकांच्या मते, ही वाढ तात्पुरती आहे. गेल्या दोन दशकांत पूर्व अंटार्क्टिका दरवर्षी सरासरी १४०.५ अब्ज टन बर्फ गमावत आहे. त्यामुळे ६९५ अब्ज टनांची ही वाढ दीर्घकालीन बर्फघटीला उलटवण्यासाठी पुरेशी नाही. या अभ्यासातून उष्णकटिबंधीय महासागरातील तापमानवाढ हजारो किलोमीटर दूर असलेल्या अंटार्क्टिकाच्या हिमवृष्टीवर आणि बर्फाच्या स्थितीवर कसा परिणाम करू शकते, याचा महत्त्वपूर्ण दुवा स्पष्ट झाला आहे. संशोधकांनी या प्रक्रियेला ‘ट्रॉपिकल वॉर्म पूलझ्रईस्ट अंटार्क्टिक आइस शीट टेलिकनेक्शन’ असे संबोधले आहे.

Read About: Export Growth: 2026 मध्ये भारताची निर्यात 25.4% वाढली; व्यापार तूट 9.41 अब्ज डॉलरवर

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...