Maharashtra Drought : जागतिक पातळीवर झालेल्या हवामान बदलाचा परिणाम गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रावर झाला आहे, तर यावर्षी ‘अल निनो’चा मान्सूनवर मोठा प्रभाव पडला. या प्रभावामुळे शेती, माती आणि शेतकरी संकटात सापडल्याचे दिसत आहे. अर्थात महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध हरविलेला दिसत आहे. ज्या मातीतून हिरवेगार स्वप्ने फुलून यायची, तिथे सध्या भेगा पडलेली जमीन दिसत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारली अन् संपूर्ण राज्य भीषण दुष्काळाच्या गर्तेत लोटले आहे. कोकणातील पाच जिल्हे वगळता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील शेती उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पावसाच्या दिवसांत आनंदाचा पाऊस पडणार नसेल, तर कधी पडणार? आणि हा वेदनांचा पाऊस सलग ४० पेक्षा अधिक दिवस येत नसेल, तर शेतात उभी असलेली पिके बळीराजाच्या डोळ्यांसमोर करपून राख होणार नाहीत काय? ज्या हातांनी रात्रंदिवस कष्ट करून मातीतून सोन्यासारखी पिके निघण्याची वाट बघितली, तोच हात कपाळावर मारण्याची वेळ आली असेल, तर शेतकऱ्यांसमोर हतबलतेशिवाय काय असेल?
राज्यात जूनपासून पावसाच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली, तर भयावह वास्तव दिसून येते. संपूर्ण राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत जी तूट आहे ती दोन आठवडे शिल्लक असलेल्या परतीच्या पावसात निघणार काय? मराठवाडा ३६ टक्के, तर विदर्भात २७ टक्के तूट आहे. नाशिक विभागासह बहुतांश जिल्ह्यांतील चित्र एवढे विदारक आहे की, तिथे शेतकरी अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. सोयाबीन, धान, कापूस, बाजरी, तूर, मका ही पिके शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहेत. मात्र सोयाबीन व बाजरीसारखी पिके पाण्याच्या दीर्घ ताणामुळे वाळून गेली आहेत. सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल ७० ते ९० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. कापूस आणि तुरीची वाढ खुंटली आहे, तर धानाचे नुकसानही ९० टक्क्यांवर आहे.
खरीप हंगामाच्या बळावर संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन बळीराजाकडून केले जाते. मात्र हंगाम अखेरच्या टप्प्यावर असताना दिसणारी भीषण परिस्थिती कुटुंब स्थलांतरणास भाग पाडणारी आहे. वर्तमानातच भविष्यातील दु:खाच्या लाटा दिसत असतील, तर उदरनिर्वाह करायचा कसा? मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करायचे कसे? काळ्या मातीतील उभी पिके करपून गेल्यामुळे बळीराजा पुरता उघड्यावर पडलेला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांना जवळ करत असताना पावसाने दिलेला दगा मोठ्या संकटाची नांदी ठरत आहे. अर्थात या संकटाचे वादळ शेतकरीच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही उमटल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रशासकीय निकषांची किंवा अहवालाची वाट न पाहता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पवारांनी पत्रात शेतकऱ्यांच्या वेदनांना वाट करून देत बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजारांची मदत देण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे, नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखाचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, प्रलंबित पीकविम्याची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, तसेच चारा छावण्या व पिण्याचे टँकर सुरू करून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
राज्यावर आलेल्या संकटावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार दुष्काळी परिस्थितीबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण न करता सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादात्मक निधीच्या मदतीसाठी ५ ऑक्टोबरनंतरचे पंचनामे ग्राह्य धरले जात असले, तरी त्या तारखेची किंवा केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणार आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेच्या तीन याद्या प्रसिद्ध झाल्या असून उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे लवकरच जाहीर करून त्यांना दिलासा दिला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे व सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांसाठी मदत व केंद्र सरकारकडे पाठवायच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. १८ जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून सविस्तर अहवाल येताच मदतीचा ठोस निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन वास्तव जाणून घेण्यासाठी कृषिमंत्री बांधावर पोहोचले आहेत.
पवारांचा पत्रव्यवहार, सरकारी घोषणा आणि मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही भविष्यातील चित्र काळजाला थरकाप आणणार आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस अनियमित राहिला. काही दिवसांत पडलेला पाऊस वाहून गेला. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. नद्या, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आता खरीप हंगाम तर हातचा जाणार आहे; पण आगामी रब्बी हंगाम धोक्यातच आहे. शेतात पीक नाही, हातात पैसा नाही अन् घरात अन्नाचा कण नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगण्याचे बळ कुठून आणायचे? हा चिंता निर्माण करणारा प्रश्न आहे. संकटाच्या या मालिकेत जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असणार आहे; परंतु राज्यात कर्जमाफी सुरू असताना सावकाराचे कर्ज कसे फेडणार? बँकेचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचे ओझे कसे पेलायचे, हा विचारच बळीराजाला ‘ही वेदनांची बंदीशाळा’ असल्याचे सांगणारा आहे. शेती पिकत नाही म्हणून दुष्काळ हे एवढ्यापुरतेच नाही, तर स्वप्नांची राख करणारा आहे. आशा आणि आकांक्षा मारणारा आहे. अस्मिता आणि स्वाभिमानाला ठेचणारा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने भक्कम आधार देण्याची गरज आहे, अन्यथा पिके करपत असताना बळीराजाचे भविष्यही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही!!
Read About : PM Anwar Ibrahim Sings Kishore Kumar Song : संस्कृती जोडणारा सेतू!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.