PM Anwar Ibrahim Sings Kishore Kumar Song : जगाच्या कानाकोपऱ्यांतील वेगवेगळ्या देशांची, प्रांतांची लोकांच्या संवादाची भाषा वेगवेगळी असेल, अन्य लोकांस ती कदाचित अनाकलनीयदेखील असेल; पण अशा विविधतेतदेखील मनाचे सूर जुळविणारी एक जागतिक भाषा आहे. ही भाषा जगाला जोडणारी आहे, माणसामाणसाचे नाते अधिक घट्ट करणारी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राजधानी दिल्लीत अलीकडेच संपन्न झालेल्या ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आपल्या भाषेपलीकडच्या सुरांचा सहारा घेत ‘और करीब आ जाओ’ असे अवीट आवाहन केले, आणि संगीत नावाच्या या माध्यमाने जगातील वेगवेगळ्या भाषांतून होणाऱ्या संवादाच्या सीमा ओलांडल्या आहेत हे सिद्ध झाले. संगीत हे भाषांची बंधने तोडणारे साधन आहे आणि संस्कृतींना जोडणारा सेतू आहे हेदेखील अन्वर यांच्या सुरांतून सिद्ध झाले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर यांनी गायिलेल्या किशोरदांच्या या अजरामर गीताच्या ओळी समाजमाध्यमांवर वेगाने फैलावल्या, लाखो लोकांपर्यंत त्या पोहोचल्या आणि भारतातील संगीतप्रेमींना सुखावणारा किशोरदांचा सूर भाषेची बंधने तोडून जगाच्या एका कोपऱ्यापर्यंत अजरामर होऊन गेला. ही ब्रिक्सच्या निमित्ताने भारताला सुखावणारी बाब म्हणावी लागेल. अन्वर यांना हिंदी भाषेचे ज्ञान नाही. तरीही, १९६० च्या दशकात गाजलेल्या या गीताचे बोल त्यांनी अस्खलितपणे गायिले, ही त्या सुरांची जादू आहे. संस्कृतीचे धागे धरून जागतिक स्तरावरील नेतेदेखील जगभरातील जनतेशी नाते कसे जोडू शकतात, याचे हे सुखद उदाहरण ठरले आहेच; पण जागतिक राजकारणाच्या पटावरील कामकाजाच्या गच्च गर्दीतही संगीताची जादू जगाला मोहवून टाकणारी ठरते, हेदेखील दिसून आले. भारतीय संगीत हे एक जागतिक आश्चर्य आहेच; पण लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांसारख्या महान गायकांनी या संगीताला उत्तुंग उंची प्राप्त करून दिली आहे, ही इब्राहिम अन्वर यांनी संगीताच्या सुरातून हृदयापासून उमटविलेली व व्यक्त केलेली भावना भारत आणि मलेशिया यांच्यातील सांस्कृतिक नात्यांचा सेतू अधिक मजबूत करणारी ठरली आहे. एखाद्या राष्ट्रप्रमुखाने दुसऱ्या देशातील लोकप्रिय गाणे गाणे ही वरकरणी साधी घटना वाटू शकते. परंतु राजनैतिक संबंधांच्या संदर्भात अशा प्रसंगांचे महत्त्व वेगळे असते. राजदूतांच्या भेटी, संयुक्त निवेदने, व्यापार करार आणि सामरिक भागीदारी या सगळ्यांपेक्षा कधी कधी एखादा सूर लोकांच्या मनापर्यंत अधिक सहज पोहोचतो. अन्वर इब्राहिम यांच्या किशोर कुमारांच्या गाण्याने नेमके हेच करून दाखवले आहे.
किशोर कुमार किंवा लता-आशा यांसारख्या गायक-गायिकांच्या स्वर्गीय सूर आवाज हा केवळ भारतीय चित्रपटसृष्टीचा ठेवा नाही, तो भारताच्या सांस्कृतिक स्मृतीचा एक भाग आहे. भाषेची सीमा ओलांडून त्यांची गाणी अनेक देशांमध्ये पोहोचली. भारताबाहेर जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनेक पिढ्यांनी हिंदी चित्रपट आणि त्यांच्या संगीतामधून भारताशी एक भावनिक नाते निर्माण केले. मलेशियामध्ये तर भारतीय चित्रपटसंगीताचे आकर्षण विशेष जुने आहे. भारतीय वंशाच्या समुदायाबरोबरच अन्य मलेशियन नागरिकांनाही हिंदी चित्रपट, गाणी आणि भारतीय लोकप्रिय संस्कृतीचे आकर्षण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मलेशियातील भारतीय समुदायाला संबोधित करताना भारतीय चित्रपट आणि संगीत मलेशियात लोकप्रिय असल्याचा उल्लेख केला आहे. अन्वर इब्राहिम यांच्या बाबतीत हे नाते अधिक व्यक्तिगत आहे. त्यांनी यापूर्वीही भारतीय चित्रपटसंगीताबद्दलची आपली आवड व्यक्त केली आहे. भारतातील आधीच्या भेटीत त्यांनी ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणेही गायले होते. किशोर कुमारांबद्दलची त्यांची आवड त्यामुळे एखाद्या क्षणिक प्रसिद्धीसाठी केलेली कृती नसून दीर्घकाळ जपलेल्या सांस्कृतिक आकर्षणाचा भाग आहे.
यातून ‘सॉफ्ट पॉवर’ या संकल्पनेचे सामर्थ्यही अधोरेखित होते. एखाद्या देशाची ताकद केवळ त्याच्या सैन्यशक्तीत, अर्थव्यवस्थेत किंवा तंत्रज्ञानात नसते. त्याच्या संस्कृतीत, भाषेत, संगीतामध्ये, चित्रपटांमध्ये आणि लोकांच्या मनावर उमटलेल्या प्रतिमेतही ती असते. भारताने गेल्या अनेक दशकांत कोणतीही औपचारिक मोहीम न राबवता आपल्या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जगभरात अशीच सांस्कृतिक उपस्थिती निर्माण केली आहे. राज कपूरपासून अमिताभ बच्चनपर्यंत आणि लता मंगेशकरांपासून किशोर कुमारांपर्यंत असंख्य कलाकारांनी भारतासाठी ही सांस्कृतिक दारे उघडली. राजकारण जिथे मतभेद निर्माण करू शकते, तिथे संस्कृती अनेकदा संवादाची जागा निर्माण करते. देशांमधील सरकारे बदलतात, परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम बदलतात, जागतिक समीकरणे बदलतात; पण एखादे आवडते गाणे पिढ्यान्पिढ्या मनात टिकून राहते. त्यामुळे सांस्कृतिक संबंध हे राजकीय संबंधांपेक्षा अनेकदा अधिक दीर्घकालीन असतात. भारत आणि मलेशियाचे संबंध याच अर्थाने केवळ राजकीय गरजांवर उभे नाहीत. भारतीय वंशाचा मोठा समुदाय मलेशियात आहे. व्यापार, शिक्षण, पर्यटन, धर्म, खाद्यसंस्कृती आणि मानवी स्थलांतराच्या अनेक प्रवाहांनी दोन्ही समाजांना जोडले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनीही मलेशियातील भारतीय समुदायाला ‘दोन्ही देशांना जोडणारा जिवंत पूल’ असे संबोधले आहे.
म्हणूनच अन्वर इब्राहिम यांच्या आवाजातील किशोर कुमारांचे गाणे हा केवळ मनोरंजनाचा प्रसंग नाही. तो या दीर्घ सांस्कृतिक संवादाचा एक प्रतीकात्मक क्षण आहे. कूटनीती म्हणजे केवळ कठोर शब्दांत मांडलेली राष्ट्रीय भूमिका नव्हे. त्यात मैत्री आहे, आदर आहे, परस्परांच्या संस्कृतीची ओळख आहे आणि कधी कधी एकत्र गुणगुणलेले गाणेदेखील आहे. अन्वर इब्राहिम यांनी हिंदी भाषेतील गाणे गाऊन भारतीय जनमानसाशी साधलेला संवाद हा औपचारिक बैठकीत झालेल्या चर्चेपेक्षा वेगळा असला, तरी तो अधिक मानवी आहे. आज जगात तणाव वाढत असताना अशा सांस्कृतिक सेतूंची गरज अधिक आहे.
Read About: Donald Trump : ट्रम्पकृत ‘रेवडी’ कार्ड!
E-Paper : Punyanagari E-Paper

You need an account to post comments.