जुन्या कारच्या एकूण विक्रीत या ६ मॉडेल्सचा २०.३% वाटा; मारुती स्विफ्ट ४.८% हिस्स्यासह ठरली सर्वाधिक विकली जाणारी कार
गुरुग्राम : Used Cars Market भारतातील जुन्या कारच्या बाजारपेठेत सध्या वाढ पहायला मिळत आहे. जुलै २०२६ पर्यंतच्या अंतर्गत व्यवहारांच्या आकडेवारीनुसार जुन्या कारच्या एकूण विक्रीमध्ये केवळ ६ मॉडेल्सचा वाटा तब्बल २०.३ टक्के आहे. याचा अर्थ बाजारात विकल्या जाणाऱ्या दर पाच जुन्या कारपैकी एक कार या सहा मॉडेल्सपैकी असते. यामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार ४.८ टक्के वाट्यासह पहिल्या क्रमांकावर अव्वल स्थानावर आहे.
नवीनपेक्षा जुन्या कारच्या बाजाराचा वेग दुप्पट
चालू आर्थिक वर्षात भारतातील जुन्या कारची बाजारपेठ ८ ते १० टक्के वाढून सुमारे ६० लाख युनिट्सवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा वेग नवीन कारच्या बाजारपेठेच्या तुलनेत दुप्पट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहरी भागातील ग्राहकांना आपले बजेट न वाढवता एका विश्वासू आणि चांगल्या स्थितीत असलेल्या गाडीची गरज असते. नवीन कारच्या किमतींच्या तुलनेत त्याच बजेटमध्ये जुन्या कार ग्राहकांना अधिक चांगला पर्याय देतात. एकूण बाजाराचा विचार केला तर मारुती सुझुकी ३३ टक्के वाट्यासह सर्वांत पुढे आहे, तर ह्युंडाई २२ टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित बाजार इतर कंपन्यांमध्ये विभागला गेला आहे.
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ६ कार
- १. मारुती सुझुकी स्विफ्ट (वाटा ४.८ टक्के) : गेल्या दोन दशकांपासून ही कार नवीन कारच्या शो-रुममध्ये किंग राहिली आहे आणि तीच लोकप्रियता जुन्या कारच्या बाजारातही कायम आहे. विशेषत: तरुण वर्ग आणि आयुष्यातील पहिलीच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये स्विफ्टची क्रेझ आजही कायम आहे.
- २. मारुती सुझुकी वॅगन आर १.० (वाटा ३.४ टक्के) : आपल्या पारंपरिक उंच डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेली वॅगन आर मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती आहे. कमी इंधन खर्च (मायलेज) आणि आत असणारी प्रशस्त जागा यामुळे ही कार इतर फॅशनेबल हॅचबॅक गाड्यांना मागे टाकते.
- ३. होंडा सिटी (वाटा ३.४ टक्के ) : जुन्या कारच्या बाजारात सर्वाधिक विकली जाणारी ही एकमेव मोठी सेडान कार आहे. जे ग्राहक हॅचबॅक कारमधून अपग्रेड होऊन अधिक आरामदायी प्रवास आणि मोठी स्पेस शोधत असतात, ते एसयूव्ही कडे न जाता होंडा सिटीला प्राधान्य देतात.
- ४. ह्युंडाई आय १० (वाटा ३.३ टक्के) : ह्युंडाई कंपनीने ही कार नवीन बाजारात विकणे अनेक वर्षांपूर्वी बंद केले आहे, तरीही जुन्या कारच्या बाजारात हिची मागणी प्रचंड आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर चालवण्यास सोपी, पार्कींंगसाठी सोयीची आणि कमी देखभालीचा खर्च ही हिची मुख्य कारणे आहेत.
- ५. ह्युंडाई ग्रँड आय १० (वाटा २.७ टक्के) : मूळ आय १० ची ही पुढची आवृत्ती आहे. यामध्ये जास्त जागा आणि आधुनिक फीचर्स मिळतात. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारच्या इंजिनमध्ये उपलब्ध असल्याने, जे ग्राहक लांबच्या प्रवासासाठी उत्तम मायलेज देणारी डिझेल कार शोधत असतात, ते या कारची निवड करतात.
- ६. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (वाटा: २.७ टक्के ) : ही एक कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. स्विफ्ट कारचा विश्वासू परफॉर्मन्स आणि इंजिनसह मागे अतिरिक्त डिक्की (बूट स्पेस) हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बजेटमध्ये सेडान कारचा आनंद देते.
Read About : China AI Digital face Licensing : आपला चेहरा विका नि पैसे कमवा!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.