एआय शॉर्ट ड्रामा आणि जाहिरातींसाठी डिजिटल फेस-लायसन्सिंगची क्रेझ
बीजिंग : China AI digital face licensing : चीनमध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा एक अनोखा आणि नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. एआय-निर्मित शॉर्ट ड्रामा, चित्रपट, जाहिराती आणि गेम्ससाठी सामान्य नागरिक आपले चेहरे डिजिटल प्लॅटफॉर्म्सना अधिकृतपणे भाड्याने किंवा विकत देत आहेत. या व्यवहारातून लोक ५० युआन (सुमारे ५०० रुपये) ते ९९,९९९ युआन (सुमारे १२ लाख ६०हजार रुपये) पर्यंत कमाई करत आहेत.
यावर्षी एप्रिल महिन्यापासून या व्यवसायाने जोर धरला असून चित्रपटसृष्टीच्या गुप्त ग्रुप्समधून हे व्यवहार आता सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत. ‘नॅशनल बिझनेस डेली’च्या वृत्तानुसार, चीनमधील एका बँक कर्मचाऱ्याचे फोटो एका जाहिरात कंपनीने अवघ्या ३ दिवसांत ७ वेळा वापरले, ज्यातून त्या कर्मचाऱ्याला जवळपास २,५०० युआन (सुमारे ३१ हजार रुपये) चे उत्पन्न मिळाले.
प्लॅटफॉर्म कसे करतात काम?
- युआनशियांग शिनशेंग : मे महिन्यात सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मवर नागरिक आपले ‘डिजिटल अॅक्टर प्रोफाइल’ तयार करू शकतात. युझर्स आपला चेहरा कुठे वापरावा आणि कुठे वापरू नये, याच्या अटी ठरवू शकतात.
प्लॅटफॉर्मवरील ३४ वर्षांचा चेन नावाचा नागरिक आपल्या चेहऱ्याच्या एका वापरासाठी ९९ युआन आकारतो. त्याने रोमँटिक आणि कौटुंबिक ड्रामासाठी परवानगी दिली आहे, पण हॉरर किंवा अश्लील कंटेंन्टसाठी नकार दिला आहे. - शिनझुआ : चेंगदू शहरात सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मवर ३७० हून अधिक डिजिटल अभिनेत्यांचे प्रोफाईल उपलब्ध आहेत. येथे ५०० ते ६,००० युआन दरम्यान फी आकारली जाते. टीव्ही जाहिराती, मॉडेलिंग, अॅनिमेशन आणि चित्रपटांसाठी हे चेहरे वापरले जातात.
चित्रपट निर्मितीचा खर्च कमी
एआय शॉर्ट ड्रामा बनवणारे दिग्दर्शक आणि निर्मिती संस्था या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे खऱ्या कलाकारांना घेण्याचा आणि चित्रपट निर्मितीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाचत आहे. तसेच, नागरिकांना वाटत आहे की, ‘कोणीतरी आमचा चेहरा एआयने चोरी करण्यापेक्षा, आम्हीच त्याचे पैसे घेतलेले बरे.’
कायदेशीर अडचणी आणि धोके
या नवीन व्यवसायामुळे काही कायदेशीर आणि गोपनीयतेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत लहान मुलांचे (१४ वर्षांखालील) चेहरे वापरण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे, मात्र १६ ते १७ वर्षांचे तरुण परिणामांचा विचार न करता सहज परवानगी देऊ शकतात.
‘बीजिंग न्यूज’ आणि कायदेतज्ज्ञ दाई युए यांनी इशारा दिला आहे की, काही प्लॅटफॉर्म युझर्सकडून एकतर्फी करारावर सह्या करून घेतात. जर युझरने अचानक परवानगी मागे घेतली, तर त्याच्यावर ५०,००० युआन (सुमारे सहा लाख २५ हजार रुपये) पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया
- चिनी सोशल मीडियावर या विषयावर दोन तट पडले आहेत. एका युझरने म्हटले, ‘साध्या माणसाला नट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि घरी बसून पैसे कमवण्याची ही उत्तम संधी आहे.’
तर दुसऱ्या एका युझरने शंका उपस्थित करत लिहिले, ‘दिग्दर्शकांसाठी फक्त सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांना महत्त्व असते. सामान्य माणसाचे चेहरे तर एआय स्वत:हूनही तयार करू शकते, मग यासाठी पैसे कोण देईल?’ - फोटो ओळ : चीनमधील ‘द लेड-ऑफ गर्ल’ या लोकप्रिय एआय शॉर्ट ड्रामाच्या स्क्रीनशॉटने सध्या इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला हा चित्रपट आणि त्यातील पात्रे इतकी हुबेहूब आणि खरीखुरी दिसतात की, प्रेक्षकांसाठी तो स्क्रीनशॉट खरा की बनावट हे ओळखणे अशक्य झाले आहे.
Read About : Russia Geran Drones : रशियाने गेरान ड्रोनला बनवले क्रूझ मिसाइल
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.