Ad Advertisement Ad Advertisement

Tower of London : टॉवर ऑफ लंडन

Tower of London : लंडन! जगभरातल्या पर्यटकांच्या स्वप्नांची नगरी!! या शहराच्या मध्यभागी, थेम्स नदीच्या काठावर एक ऐतिहासिक किल्ला उभा आहे. पण, तो नुसता किल्ला नाहीये तर त्यातल्या प्रत्येक दगडात सत्ता, रहस्य, विश्वासघात आणि रक्तपाताच्या कहाण्या दडलेल्या आहेत. या किल्ल्याचं नाव आहे (Tower of London) ‘टॉवर ऑफ लंडन!’

Tower of London टॉवर ऑफ लंडनची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते. हा किल्ला थेम्स नदीच्या काठावर सुमारे १२ एकर परिसरात पसरलेला असून, शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला दुहेरी तटबंदी आणि खंदकाची मजबूत सुरक्षा देण्यात आली आहे. या संपूर्ण संरचनेच्या अगदी मध्यभागी या किल्ल्याचा सर्वात जुना आणि मुख्य सांगाडा असलेला ‘व्हाइट टॉवर’ उभा आहे. या मध्यवर्ती टॉवरच्या चारी बाजूंना तटबंदीचे दोन थर आहेत. आतल्या तटबंदीमध्ये १३ वेगवेगळे मनोरे आहेत, तर बाहेरच्या तटबंदीमध्ये सुरक्षेसाठी आणखी सहा लहान मनोरे उभारले आहेत. किल्ल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजे आणि ऐतिहासिक पूल आहेत. पूर्व आणि पश्चिम भागात लष्करी शस्त्रागार, सैनिकांच्या बराकी, क्राउन ज्युएल्स ठेवलेले सुरक्षित तळघर आणि ऐतिहासिक प्रार्थनास्थळ अशी विविध दालनं विभागलेली आहेत.

१०६६ साल! ‘विल्यम द कॉन्करर’ यानं फ्रान्सहून येऊन इंग्लंडवर मात केली. त्यानंतर लंडनच्या नागरिकांवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मनात एक प्रकारचा धाक व आदर निर्माण करण्यासाठी त्यानं एका अभेद्य किल्ल्याची पायाभरणी केली. शहराच्या मध्यभागी, थेम्स नदीच्या काठावर हा विशाल किल्ला उभारण्यात आला.

सुरुवातीला हा राजवाडा होता. इंग्लंडच्या अनेक राजांचं इथे वास्तव्य होतं, पण काळ बदलत गेला आणि या किल्ल्याची भूमिकाही बदलत गेली. काळाच्या ओघात त्याने कुप्रसिद्ध तुरुंग, अत्यंत सुरक्षित शस्त्रागार, शाही टांकसाळ, अद्भूत प्राणीसंग्रहालय आणि ब्रिटनचा अमूल्य राजखजिना Crown Jewels (क्राऊन ज्वेल्स) जपून ठेवणारे तळघर अशा अनेक भूमिका निभावल्या.

या किल्ल्याच्या दगडी भिंतींनी अनेक नामवंत आणि शाही व्यक्तींचा करुण अंत पाहिला आहे. इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याची सुंदर पण दुर्दैवी दुसरी पत्नी, राणी ॲन बोलेनवर देशद्रोह आणि व्यभिचाराचे खोटे आरोप ठेवून त्यांना याच किल्ल्यात कैद करण्यात आलं होतं. १५३६ मध्ये किल्ल्याच्या परिसरातच तलवारीच्या एका घावात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. राणी ॲन बोलेन यांचे भूत स्वत:चे कापलेले शीर हातात धरून रात्रीच्या वेळी या किल्ल्याच्या परिसरात भटकत असते अशी दंतकथा आहे!

फक्त ॲन बोलेनच नव्हे तर अवघ्या नऊ दिवसांची राणी ‘लेडी जेन ग्रे’, प्रसिद्ध तत्त्वज्ञ थॉमस मोअर आणि गनपावडर प्लॉटचा सूत्रधार गाय फॉक्स यांसारख्या शेकडो ऐतिहासिक व्यक्तींनी या अंधारकोठडीत आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मोजले. आजही कैद्यांनी तिथल्या भिंतींवर आपल्या नखांनी व खिळ्यांच्या मदतीने कोरलेली नावं, प्रार्थना आणि चिन्हं पर्यटकांच्या अंगावर काटा आणतात. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, १९४१ मध्ये हिटलरचा उपप्रमुख रुडॉल्फ हेस यालाही याच किल्ल्यात कैद करण्यात आलं होतं. हेस या किल्ल्याचा शेवटचा राजकीय कैदी ठरला!

या किल्ल्याशी अनेक कहाण्याही जोडल्या गेल्या. त्यातल्या अनेक प्रसिद्धही झाल्या. त्यातली सर्वांत गूढ कथा म्हणजे ‘दोन राजकुमारांचं रहस्य.’ १४८३ मध्ये इंग्लंडचा अवघ्या १२ वर्षांचा राजा एडवर्ड पाचवा आणि त्याचा ९ वर्षांचा धाकटा भाऊ रिचर्ड यांना त्यांच्या कपटी काकानं म्हणजेच रिचर्ड तिसऱ्यानं, सुरक्षिततेच्या नावाखाली टॉवर ऑफ लंडनमध्ये आणून ठेवलं. त्यानंतर काही दिवसांतच हे दोन्ही छोटे राजकुमार किल्ल्याच्या अंधारकोठडीतून अचानक गायब झाले! ते पुन्हा कधीच जिवंत दिसले नाहीत. १६७४ मध्ये या किल्ल्याच्या एका जिन्याखाली दोन लहान मुलांचे सांगाडे सापडले. ते त्या निष्पाप राजकुमारांचेच सांगाडे असावेत असा आजही ठाम विश्वास आहे, पण आजतागायत हे रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही.

या किल्ल्यातलं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे (Crown Jewels) क्राऊन ज्वेल्स! ब्रिटिश राजघराण्याचे अनेक अमूल्य दागिने, मुकुट, राजदंड आणि इतर राजचिन्हं आपल्याला या किल्ल्यात बघायला मिळू शकतात. यामध्ये हजारो हिरे, माणके, पाचू आणि इतर मौल्यवान रत्नं जडवलेली आहेत. भारतातून नेलेला ऐतिहासिक ‘कोहिनूर’ हिरा आणि ३,१०० कॅरेटचा जगातला सर्वांत मोठा ‘कलिनन’ हिरा याच खजिन्यात आपल्याला बघायला मिळतात. इंग्लंडच्या प्रत्येक राज्याभिषेकात हेच दागिने वापरले जातात. हा जगातला सर्वांत सुरक्षित खजिन्यांपैकी एक मानला जातो.

टॉवर ऑफ लंडनमध्ये (Tower of London) एकेकाळी राजांचं खाजगी ‘प्राणीसंग्रहालय’ होतं. वेगवेगळ्या देशांतल्या राजांनी भेट म्हणून दिलेले सिंह, बिबटे, हत्ती, माकडे आणि अगदी एक ध्रुवीय अस्वल इथे ठेवले होते. स्वत: पोहून ताज्या माशांची शिकार करता यावी म्हणून ध्रुवीय अस्वलाला साखळीने बांधून थेम्स नदीच्या पाण्यात सोडले जायचं असं म्हणतात. पुढे याच संग्रहाचं प्रसिद्ध ‘लंडन झू’मध्ये रूपांतर झालं.

या किल्ल्याशी जोडलेली आणखी एक गमतीशीर आणि भयावह दंतकथा म्हणजे कावळ्यांची परंपरा! जर टॉवर ऑफ लंडनमधून (Tower of London) हे कावळे सोडून गेले किंवा नष्ट झाले तर ब्रिटिश साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल अशी इंग्लंडमध्ये जुनी आख्यायिका आहे, म्हणूनच आजही या किल्ल्यात किमान सहा कावळे नेहमी सन्मानाने ठेवले जातात. त्यांच्या देखभालीसाठी ‘रावेनमास्टर’ नावाचा स्वतंत्र रक्षक असतो, त्यांच्या आरोग्याची शाही काळजी घेतली जाते आणि ते दूर उडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या पंखांची हलकी छाटणी केली जाते, त्यामुळे हे कावळे किल्ल्याच्या आत मनसोक्त विहार करत असले तरी त्यांना किल्ल्याच्या बाहेर मात्र उडता येत नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन विमानांनी लंडनवर केलेल्या तुफान बॉम्बहल्ल्यांमध्ये या किल्ल्याचं थोडं नुकसान झालं असलं तरीही हा पोलादी सांगाडा तसाच अढळ राहिला. त्या कठीण काळात अमूल्य राजदागिने गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते.

दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. काहीजण इतिहास अनुभवण्यासाठी येतात, काही ‘क्राउन ज्युएल्स’चा डोळे दिपवणारा झगमगाट पाहण्यासाठी, तर काही भुतांच्या कथांच्या थरारासाठी!

Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.