Barbara McClintock : परदेशातही मुलालाच कुलदीपक मानले जात असे. आपल्याकडे नको असतानाही मुलगी जन्मली तर तिचे ‘नकुशी’ असे नाव ठेवले जायचे. विदेशात, त्यातही अमेरिकेत एका सुशिक्षित घरात जन्मलेल्या मुलीचे नशीबही असेच होते. नको असताना जन्माला आली, म्हणून तिचे नाव ठेवण्यात आले बार्बारा, म्हणजेच नकुशी. तिचे घरात कोणी लाड करत नसे. तिच्याकडे फारसे कोणी लक्षही देत नसे. घरात आहे म्हणून खायला-प्यायला दिले जायचे. तिच्या पाठीवर घराचा कुलदीपक जन्मला, तरी तिच्याशी वागणे तेच राहिले. मात्र, याच नकुशीने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने घराण्याचे नाव अजरामर केले.
बार्बारा मॅक्लिंटॉक यांचा जन्म १६ जून १९०२ रोजी अमेरिकेतील हार्टफोर्ट भागात झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. बार्बारांचे खरे नाव इलेनॉर होते. मात्र, घरात सलग तिसऱ्या मुलीच्या रूपात त्यांचा जन्म झाल्याने सर्वांनाच त्या नको होत्या, म्हणूनच त्यांना सर्वजण बार्बारा म्हणजेच नकुशी म्हणू लागले. शाळेतही हेच नाव नोंदवले. तिला तिच्या मामाकडे पाठवून देण्यात आले. त्यांचे मामा मासेमारीचा व्यवसाय करत. बार्बारा त्यांना मासे विकण्यास मदत करत, त्यामुळे त्या मुलाप्रमाणे वागू लागल्या. पुढे त्यांच्या वडिलांनी ब्रुकलिन भागात स्थलांतर केले. तेथे बार्बारांना बोलावून घेण्यात आले. तिथे त्यांची शाळा सुरू झाली आणि पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला.
वडिलांनी सैनिकांची सेवा करण्यासाठी फ्रान्सला जाण्याचा निर्णय घेतला. वडील तिकडे गेले तरी कुटुंब अमेरिकेतच राहिले. त्यांनी इरॅस्मस हॉल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता, मात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला तर लग्नाचे वय निघून जाईल, म्हणून आईने त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशास विरोध केला. दरम्यान युद्ध संपले, वडील फ्रान्समधून परत आले. त्यांनी मात्र बार्बारांना पुढे शिक्षण घेण्यास परवानगी दिली आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले.
घरातील वातावरणामुळे, घरातील त्यांच्याशी असलेल्या वागण्यामुळे बार्बारा यांचे महाविद्यालयातील वागणे चांगले नव्हते. धूम्रपान करणे, मोठ्याने हसणे, मुलांसारखा गोंधळ घालणे अशा अनेक गोष्टी त्या करत. मात्र, पुढे त्यांच्याच लक्षात आले की असे वागणे त्यांच्या ज्ञान मिळवण्याच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. त्यांनी स्वत:च अशा सर्व गोष्टींचा त्याग केला व त्या अभ्यास करू लागल्या. १९२३ मध्ये त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयात त्यांना वनस्पतीशास्त्रात रूची निर्माण झाली. त्यातही जनुकशास्त्राने त्या प्रभावित झाल्या. बार्बारा यांच्यापूर्वी काही संशोधकांनी मक्यावर संशोधन सुरू केले होते. बार्बारा त्या गटात सहभागी झाल्या. त्या काळात त्यांनी जनुकशास्त्रात संशोधन केले, मात्र कार्नेल विद्यापीठाने त्यांना जनुकशास्त्रातील पदवी प्रदान केली नाही. त्याकाळी महिलांनी जनुकशास्त्रावर संशोधन करण्यास कार्नेल विद्यापीठात बंदी होती. त्यांना १९२५ मध्ये एम. एस. आणि १९२७ मध्ये वनस्पतीशास्त्रातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
शिक्षण पूर्ण होताच त्यांची निदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना आता संशोधनासाठी कमी वेळ मिळू लागला, तरीही त्यांनी संशोधन नेटाने सुरू ठेवले. त्यांच्या संशोधनाचे महत्त्व कार्नेल विद्यापीठातील प्राध्यापक मार्कस ऱ्होडस यांच्या लक्षात आले. त्यांना जनुकशास्त्रातील ज्या प्रयोगात यश मिळत नव्हते, तेच प्रयोग बार्बारा मात्र यशस्वीरित्या करत होत्या. ऱ्होडस यांनी बार्बारा यांच्या प्रयोगात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बार्बारांचे शोधनिबंध प्रसिद्ध होऊ लागले. प्रा. शार्प यांनी बार्बारांच्या संशोधनाची दखल आपल्या पुस्तकात घेतली तरीही बार्बारांच्या कार्याची दखल कार्नेल विद्यापीठाने घेतली नाही. त्यांना प्राध्यापक पद न देता निदेशक पदावरच ठेवले.
बार्बारा (Barbara McClintock) मात्र अन्यायाकडे लक्ष न देता आपल्या संशोधनात मग्न होत्या. बार्बारा अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या प्रयोगाच्या नोंदी ठेवत. प्रयोगशाळा स्वच्छ ठेवत. शिस्त पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मुक्तहस्ताने ज्ञान देत. प्रयोगशाळेतील शिस्त त्या घरातही पाळत. या शिस्तबद्धतपणामुळेच त्यांना प्रयोगातून अचूक निर्णय मिळत होते. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. संशोधन करायचे तर आपण विवाहाचे बंधन स्वीकारायचे नाही असे त्यांनी ठरवले आणि आयुष्यभर अविवाहित राहिल्या. संध्याकाळी काही काळ टेनिस खेळणे सोडले तर इतर सर्व वेळ त्यांच्या मनामध्ये संशोधनाचे विचार सुरू असत. त्यांनी जनुकशास्त्रातच संशोधन करायचे ठरवले, मात्र ते विद्यापीठाला रूचणारे नव्हते; त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळची जमीन प्रयोगासाठी देण्यात आली नाही. त्याऐवजी तेथून दूर टेकडीवरची जमीन देण्यात आली. तेथे लावलेल्या रोपांना घालण्यासाठी पाणीही उपलब्ध नव्हते, मात्र बार्बारा हार मानणाऱ्या नव्हत्या.
त्यांनी टेकडीच्या माथ्यावर मक्याची शेती केली. तेथे त्या पाणी वाहून नेत. जास्त पाऊस पडला तर रात्रीच्यावेळी मोटारीच्या प्रकाशात वाहून जाणारी रोपे अडवून त्या रोपांना पुन्हा लावत. अशा खडतर परिस्थितीत संशोधन करून त्या आपले शोधनिबंध प्रकाशित करत राहिल्या. त्या काळात हॅरियट नावाची कष्टाळू विद्यार्थिनी त्यांना भेटली. तिच्यासमवेत प्रयोग करून त्यांनी अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले. नवे वाण तयार करण्याचे तंत्र त्यांना सापडले. मात्र, विद्यापीठातून मिळणारी निराशाजनक वागणूक पाहून त्यांनी आपले संशोधन प्रकाशित केले नाही. याचदरम्यान कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक मॉर्गन कार्नेल विद्यापीठात आले होते. त्यांनी बार्बारांचे संशोधन पाहिले. बार्बारांच्या संशोधनाने ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी बार्बारांना आपले संशोधन तत्काळ प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. त्यातील १९३१ मध्ये प्रकाशित झालेला शोधनिबंध खूपच महत्त्वाचा ठरला. मक्याचे संकरित वाण तयार करताना कालपरत्वे होणारे बदल या शोधनिबंधात मांडण्यात आले होते. बार्बारा यांनी मॉर्गन यांचे म्हणणे ऐकले नसते तर या शोधाचे श्रेय कर्ट स्टर्न यांना मिळाले असते, कारण बार्बारा यांचे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांतच स्टर्न यांचे याच विषयावरचे संशोधन प्रसिद्ध झाले.
जगभरातून बार्बारा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. मात्र, कार्नेल विद्यापीठातून त्यांचा वारंवार अपमान होत राहिला. त्यांच्या कार्याची कसलीच दखल घेतली जात नव्हती. त्यांना साधे प्राध्यापक पदही देण्यात आले नव्हते. त्या काही काळ खूप निराश झाल्या. अखेर त्यांनी कार्नेल विद्यापीठ सोडून मिसौरी विद्यापीठात संशोधन सुरू केले. तेथे केलेल्या संशोधनातून त्यांनी संकरित वाण तयार केले. त्यांना अनेक शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या. घरापासून विद्यापीठापर्यंतची नकुशी सेलिब्रिटी झाली… केवळ ज्ञानाच्या जोरावर! अखेर कार्नेल विद्यापीठ झुकले आणि त्यांना प्राध्यापक पदावर सन्मानाने नियुक्त केले.
डॉ. व्ही. एन. शिंदे
संपर्क : ९६७३७८४४००
Read About : Vulture Parenting : पिल्लांच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेणारा पक्षी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.