Ad Advertisement Ad Advertisement

Shreyas College Professor Attack परीक्षेला बसू न दिल्याचा राग; 9 जणांचा विभाग प्रमुखावर फायटरने हल्ला

श्रेयश कॉलेजमधील प्रकार; प्राचार्यांच्या केबिनमध्येच राडा, प्राध्यापकाचे बोट फ्रॅक्चर

छत्रपती संभाजीनगर : Shreyas College Professor Attack परीक्षेला बसू न दिल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी बाहेरच्या गुंडांना बोलावून घेत थेट प्राचार्यांच्या केबिनमध्येच विभाग प्रमुखावर हल्ला केला. महाराष्ट्रात राहून हिंदीत का बोलतोस, असा जाब विचारत हल्लेखोरांनी प्राध्यापकाला लाथाबुक्क्यांनी व हातातील फायटरने मारहाण केली. यात प्राध्यापकाच्या उजव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली असून, तक्रार दिल्यास तुला पार्सल करून तुझ्या राज्यात पाठवू, अशी धमकी दिली. ही घटना सातारा परिसरातील श्रेयश कॉलेजमध्ये सोमवारी (दि. २३) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बालाजी राठोड (२०), विजय चव्हाण (२०), ओमकार डंक (२०), चेतन व्यवहारे (२०), सचिन राठोड (३०), मुकेश राठोड (३५), ऋषिकेश बंजारा (२१), ओम पवार (२१) आणि रोहित पवार (२०, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत, असे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले. विजयकुमार एमपी (वय ३४, रा. सिडको एन-१, मूळ रा. शिवमोग्गा, कर्नाटक) असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे. ते श्रेयश कॉलेजमध्ये विभाग प्रमुख आहेत. कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षातील बालाजी, विजय, ओमकार आणि चेतन यांनी १७ नोव्हेंबर रोजी प्रा. विजयकुमार यांना सत्र परीक्षेला बसू द्या, नाहीतर बाहेर बघून घेऊ, अशी धमकी दिली होती. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी आरोपींनी प्राचार्य बी. एम. पाटील यांच्या केबिनमध्ये घुसून विजयकुमार यांना कामावरून काढण्यासाठी गोंधळ घातला.

महाराष्ट्रात हिंदी का बोलतो म्हणत थेट मारहाण
  • सोमवारी सातव्या सेमिस्टरचा पेपर सुरू असताना प्राचार्यांनी विजयकुमार यांना केबिनमध्ये बोलावले. तिथे सर्व आरोपी आधीच हजर होते.
  • प्राचार्यांसमोरच विजयकुमार हिंदीतून बाजू मांडत असताना सचिन आणि मुकेश राठोड यांनी अरेरावी सुरू केली. सर्व आरोपींनी प्राध्यापकाचे हात-पाय आणि कॉलर पकडून त्यांना जमिनीवर आदळले. हात मुरगळून डोक्यावर, मानेवर व हातावर फायटरने मारहाण केली.
  • वेळीच कॉलेजमधील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी त्यांची सुटका केली. यात विजयकुमार यांचे बोट फॅक्चर झाले आहे. कॉलेजमधून डायल ११२ वर कॉल केल्यानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
  • घाटी रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी बोटाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.
तर तीव्र आंदोलन करू

आम्ही प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेला का बसू दिले जात नाही यावर चर्चा करीत होतो. तेथे विभाग प्रमुख विजयकुमार आले. ते खुर्चीवर बसले. मात्र, चर्चा चालू असतानाच अचानक त्यांनी फिल्मीस्टाइल उडी मारून लाथ मारली. तसेच, एका विद्यार्थ्याला वर्ष वाया घालण्याची धमकी दिली. या प्रकरणी विभाग प्रमुखावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आंदोलन करू., असे बंजारा क्रांती सेनेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. मुकेश राठोड यांनी स्पष्ट केले.

Read About: Sagar Agale Land Scam – ‘गरीब फाउंडेशन’चा बुरखा फाटला; 30 कोटींच्या जमीन घोटाळ्यात कुख्यात सागर आगळेला बेड्या!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.