जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर सहा ते सात हल्लेखोरांचा गोळीबार करत कोयत्याने हल्ला
पुणे : Pune Shivajinagar Court Firing शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर घडलेल्या या थरारामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण होते. या हल्ल्यात न्यायालयाच्या कामानिमित्त आलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिसांनी आता परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
प्रत्यक्षदर्शी वकील आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकींवरून सहा ते सात हल्लेखोरांची टोळी आली होती. यातील एका दुचाकीवर तिघे तर दुसऱ्या दुचाकीवर चौघे जण स्वार होते. या सर्व आरोपींच्या हातात बंदुक आणि कोयते घातक शस्त्रे होती. त्यांनी थेट न्यायालयाच्या गेट क्रमांक चारवरच संबंधित व्यक्तीला गाठले आणि तिच्यावर गोळीबार केला. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी कोयत्यानेही सपासप वार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती, परंतु हल्लेखोरांच्या हातातील शस्त्रे आणि दहशतीमुळे कोणीही मदतीसाठी पुढे धजावले नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच सर्व आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
या हल्ल्यात संबंधित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात आणि जखमी अवस्थेत रस्त्यावर पडली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी व्यक्तीला एका रिक्षातून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा (क्राइम ब्रांच) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना रस्त्यावर एक बंदुकीचे मॅगझिन आणि एक मोबाईल फोन सापडला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. थेट जिल्हा न्यायालयाच्या दारातच अशा प्रकारे टोळीयुद्ध किंवा जीवघेणा हल्ला होत असल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read About: Sagar Agale Land Scam – ‘गरीब फाउंडेशन’चा बुरखा फाटला; 30 कोटींच्या जमीन घोटाळ्यात कुख्यात सागर आगळेला बेड्या!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.