उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील शेतकऱ्यांना दिलासा; हमीभावाने कृषी माल खरेदीसाठी ५,५४७.९९ कोटी रुपयांची मंजुरी
नवी दिल्ली : MSP Procurement 2026-27 केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘किंमत समर्थन योजने’अंतर्गत किमान आधारभूत किमतीवर ५,५४७.९९ कोटी रुपयांच्या कृषी माल खरेदीला मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, या निर्णयाचा मुख्य उद्देश बाजारपेठेतील किमती घसरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे आणि त्यांच्या मालाला फायदेशीर भाव मिळवून देणे हा आहे. याचा थेट फायदा प्रामुख्याने डाळी आणि तेलबीज उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
उत्तर प्रदेशासाठी सर्वाधिक निधी
मंजूर करण्यात आलेल्या एकूण खरेदीमध्ये सर्वात मोठा हिस्सा उत्तर प्रदेशचा असून, या राज्यासाठी ३,९९२.५७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या अंतर्गत ३,९३७.७० कोटी रुपयांची ४,६६,००० मेट्रिक टन तुरीची आणि ५४.८७ कोटी रुपयांची ६,२५० मेट्रिक टन मुगाची खरेदी हमीभावाने केली जाईल.
कर्नाटक आणि तेलंगणाचा वाटा
- कर्नाटक: डाळी आणि तेलबीज उत्पादक शेतकऱ्यांसाठी १,१०७ कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ६५९.२७ कोटी रुपयांचे १,१५,५०० मेट्रिक टन सोयाबीन, ३३५.८३ कोटी रुपयांचा ३८,२५० मेट्रिक टन मूग आणि १११.९० कोटी रुपयांच्या १३,४१३ मेट्रिक टन सूर्यफुलाची खरेदी केली जाईल.
- तेलंगणा: या राज्यासाठी ४४८.४२ कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. किंमत समर्थन योजनेअंतर्गत ३५३.९० कोटी रुपयांचे ६२,००० मेट्रिक टन सोयाबीन आणि ९४.५२ कोटी रुपयांचा १०,७६६ मेट्रिक टन मूग हमीभावाने खरेदी केला जाईल.
Read About : Maharashtra Drought – 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलती
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.