सरासरी ४६.२२ पैसे : महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावे वगळली
Chhatrapati Sambhajinagar Kharif Paisewari 2026 छत्रपती संभाजीनगर : महसूल प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामाची नजर अंदाज (अंदाजित) पैसेवारी गुरुवारी (दि.१) जाहीर केली असून यामध्ये जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १ हजार ३५४ गावांची पैसेवारी ही ५० पैसे पेक्षा कमी आढळून आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
दरवर्षी महसूल यंत्रणेच्या मार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा १ ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाची नजर अंदाज (अंदाजित) पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २०२६-२७ खरीप अंतिम पैसवारी १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. जुलै महिन्यात पडलेल्या पावसावर पेरण्या करण्यात आल्या. जुलै अखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. ऑक्टोबर महिना उजडला तरी पावसाचा पत्ता नाही.
- पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने मोठा खंड दिल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला. खरीप पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे महसूल विभागाने केलेल्या नजर अंदाज (अंदाजीत) पैसेवारीमधून समोर आले आहे.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ३५४ गावांमधील पैसेवारी ही ५० पैक्षा कमी असल्याचे आढळून आले.
पैसेवारीतून वगळली २७ गावे
- छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाल्याने तसेच पैठण तालुक्यातील एकूण गावांची संख्या १९३ असून त्यापैकी ४ गावे ही पालिका क्षेत्रात असल्याने या गावांची पैसैवारी जाहीर करण्यात आली नाही.
- तर गंगापूर तालुक्यात एकूण २२६ गावे आहेत. यापैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादीत असल्याने २२२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. अशा प्रकारे २७ गावे पैसेवारीतून वगळण्यात आली आहेत.
५३ हजार हेक्टर पडीत क्षेत्र
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७ लाख ९१ हजार ५९४.३२ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड केली जाते. परंतु यावर्षी उशिराने आलेला मान्सून आणि पावसाचे प्रमाण कमी यामुळे केवळ ७ लाख ५४ हजार ७९२.१८ हेक्टरवर लागवड झाली आहेत. तब्बल ५३ हजार ९९४.५ हेक्टर जमीन पडीत आहे.
सुधारित, अंतीम पैसेवारी कधी?
नजर अंदाजानंतर प्रत्यक्ष पीकस्थितीचा अधिक सविस्तर आढावा घेऊन सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. छत्रपती संभाजीनगर विभागात ती साधारण ऑक्टोबरच्या मध्यात आणि काही ठिकाणी ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जाते. तर खरीप पिकांची कापणी करून पीक कापणी प्रयोगांच्या आधारे अंतिम पैसेवारी निश्चित केली जाते. छत्रपती संभाजीनगर विभागात १५ जानेवारीपूर्वी अंतीम पैसेवारी जाहीर होते. अनेक वेळा अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर किंवा ३१ डिसेंबरच्या आसपासही जाहीर केली आहे.
पैसेवारी ५० पेक्षा कमी म्हणजे काय?
पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे त्या गावातील प्रमुख पिकांचे प्रत्यक्ष उत्पन्न/उत्पादन हे सामान्य उत्पादनाच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी पातळीवर असल्याचे पैसेवारीच्या पारंपरिक मोजमापातून दर्शविले जाते. ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी पैसेवारी आली म्हणजे आपोआप संपूर्ण गावाला दुष्काळ घोषित झाला असे होत नाही. दुष्काळसदृश्य परिस्थिती, टंचाई उपाययोजना किंवा विविध सवलती लागू शासन निर्णय घेते.
मराठवाड्यातील ८४९६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी
महसूल प्रशासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नजर आणेवारी किंवा पैसेवारी १ ऑक्टोबर रोजी जाहीर केली असून विभागातील ८ हजार ४९६ गावांची पैसेवारी ही ५० पैक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३५४, बीड १ हजार ३९७, परभणी ८३२, नांदेड १५६२, जालना ९७१, लातूर ९५२ तर हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांचा समावेश आहे.
Read About : MSP Procurement 2026-27 – केंद्र सरकारकडून हमीभावाने डाळी, तेलबिया खरेदीला मंजुरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.