Ad Advertisement Ad Advertisement

Varun Dhawan Captain Smit Machchhar – कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धैर्याला वरुण धवनचा सलाम

फ्लायदुबई विमानातील संकटावेळी दाखवलेल्या शौर्याचे केले कौतुक; “तुमचे धैर्य देशवासीयांसाठी प्रेरणादायी”

मुंबई : Varun Dhawan Captain Smit Machchhar : फ्लायदुबईच्या विमानात निर्माण झालेल्या गंभीर संकटावेळी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसाने परिस्थितीचा सामना करणारे कॅप्टन स्मित मच्छर यांचे अभिनेता वरुण धवन यांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टद्वारे धवन यांनी कॅप्टन मच्छर यांच्या शौर्याला सलाम करत त्यांना देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले आहे.

वरुण धवन यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कॅप्टन स्मित मच्छर यांना उद्देशून लिहिले, “सलाम आमचे कॅप्टन स्मित मच्छर. तुमचे धैर्य आणि शौर्य आम्हा सर्वांना अभिमानाने भरून टाकते. तुम्ही खरोखर प्रेरणादायी आहात. जय हिंद.”

कॅप्टन मच्छर यांच्या धाडसाचे देशभरातून कौतुक होत असताना मुंबईतही त्यांच्या सन्मानार्थ “Thank You Captain Smit” असे संदेश झळकताना दिसले.

पंतप्रधान मोदींशी फोनवर संवाद

जखमी झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीतील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅप्टन मच्छर यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी विमानातील त्या थरारक प्रसंगाची माहिती दिली.

विमान खाली जात असल्याचे जाणवल्यानंतर आपण शेवटची ताकद पणाला लावून कॉकपिटच्या दरवाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. हल्ला सुरू असतानाही कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“विमान खाली जात असल्याचे मला जाणवले. ही शेवटची संधी आहे, असे मनाशी ठरवले आणि कॉकपिटच्या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटची ताकद लावली. त्यानंतर इतर सर्वजण तेथे आले. या संकटात इतरांनीही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली,” असे मच्छर यांनी सांगितले.

प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याची जाणीव आपल्याला होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या बचावासाठी आपण प्रयत्न करत होतो; मात्र त्याचवेळी विमानातील प्रवाशांना काहीही होऊ नये, ही भावना मनात होती, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

विमानात नेमके काय घडले?

३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हे गंभीर संकट निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, ओमानचा सहवैमानिक असलेल्या व्यक्तीने कॅप्टन मच्छर यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर विमानाची उंची झपाट्याने कमी झाली आणि सुमारे दोन मिनिटांत विमान तब्बल १६ हजार फूट खाली आले.

यानंतर विमानातून अपहरणासंदर्भातील आपत्कालीन संदेश प्रसारित करण्यात आला. गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छर यांनी हल्लेखोराचा प्रतिकार केला. विमानातील इतर कर्मचारी आणि प्रवाशांनीही कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला रोखण्यासाठी मदत केली.

त्यानंतर विमानावरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यात आले आणि सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व १८० जण सुरक्षितपणे बाहेर पडले, अशी माहिती समोर आली आहे.

कॅप्टन मच्छर यांची प्रकृती स्थिर

संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी कॅप्टन मच्छर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही कॅप्टन मच्छर यांना ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’ देण्याची घोषणा केली आहे. कॅप्टन मच्छर यांच्या धैर्याची दखल घेत अभिनेता वरुण धवन यांनी केलेल्या या कौतुकामुळे त्यांच्या शौर्याला आणखी व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे.

Read About : The One Box Office Collection – ‘द वन’ने पार केला 50 कोटींचा टप्पा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.