Indian athletes at Asian Games : साताऱ्याच्या मातीतून जपानमधील नागोया येथे सध्या रंगलेल्या जबरदस्त चुरशीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रीडांगणापर्यंत सुवर्ण लक्ष्यभेदासाठी झेपावलेल्या साताऱ्याच्या करंडी गावातील साहिल जाधवने बुधवारी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर इतिहास कसा रचता येतो ते दाखवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा तिरंगा ज्या डौलात फडकतोय, त्यामागे केवळ पदकांची चमक नाही, तर एका नव्या भारताच्या क्रीडा-क्रांतीची ही कहाणी आहे. एका सर्वसामान्य घरातील मुलाने आशियाई स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक जिंकणे ही केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित घटना नाही, तर अप्रत्यक्ष सामाजिक क्रांतीही आहे. साहिलचे यश हे सिद्ध करते की, प्रतिभेला आता पत्ता, आडनाव किंवा बँक बॅलेन्सचे बंधन राहिलेले नाही. त्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्याच्या आईने दागिने गहाण ठेवले होते. आता एक नाही दोन सुवर्णपदके जिंकून साहिलने आईच्या त्या सुवर्णलेण्यांचे पांग फेडले आहेत. केवळ साहिलच नाही तर या क्रीडास्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच भारतीय क्रीडापटूंनी यंदा सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या तिरंग्याची शान आणि मान उंचावली आहे.
विशेषत: कुस्तीच्या आखाड्यापासून ते ॲथलेटिक्सच्या ट्रॅकपर्यंत, नेमबाजीपासून ते बॅडमिंटनपर्यंत – मुलींनी या वेळी केवळ सहभाग घेतला नाही, तर वर्चस्व गाजवले आहे. मुलींना उंबरठ्याआड ठेवणाऱ्या परंपरागत जुन्या मानसिकतेला ही सणसणीत चपराक आहे. ट्रॅप सुवर्णपदक विजेती नीरू धांडा, नेमबाज इलावेनिल वालारिवान, महिला कबड्डी संघातील मुंबईची सोनाली शिंगटे, सुवर्णपदक विजेत्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार सांगलीची स्मृती मंधाना, टेबल टेनिस मिश्र दुहेरीत कांस्य पदक विजेत्या जोडीतील मुंबईची दिया चितळे, ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन, प्रिया घंगहास, तीरंदाज पथकातील चिकीता तनिपार्थी, ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रताप, ॲथलिट प्राची… अशी किती नावे घ्यायची? आजची भारतीय महिला खेळाडू ही आत्मविश्वास, फिटनेस आणि जिंकण्याच्या जिद्दीचे प्रतीक बनली आहे. गेल्या काही वर्षांत हे आमूलाग्र बदल कसे घडले? याचे उत्तर आहे – नियोजनबद्ध गुंतवणूक आणि धोरणातील बदल. कधी काळी खेळाडूंना साध्या ट्रॅकसूटसाठीही वणवण करावी लागायची.
आज देशात अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभ्या राहत आहेत. TOPS आणि Khelo India सारख्या योजनांनी तळागाळातील निष्णात खेळाडू शोधून त्यांना थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, पौष्टिक आहार, परदेशी कोच आणि स्पोर्टस् सायन्सचा आधार दिला आहे. हे सर्व अचानक घडलेले नाही. गेल्या काही वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्रात तीन स्तरांवर आमूलाग्र बदल झाले आहेत. पहिला बदल म्हणजे – तळापासून प्रतिभा शोध. Khelo India सारख्या उपक्रमाने जिल्हा पातळीवर स्पर्धा घेतल्या. त्यातून ग्रामीण भागातील नवे खेळाडू चमकले, पुढे आले. त्यांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि प्रशिक्षण मिळाले. दुसरा बदल म्हणजे – अत्याधुनिक सुविधा आणि विज्ञान. पूर्वी खेळाडू परदेशात गेल्यावरच वर्ल्ड क्लास ट्रॅक पाहायचा. आज पटियाला येथील NIS, बंगळुरू येथील SAI सेंटरमध्ये ऑलिम्पिक दर्जाचे ट्रॅक, स्पोर्टस् सायन्स लॅब, बायोमेकॅनिक्स, फिजिओथेरपी, मानसोपचार तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कोच उपलब्ध आहेत. TOPS – Target Olympic Podium Scheme अंतर्गत खेळाडूंचा आहार, परदेश प्रशिक्षण आणि दुखापतींवरील उपचार यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून आज आपले खेळाडू अंतिम क्षणापर्यंत दमदार कामगिरी करतात.
तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे – मानसिकता. आज खेळाकडे केवळ छंद म्हणून नाही तर करिअर म्हणून पाहिले जात आहे. पालक आता आपल्या मुलीला कुस्तीच्या आखाड्यात किंवा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पाठवताना घाबरत नाहीत. सरकारी नोकऱ्यांमध्ये क्रीडापटूंसाठी आरक्षण, रोख बक्षिसे आणि समाजात मिळणारा सन्मान यामुळे क्रीडा क्षेत्राला प्रतिष्ठा मिळाली आहे. साहिल जाधवचे दुहेरी सुवर्ण हे केवळ दोन पदकं नाहीत. ती साताऱ्याच्या, सांगलीच्या, बीडच्या आणि अशा अनेक गरीब घरातील मुलांसाठी एक प्रेरणा आहे, ध्येयप्राप्तीचा, लक्ष्यपूर्तीची गुरुकिल्ली आहे. ‘तुम्हीही हे करू शकता’, ही ती गुरुकिल्ली आहे.
आशियाई स्पर्धेतील चमक ही सुरुवात आहे. ऑलिम्पिकच्या दिशेने टाकलेले हे आत्मविश्वासपूर्ण पाऊल आहे. वैयक्तिक सुवर्ण मिळवणाऱ्या नीरू धांडाने कायनान चेनाईच्या जोडीने ट्रॅपमध्ये मिश्र सांघिक सुवर्णपदकही जिंकले. ठाणेकर नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने सांघिकच्या दोन प्रकारांत रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्य मिळवले आहे. नेमबाज हिमांशू ढिल्लनने वैयक्तिक आणि सांघिकमध्येही रौप्यची कमाई केली आहे. ॲथलिटमध्ये नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडीत रुपेरी यश मिळवले. सुवर्णपदक विजेत्या पुरुष कबड्डी संघात अस्लम इनामदारने लक्ष वेधून घेतले होते. स्क्वॅॅशमध्येही भारतीय महिला आणि पुरुष संघ चमकला आहे. गुरुवारी भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. तिरंदाजीत आपल्या पुरुष, महिला आणि मिश्र संघाने विजेतेपदे कायम राखली आहेत. यामुळे २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारासाठी पात्र ठरणारा भारत पहिला देश ठरला आहे. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच या क्रीडाप्रकाराचा समावेश होणार आहे. ग्रीको रोमन कुस्ती प्रकारातही सुनील कुमारने दोन कांस्य पदके पटकवत १३ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवली.
Read About : Agniveer Reservation : शूरा मी वंदिले…
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.