Ad Advertisement Ad Advertisement

Dnyaneshwari Birthday : पुस्तकाचा वाढदिवस

Dnyaneshwari Birthday : ‘अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची’ असे वर्णन नित्यपाठातील श्लोकातले. तुकोबारायांच्या अभंगवाणीचे अनेक पाठभेद तयार झाले, त्या पाठभेदांचा अभ्यास करून एक शुद्ध प्रत तयार करण्याचे मोलाचे काम मागील शतकात बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांनी केले. तुकोबांचे वंशज असलेल्या प्रा. सदानंद मोरे यांच्या आजोबा, पणजोबांनी त्यांना मोलाची मदत केली. तसाच उपक्रम त्याआधी संत एकनाथांनी सार्थ केला.

शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० ते १२९१ च्यादरम्यान संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ हा ग्रंथ नेवासे या क्षेत्री ओवीबद्ध केला. या कालखंडाचा उल्लेख खुद्द या ग्रंथातील एका ओवीत शब्दबद्ध केला गेला आहे.

शके बाराशतें बारोत्तरें।
तैं टीका केली ज्ञानेश्वरें।
सच्चिदानंदबाबा आदरें।
लेखकु जाहला।।

(ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय – ओवी क्रमांक १८१०)

संत ज्ञानेश्वर आपले विचार प्रत्यक्ष सांगताहेत आणि सच्चिदानंदबाबा त्यावेळी लेखनिक या नात्याने ते पानावर टिपून काढत आहेत, त्यावेळचा कालखंड या १८१० व्या ओवीत स्पष्टपणे वाचायला मिळतो. भगवद्गीतेचे सार अगदी सोप्या शब्दांत परंतु विस्तृतपणे विषद करणारा हा ग्रंथ जीवनातील प्रत्येक कंगोऱ्यावर भाष्य करतो, म्हणूनच संत नामदेव म्हणतात,

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।
एक तरी ओवी अनुभवावी।।

त्यांच्या शिष्या जनाबाई यांनी तर या ग्रंथाला ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव दिले आणि हेच नाव पुढे आजतागायत रूढ झाले.
त्या काळी कोणताही ग्रंथ ठोक प्रमाणात छापला जात नसे. किंबहुना घाऊक प्रमाणात छपाईचे तंत्र तेव्हा विकसित झालेले नव्हते. हाताने भुजपत्रावर लिहायचे. ती सर्व पाने ग्रंथ म्हणून बांधून घ्यायची. दुसऱ्या कुणास तो ग्रंथ वाचायचा असल्यास त्याची हुबेहूब नक्कल मूळप्रत समोर पाहून ती नव्याने लिहून काढायची. ही एवढी मेहनत असतानादेखील ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या हजारो प्रती नव्याने लिहिल्या गेल्या आणि त्याचा प्रसार अखिल मराठी जगतात झाला. परंतु, हे होत असताना लिहिणाऱ्या व्यक्तीकडून या ग्रंथातील ओव्यांच्या मूळ संहितेत सूक्ष्म बदल होत गेले. मूळची प्रमाण प्रत बाजूला होत, प्रतींवरून प्रती नक्कल म्हणून काढल्याने कुणी एकाने केलेले मूळ संहितेतील बदलदेखील त्या नव्याने होत असलेल्या नकलेत आले. अशा रीतीने ग्रंथातील मूळ संहिता बदलून इतर बदल बहुरूढ झाले, त्यामुळे काही ओव्या बदलल्या गेल्या, काही गाळल्या गेल्या, काही चुकीच्या लिहिल्या गेल्या.

यामुळे अनेक ‘पाठभेद’ तयार झाले. मूळ संहिता कोणती याबाबत भ्रम निर्माण होऊ लागले. कुणीतरी यावर संशोधन करून मूळ संहिता पुन्हा नव्याने सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली. हे शिवधनुष्य पेलले संत एकनाथांनी. संत एकनाथांचा कालखंड म्हणजे इ.स. १५३३ ते १६०० असा आहे. उण्यापुऱ्या ६८ वर्षांच्या ऐहिक जीवनानंतर त्यांचे देहावसान फाल्गुन कृष्ण षष्ठी, शके १५२१ तथा इ.स. २५ फेब्रुवारी १६०० या दिवशी झाले. दरम्यान, मधल्या नेमक्या कोणत्या काळात त्यांनी भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे संशोधन करून शुद्ध प्रत प्रकाशित केली याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. भावार्थदीपिका, अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२७२ म्हणजे इसवीसन १३५० मध्ये लोकार्पित झाल्यानंतर साधारणपणे सव्वा दोनशे (२२५) वर्षांनंतर संत एकनाथांनी या ग्रंथाच्या पाठभेदांचे शुद्धीकरण केले असे ढोबळमनाने म्हणता येते. या ऐतिहासिक घटनेचा शक क्रमांक किंवा इसवीसन माहीत नसले तरी कोणत्या तिथीला हे शुद्धीकरण पूर्ण झाले याची नोंद खुद्द संत एकनाथांनीच लिहून ठेवली आहे ते पुढील ओवीमधून सिद्ध होते.

बहुकाळ पर्वणी गोमटी।
भाद्रपदमास कपिलाषष्ठी।
प्रतिष्ठानीं गोदातटीं।
लेखनकामाठी संपूर्ण जाहली।।

(संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या तिथीचा हा लेखी निर्देश.)

‘प्रतिष्ठान’ म्हणजे दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजकुळाची राजधानी म्हणजे पैठण शहर. महालयातील भाद्रपद वद्य षष्ठी या तिथीला हे ग्रंथशुद्धीकरण सिद्ध झाले म्हणून संत एकनाथांनी या तिथीला गोमटी पर्वणी असे म्हटले आहे. हाच धागा पकडून वारकरी सांप्रदाय या तिथीला भावार्थदीपिका तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा जन्मदिन म्हणून साजरा करतो.
गेल्या साडेचारशे (४५०) वर्षांहून अधिककाळ कोणत्या पुस्तकाचा जन्मदिन साजरा होण्याचा हा एकमेव जागतिक योग आहे. योगायोगाने लेखमालेच्या या आजच्या २४ व्या लेखांकाचा दिवस म्हणजे दिनांक २ ऑक्टोबर २०२६, तिथी भाद्रपद व. ६, शके, देखील ज्ञानेश्वरी जन्मदिन आहे.

अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे जगातील इतर कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही देशात पुस्तकाचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नाही, परंतु तो मान केवळ मराठी आणि संस्कृतमधील आद्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता यांस जातो. मार्गशीर्ष शुक्ल (मोक्षदा) एकादशी म्हणजे ‘गीताजयंती’. जगभर कोणते ग्रंथ सोहळे साजरे होतात, त्याचा संक्षिप्त धांडोळा – २३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिन’ युनेस्को १९९५ पासून विल्यम शेक्सपिअरचा आणि मिगुएल दे सर्व्हांटिस यांच्या जन्म-मृत्यूदिनी साजरा करते. युनेस्को ज्यांचा ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ (जागतिक पुस्तक राजधानी) म्हणून वार्षिक सन्मान करते, त्यातील काही मोजकी शहरे- २००३ : दिल्ली, २०२५ : रिओ दि जानेरो, ब्राझील, २०२६ : रबात, मोरोक्को, २०२७ (पुढील वर्ष): मेदेलिन, कोलंबिया.
(क्रमश:…)

देवेंद्र रमेश राक्षे
संपर्क : ८३०८३०२४००

Read About : Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.