Ad Advertisement Ad Advertisement

Plague Risk : रशियात प्लेगची भीती, प्रयोगशाळेतील संशोधकाच्या मृत्यूनंतर शेकडो जणांना केले क्वारंटाइन

दार्या शिपिलोव्हा यांचा गंभीर न्यूमोनियाने मृत्यू; लॅबमध्ये टेस्ट ट्यूब फुटल्याच्या दाव्याने खळबळ, रशियाने अपघाताचा दावा फेटाळला

माॅस्को – Plague Risk रशियाच्या सायबेरिया प्रांतातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जैव-संशोधन प्रयोगशाळेत ३४ वर्षीय महिला संशोधक दार्या शिपिलोव्हा यांचा न्यूमोनियामुळे रहस्यमयी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर रशियात अत्यंत प्राणघातक समजल्या जाणाऱ्या न्यूमोनिक प्लेग चा उद्रेक होण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने मृत महिला संशोधकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे २०० हून अधिक लोकांना तातडीने क्वारंटाईन (वैद्यकीय निरीक्षणाखाली) केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला संशोधक प्रयोगशाळेत यर्सिनिया पेस्टिस या प्लेगला कारणीभूत ठरणाऱ्या घातक जीवाणूवर संशोधन करत होती. काही दिवसांपूर्वी प्रयोगशाळेत काम करत असताना एक टेस्ट ट्यूब चुकून फुटली आणि त्यातून या जीवाणूचा संसर्ग हवेद्वारे तिच्या शरीरात पसरल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर काही दिवसांतच तिला तीव्र ताप आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

काय आहे न्यूमोनिक प्लेग?

हा प्लेगचा सर्वात घातक प्रकार मानला जातो, जो थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. हा संसर्ग रुग्णाच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हवेद्वारे इतर लोकांमध्ये अत्यंत वेगाने पसरू शकतो. जर यावर वेळेत प्रतिजैविक उपचार मिळाले नाहीत, तर हा संसर्ग २४ तासांच्या आत प्राणघातक ठरू शकतो. यामुळेच जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी सायबेरियातील प्रभावित भागात तातडीने वैद्यकीय आणीबाणी घोषित केली आहे. मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्य, प्रयोगशाळेतील इतर सहकारी आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जात आहेत. संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण प्रयोगशाळा तात्पुरती सील करण्यात आली आहे.

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.