‘बाराखाना’ कार्यक्रमात नौदल अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीयांशी संवाद
विशाखापट्टणम : Indian Navy Power संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांडद्वारे आयोजित बाराखाना या सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत देशाच्या सागरी सुरक्षेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल सरकारची कृतज्ञता व्यक्त केली.
संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचा एक शक्तिशाली सागरी शक्ती म्हणून झालेला उदय आणि देशासमोरील आव्हानांना निर्णायकपणे सामोरे जाण्याच्या तिच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आज भारतीय नौदलाच्या ताकदीची विशेष दखल घेतली जाते. नौदलाच्या शौर्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देताना त्यांनी १९७१ च्या युद्धातील ‘ऑपरेशन ट्रायडेंट’चा उल्लेख केला, ज्यामध्ये भारतीय नौदलाने कराची बंदरावर जोरदार प्रहार करून आपली आक्रमक क्षमता सिद्ध केली होती.
भारताच्या सागरी शक्तीमधील रूपांतरावर भर देत संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय नौदलाने २१ व्या शतकातील बदलत्या सुरक्षा वातावरणाशी सुसंगत अशी प्रगती केली आहे.
देशाने स्वदेशी बनावटीची प्रगत साधनसामग्री विकसित करून ती सेवेत दाखल केली आहे; यामध्ये स्वदेशी विमानवाहू युद्धनौका, अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या, ‘स्टेल्थ फ्रिगेट्स’ आणि ‘स्कॉर्पीन’ वर्गातील पाणबुड्यांचा समावेश आहे. युद्धनौकांमध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा समावेश असावा आणि नौदलाच्या कारवायांतून देशाचा वाढता आत्मविश्वास व आत्मनिर्भरता प्रतिबिंबित व्हावी, असा भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
सागरी क्षेत्राबाबत व्यापक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन करत राजनाथ सिंह म्हणाले की, महासागरांकडे केवळ संरक्षणाची गरज असलेल्या सीमा म्हणून न पाहता, आर्थिक विकास, धोरणात्मक प्रभाव आणि राष्ट्रीय समृद्धीचे स्रोत म्हणून पाहिले पाहिजे. भारताने ‘समुद्रातून समृद्धी आणि सामर्थ्याकडे’ वाटचाल करण्याच्या विचारसरणीसह पुढे जाणे आवश्यक आहे.
नौदल कर्मचाऱ्यांना ‘नायक’ आणि तरुणांसाठी ‘प्रेरणास्थान’ संबोधतानाच त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचीही विशेष दखल घेतली. कर्मचारी जेव्हा समुद्रावर तैनात असतात, तेव्हा त्यांचे कुटुंबीय घरातील जबाबदाऱ्या पेलून त्यांना आवश्यक असलेले बळ देतात. नौदल कर्मचाऱ्यांची सेवा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे त्याग ही एक मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगत त्यांनी ‘बाराखाना’ हा कार्यक्रम सशस्त्र दल आणि राष्ट्र यांच्यातील सखोल संबंधांचे, बंधुभावाचे आणि आपुलकीचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
Read About : Whatsapp new rules – 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक मेसेजसाठी मोजावे लागणार शुल्क
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.