दिल्लीतील तिहार तुरुंगाच्या सेंट्रल जेल क्रमांक ३ मध्ये २०२० ते २०२५ दरम्यान २८५ झडतींमध्ये ३५० मोबाईल फोन जप्त; यातील २०२ फोन मिनी कीपॅड फोन असल्याची माहिती
नवी दिल्ली : Tihar Jail Mobile Phones दिल्लीच्या हाय-सिक्युरिटी असलेल्या तिहार तुरुंगातील उंच भिंती, सुरक्षारक्षकांचा कडक पहारा आणि सीसीटीव्हीचे जाळे भेदून कैद्यांपर्यंत तब्बल ३५० मोबाईल फोन पोहोचल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या नोंदींनुसार, तिहारमधील सेंट्रल जेल क्रमांक ३ मध्ये २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात २८५ वेळा करण्यात आलेल्या झडतीमध्ये हे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या जप्तीमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सापडलेल्या एकूण फोनपैकी सुमारे ५८ टक्के (२०२ फोन) हे अत्यंत लहान, म्हणजेच केवळ माणसाच्या हाताच्या अंगठ्याएवढ्या आकाराचे ‘केचाओडा’ (Kechaoda) कंपनीचे मिनी कीपॅड फोन आहेत. याशिवाय ८८ फोन एका नामांकित कंपनीचे आढळले असून, १९ उपकरणांचे आयएमईआय क्रमांक देखील मिटवून टाकण्यात आले होते, जेणेकरून पोलिसांना या फोनचा माग काढता येऊ नये.
शौचालयाच्या टाक्या अन् झाडांच्या मुळांमध्ये लपवाछपवी
तुरुंगाच्या कडक तपासणीतून वाचण्यासाठी कैद्यांनी मोबाईल लपवण्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधल्या होत्या. जप्त केलेले फोन हे शौचालयाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये, छतांवर, भिंतींच्या खोबणीत, पाण्याच्या नळांमध्ये आणि तुरुंगाच्या आवारातील झाडांच्या मुळांजवळ जमिनीत पुरून ठेवलेले आढळले. एका प्रकरणात तर एका कैद्याने चक्क आपल्या पाठीला मोबाईल बांधून लपवला होता. तुरुंगात चालणारी बांधकामे, दुरुस्तीची कामे, बाहेरील वस्तूंची ने-आण आणि कैद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून हे फोन आत पोहोचवले जात असल्याचा संशय आहे.
अनधिकृत संपर्कातून गुन्हेगारीचे जाळे
तुरुंगातून बाहेरील जगाशी संपर्क साधण्यासाठी कैदी या लहान फोनचा वापर करत होते. अनेकदा या अनधिकृत फोनचा वापर केवळ कुटुंबाशी बोलण्यासाठी नाही, तर बाहेरील साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी कटकारस्थानांचे नियोजन करणे, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच, काही कैदी पारंपरिक मोबाईल नेटवर्कऐवजी इंटरनेट आधारित व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल तंत्रज्ञानाचा वापर करून कॉल करत असल्याची माहितीही प्रशासनाला मिळाली आहे.
प्रशासनापुढील आव्हाने
Tihar Jail Mobile Phones मोबाईल सिग्नल रोखण्यासाठी तिहार प्रशासनाने हाय-टेक जॅमर बसवले आहेत आणि मार्च २०२५ मध्ये स्वतंत्र गुप्तचर कक्ष देखील स्थापन केला आहे. मात्र, जॅमरची मर्यादित क्षमता आणि उपकरणांचा लहान आकार यामुळे केवळ फोन जप्त करणे पुरेसे ठरत नाही. तुरुंगाच्या आत चालणारे हे अनधिकृत रॅकेट कायमचे बंद करण्यासाठी तंत्रज्ञानासोबतच अंतर्गत पुरवठा साखळीचा कसून तपास करणे आणि कडक प्रशासन राबवणे हे यंत्रणांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.