Ad Advertisement Ad Advertisement

MIB TV channel guidelines- देशविरोधी मजकुराचे प्रसारण टाळा

टीव्ही वाहिन्यांसाठी माहिती-प्रसारण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

MIB TV channel guidelines : नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी सर्व खासगी सॅटेलाइट टीव्ही वाहिन्यांसाठी एक महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वाहिन्यांनी दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण टाळावे, हिंसक दृश्ये दाखवताना कमालीची काळजी घ्यावी आणि देशविरोधी किंवा जातीय सलोखा बिघडवणारा मजकूर प्रसारित करण्यापासून दूर राहावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.


मंत्रालयाने आपल्या आदेशात सर्व वाहिन्यांनी ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा-१९९५’ आणि ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, १९९४’ अंतर्गत विहित केलेल्या कार्यक्रम नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. विविध खासगी सॅटेलाइट टीव्ही वाहिन्यांकडून या प्रोग्राम कोडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. अनेक वाहिन्यांवर संवेदनशील विषयांवर आक्षेपार्ह बातम्या आणि दृश्ये प्रसारित केली जात असल्याचे या संदर्भात झालेल्या आंतर-मंत्रालयीन समितीच्या बैठकीत आढळून आले.

या पार्श्वभूमीवर समितीने टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या मजकुरावर नियंत्रण ठेवणाऱ्या वैधानिक तरतुदींचे सर्व वाहिन्यांनी काटेकोर पालन करण्याची शिफारस केली. तसेच, दूरचित्रवाणीवर आक्षेपार्ह वर्तन किंवा असभ्य भाषेचे सामान्यीकरण केले जाऊ नये, यावरही समितीने विशेष भर दिला आहे.

काय आहे नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये

मंत्रालयाने जारी केलेल्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण, हिंसक दृश्ये, गुन्हेगारीचे वार्तांकन, नैसर्गिक आपत्ती, भारताच्या अधिकृत व अचूक नकाशांचा वापर, जातीय सलोखा आणि लैंगिक छळाला बळी पडलेल्या पीडितांची ओळख गुप्त ठेवणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. थेट प्रक्षेपित होणारे वादविवाद आणि चर्चासत्र यांसह इतर कोणत्याही कार्यक्रमांमधून जातीय विद्वेष किंवा देशविरोधी मानसिकतेला प्रोत्साहन मिळणार नाही याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाहिन्यांची असेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

Read About : SBI data leak- एसबीआयच्या 3,897 ग्राहकांची संवेदनशील माहिती डार्क वेबवर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.